आदिवासी युवा संघटना करणार कोविड(कोरोना)योद्ध्यांचा शाही सन्मान..!
वाडा
9 ऑगष्ट जागतीक आदिवासी दिनाच्या नियोजना निमित्ताने ता.अध्यक्ष मा. नितीन भोईर साहेब यांच्या निवासस्थानी *आदिवासी युवा संघटना पदाधिकारी, सदस्य तथा प्रमुख कार्यकर्ते यांची शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व नियमांचे पालन करून बैठक झाली. या बैठकीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सातत्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या वाडा तालुक्यातील पोलीस प्रशासन,नगरपंचायत मधील कर्मचारी,वाडा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, वाडा पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र,शाल,व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात येणार असा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला.
सदर बैठकीला वाडा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.शेळके मॅडम, बौद्धाचार्य तथा गवंडी बांधकाम मजूर संघटना पदाधिकारी आयु.सुजय जाधव ,नगराध्यक्षा सौ.कोळेकर , महिला बालकल्याण सभापती सौ.काळण , मा.जि.प.सदस्य राजू दळवी , मोज ग्रामपंचायत सरपंच संतोष मोरे व इतर 11 ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.सदर बैठकीत सभापती योगेश गवा , सुरेश पवार , संतोष बुकले , संजय भोईर या मान्यवरांनी कोरोना मुळे फोन कॉल द्वारे सहभाग घेतला.
बैठकीत 9 ऑ.जागतीक आदिवासी दिवस हा अतिशय साध्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन साजरा करायचा असे ठरले. यावेळी संघटनेने मागील 6 वर्षांपासून पुढे राहून काम केले असल्याने यावेळी देखील आदिवासी युवा संघटना गवंडी बांधकाम मजूर संघटनेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करेल असा ठराव पारित झाला.
कार्यक्रम अतिशय साध्या स्वरूपात सर्व शासकीय नियमानुसार साजरा केला जाईल. फक्त प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळी हजर राहावयाचे आहे.ती संख्या 50 च्या पुढे जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड योध्याना त्यांच्या कार्यलयात जाऊन सन्मानित केले जाईल किंवा प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक कार्यालयातील एका प्रतिनिधीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी सन्मानित केले जाईल.यावेळी आदिवासी समाजहिताचे मागणी पत्र दिले जाईल. कार्यक्रम अतिशय साधा असल्याने खर्च नाही त्यामुळे कोणत्याही दानशूर व्यक्ती,शासकीय कर्मचारी,समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच लोकप्रतिनिधी यांच्या कडून देणगी स्वीकारली जाणार नाही.त्याचबरोबर या घटकांनी देखील कोणाही व्यक्तीला या वर्षासाठी जागतीक आदिवासी दिनाच्या निमित्ताने देणग्या देऊ नये, असे जाहीर करण्यात आले.
0 टिप्पण्या