कोरोनाचा पाठलाग केल्यानेच लढा यशस्वी होईल
'मिशन झिरो' मोहिमेचा पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे
कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ठाण्यात आजपासून 'मिशन झिरो' मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा, भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन, दिपक गरोडिया, राजूल व्होरा, नैनेश शहा आदी उपस्थित होते. 'मिशन झिरो' मोहिम ही भारतीय जैन संघटनचे अध्यक्ष शांतीलाल मुठा यांच्या मार्गदर्शनाखाली देश अपनाये ही स्वयंसेवी संस्था, एमसीएचआय क्रेडाई आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चालविण्यात येणार आहे. यापूर्वी या संघटनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक या शहरांबरोबरच गुजराथ, कर्नाटक या ठिकाणी चांगले काम केले आहे. या मोहिमेतंर्गत ९ मोबाईल डिस्पेन्सरीज ९ प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत राहणार असून त्यामाध्यमातून ताप रूग्ण तसेच कोरोना सदृष्य रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याचा प्रामाणिकपणे पाठलाग करून त्याची साखळी तोडण्याची गरज आहे. 'मिशन झिरो' ही मोहिम यात यशस्वी होईल असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण त्याच्या मागे लागलो पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची गरज आहे. हे जर झाले तर योग्यवेळी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूचा दर कमी करणे आपल्याला शक्य होईल. रूग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये संवाद करून द्या जेणेकरून रूग्णाला मानसिक धीर मिळेल. माणसांचा जीव महत्वाचा आहे असे सांगून प्रभाग समिती स्तरांवर नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समित्या तयार करा असे सांगितले.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असेच काम आपल्याला पुढच्या काळातही करायचे आहे असे सांगितले.
यावेळी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी आमचे कोरोनावरील नियंत्रण सुटलेले नाही. आपण चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. पण त्यापैकी 80 टक्के बाधित रूग्ण हे असिमटोमॅटीक आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले.
प्रारंभी भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर दिपक गरोडिया यांनी या मोहिमेविषयीची माहिती सांगितली. तर नैनेश शहा यांनी आभार प्रदर्शन केले.
अर्ध्या तासात मिळणार चाचणीचा अहवाल - चार ठिकाणी सेंटर्स कार्यान्वित
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोवीड 19 रॅपिड ॲंटीजन किटसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या टेस्टींग सेंटरचे उद्घाटन आज (१३ जुलै) राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा येथे पार पडले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्याचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात महापालिकेने जवळपास 1 लाख कोवीड 19 रॅपिड अँटीजन किटस मागविले आहेत. या किटसच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ 30 मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोवीड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. सद्स्थितीमध्ये ठाणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, सी. आर. वाडिया हॅास्पीटल, कोरस आरोग्य केंद्र आणि घोडबंदर रोडवर रोझा गार्डनिया येथील आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ही चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या ठिकाणी तात्रिक आणि इतर सर्व प्रकारचे मुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रामुख्याने शहरातील हॅाटस्पॅाटस, प्रतिबंधित क्षेत्रे, झोपडपट्टी आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या प्रभागातील कोवीड संशयित रूग्णांची चाचणी या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या