औरंगाबादच्या वैभवात नवीन बुद्ध लेण्यांची भर
जटवाडा रोडवरील हर्सूल तलावालगत, भीमटेकडीच्या शेजारील डोंगरामध्ये आढळल्या ४ ते ५ नवीन बुद्धलेण्या.
भीमसैनिकांच्या श्रमदानातून लेण्यांचे पुनरुज्जीवन
औरंगाबाद (सिद्धार्थ काळे)
औरंगाबाद बुद्धलेणीच्या मागील बाजूस भीमटेकडीच्या शेजारील दुर्लक्षित आणि झाडी-मातीमध्ये कुणालाही माहीत नसलेल्या बुद्धलेण्यांचा शोध घेतला आहे भन्ते करुणानंद थेरो यांनी. भन्तेजींच्या आवाहनानुसार आज रविवार दिनांक २६ जुलै सकाळी ९ वाजेपासून शेकडो भीमसैनिकांनी एकत्र येत येथे श्रमदान केले.
या बुद्धलेणीत काही ठीकाणी शून्यागार (ध्यान कुटी) असून, सुमारे ३००-४०० चौरस फूट आकाराचे भिक्खु निवास, विहार, ध्यानगृह, तर दुसर्या ठिकाणी दोन मजली लेणी आहे. तिथे काही अर्धवट भिक्खूनिवास आहेत जेथे शेकडो वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साचला होता. आजू बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे होते, भीमसैनिकांनी परिश्रम घेऊन कुऱ्हाड, फावडे, कुदळ, टोपले, सब्बल आदींच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गाळ व आत साचलेले पाणी काढून एक किमी अंतरावरून लेणी दिसू शकेल असे मोठे श्रमदान आज केले, आजूबाजूला असलेले झाड-झुडपे स्वच्छ केले.
मागील एक महिन्यापासून भन्ते करुणानंद थेरो व सचिन खरात व अनेक उपासक ह्या लेण्याच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी आवाहन करत होते त्यातूनच आज भीमसैनिकांनी श्रमदान करत हा परिसर स्वच्छ केला आहे. आज प्राथमिक स्वरूपाचे काम करण्यात आले असून ह्यासाठी अजून मोठे मनुष्यबळ लागणार असून मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी ह्या ठिकाणी येऊन श्रमदान करणे आवश्यक आहे. आज अपुऱ्या साधनांमुळे अनेक भीमसैनिक फारसे काम करू शकले नाहीत. ह्या कामासाठी मनुष्यबळा सोबतच स्वछता करण्यासाठी फावडे, कुदळ, टोपले, कुऱ्हाडी, दोरी, सब्बल अश्या साधनांची आवश्यकता आहे.
भन्ते करुणानंद थेरो ह्यांच्या आवाहना प्रमाणे भीमसैनिकांनी श्रमदानासाठी येतांना हे साहित्य सोबत घेऊन येणे अपेक्षित आहे. काही भीमसैनिकांनी आज ह्या ठिकाणी काम करणाऱ्या भीमसैनिकांसाठी पाणी, केळी, खिचडी असा अल्पोपहार सुध्दा घेऊन आले व ह्या श्रमदानात सहभाग नोंदवला.
राज्यात आज अनेक ठिकाणी बुद्धलेण्यांवर अतिक्रमण व विद्रुपीकरण होत आहे. अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत कोरलेल्या लेण्यांवर गैरकृत्य करणे, लेण्यांची तोडफोड करणे असे प्रकार घडत आहे. भारत हा तथागत बुद्धांचा समृद्ध वारसा असलेला देश आहे, कोरलेल्या लेण्या ह्या आपल्या अस्तित्वाच्या संस्कृतीच्या प्रतीक आहेत. यांचे संवर्धन, देखभाल करणे यासाठी धम्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली संघटितपणे सर्वांनी पुढे येऊन ह्या साठी काम करण्याची गरज आहे.
आज औरंगाबादमधल्या विविध पक्ष, संघटनांमध्ये सक्रिय असणाऱ्या भीमसैनिकांनी भन्ते करूणानंद थेरो यांच्या आवाहनानुसार पुढे येत ह्या कामाची सुरुवात केली आहे. इथून पुढे दर रविवारी भीमसैनिक या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी एकत्र येणार असून ज्या ज्या भीमसैनिकांना, उपासकांना शक्य होईल त्यांनी याठिकाणी भेट द्यावी, श्रमदान करावे असे आवाहन भन्तेजींच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी-
भन्ते करुणानंद थेरो--- मो.9890437445
उपासक सचिन खरात -- मो.9730971928
यांच्याशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या