आपला नम्र,....... उद्धव बाळासाहेब ठाकरे……..
आपला नम्र,
उद्धव बाळासाहेब ठाकरे……..“हे पत्र परत घेऊन जा, आणि माझ्या नावाच्या वर आपला नम्र असे म्हणा, म्हणजे मी सही करतो………” मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात सहाव्या मजल्यावरच्या दालनात समोर सहीसाठी आलेल्या काही संदेशांवर स्वाक्षरी करण्यापूर्वीचे हे श्री उद्धव ठाकरे यांचे विधान क्षणभर तिथे उपस्थितांना चक्रावून सोडणारे होते. मुख्यमंत्री म्हटल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे वागावे लागते, काही लिखित, अलिखित नियम पाळावे लागतात वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण अगदी प्रत्येक पत्राच्या खाली सहीपूर्वी आपला नम्र लिहिलेच पाहिजे का? असे विचार काहींच्या मनात होते आणि आहेतही, पण मुख्यमंत्र्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. मी लोकांचा सेवक आहे, त्यांच्या आशीर्वादाने या सर्वोच्च स्थानी बसलो आहे, मीच काय पण सर्व राज्यकर्त्यांनी नम्र असणे गरजेचेच आहे. माझ्या आई वडिलांच्या शिकवणीतून मी हे शिकलो हे ते एकदम मोकळेपणाने सांगतात.
“मला कुठलाही प्रशासकीय अनुभव नाही. मंत्रालयाची पायरी चढण्याचा प्रश्नच कधी आला नाही, पण आज मी मुख्यमंत्री म्हणून आलो असलो, तरी तुमचा अनुभव माझ्यापेक्षा मोठा आहे. जनतेच्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो पण प्रशासन म्हणून तुम्ही जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे ते सांगू शकता ……..” असे सांगणारे विनम्र मुख्यमंत्री मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लगेचच आपलेसे वाटू लागतात. मग अगदी लिफ्ट चालवणारा कर्मचारी असेल नाही तर बैठकीत चहा कॉफी आणणारे उपाहारगृहाचे कर्मचारी असतील.
एखाद्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर कधी राजकीय चर्चा करायची असेल आणि अधिकाऱ्यांना बाहेर थांबावयास सांगायचे असेल तर केवळ बसल्या जागेवरून तशी खुण न करता स्वत: जागेवरून उठून हात जोडून अधिकाऱ्यांना विनंतीपूर्वक सूचना करणारे मुख्यमंत्री विरळाच.
एका वृत्तपत्रांत चणे फुटाणे विकून उदरनिर्वाह करीत असलेल्या आणि वेळ मिळेल तसा अभ्यास करणाऱ्या दिवा येथील होतकरू विद्यार्थ्याची बातमी वाचताच त्या मुलाला इकडून तिकडून शोधून मंत्रालयात आणणारे आणि आस्थेवाईकपणे त्याच्याशी बोलून अधिकाऱ्यांना लगेच त्याची समस्या सोडविण्यास सांगणारे, किंवा शेतीच्या वादामुळे त्रस्त झालेल्या नांदेडच्या एका शेतकऱ्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजतातच थेट त्याला मलबार हिल येथील सह्याद्रीवर बोलावून घेऊन एका दिवसात त्याचा प्रश्न सोडविणारे मुख्यमंत्री हे आपल्या प्रशासनाला संवेदनशील कसे असावे असा संदेशच देतात.

काही महिन्यांपूर्वी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या एका कार्यक्रमासाठी शिवडीला गेलेले मुख्यमंत्री हे अचानक आपला वाहनांचा ताफा थांबवून आपल्याला पाहण्यासाठी वाट पाहणाऱ्या कोळी महिलांना भेटतात, त्यांच्याकडून ओवाळून वगैरे घेतात, त्यांच्याशी घटकाभर बोलतात किंवा नागपूर येथे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात दररोज आपल्या दालनाबाहेर तैनात आणि येता जाता सॅल्यूट करून ड्युटीचा भाग म्हणून आपल्यामागे प्रवेशद्वारापर्यंत पोह्चावायाला येणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास ते थांबून ते नम्रपणे सांगतात की ताई तुम्ही वारंवार अशा येऊ नका तेव्हा त्यांच्यातील विनयशीलता दिसते.
जागतिक महिला दिनाला तर मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच एक सुंदरसे गुलाबाचे फुल आणि भावनिक पत्र देऊन त्यांनी जे नाते जोडले ते तर मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच घडले. अगदी यात साफसफाई करणाऱ्या कर्मचारीसुद्धा सुटल्या नाहीत.

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आशा स्वयंसेविका या कणा आहेत हे अगदी प्रारंभापासून म्हणणारे मुख्यमंत्री या कोरोना काळात त्यांना कसे विसरतील? त्यांच्या मानधनात भरीव वाढ करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
सर्वांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सगळ्यांना हवे हवेसे वाटतात. बरं ते मुख्यमंत्री आहेत म्हटल्यानंतर आपल्यासमोर सुटाबुटातली किंवा जाकीट वगैरे, राजकीय पोशाखातील व्यक्ती समोर येईल असे भेटीस आलेल्या लोकांना वाटते, पण त्यांना जेव्हा साधा बुश शर्ट किंवा झब्बा पायजम्यातील व्यक्ती समोर दिसते तेव्हा ते चकित होतात.

सह्याद्री अतिथिगृह येथे दिल्लीत चांगली कामगिरी केलेल्या महाराष्ट्राच्या एनसीसी कॅडेटसाठी स्वागताचा एक कार्यक्रम प्रथेप्रमाणे असतो. यंदा हा कार्यक्रम या प्रत्येक कॅडेटसाठी कायम स्मरणात राहण्यासारखा झाला. ज्यांचे नाव आणि फोटो ते अनेक वर्षांपासून केवळ मिडीयात बघत होते ते उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री असणे विसरून जाऊन या मुलांमध्ये असे मिसळले होते की बघणाऱ्यांना वाटावे की हे त्यांचे विद्यार्थी दशेतील मित्रच आहेत. नागपूरला दीक्षा भूमीवर अभिवादनासाठी गेले असतांना तिथे आलेल्या शाळकरी मुलांमध्येही ते मिसळले , त्यांच्याशी हात मिळविले. मुख्यमंत्री झालोत म्हणजे आपण कुणीतरी वेगळे आहोत असे कधीही न दाखवणारे उद्धव ठाकरे म्हणूनच जास्त भावतात.
कोरोना काळात दोन तीन महिने अडकलेल्या परराज्यातील मजुरांना रेल्वे भाडे देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची तिजोरी उघडणे असो किंवा कॅन्सरग्रस्त मुलीवरील उपचारासाठी वणवण डोक्याला हात लावून पुलाखाली बसलेला बाप असो, मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पहिले माणूस म्हणून यांचे ह्र्दय द्रवते हे लोकांनी अशा कित्येक प्रसंगात अनुभवले आहे.मंत्रालयात आपल्याला भेटायला आलेल्या लोकांना , अभ्यागतांना बोलवले असो नसो, त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही हा त्यांचा आग्रह. मग कितीही उशीर होईना. स्वत: आपल्या दालनातून उठून अभ्यागत कक्षात जाणार आणि सर्वांना भेटणार. आपल्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी रांग लावू नये असे त्यांचे म्हणणे असते.
साध्या साध्या गोष्टी ते लक्षात ठेवतात. बैठकांत कुणी एखादा कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी बोलत असेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे त्याला बोलणे पूर्ण करता आले नाही किंवा आणखी काही झाले आणि तो बोलू शकला नाही तर आठवणीत ठेऊन परत त्याच्याशी संवाद साधून त्याला सन्मान देणे असो किंवा वृत्तपत्रांतील वाचकांच्या छोट्यातल्या छोट्या पत्राची दखल सुद्धा घेऊन लगेच सूचना देणे असो, मी सर्वांची दखल घेतो हा संदेश ते वारंवार देतात.

नुकतेच आषाढीसाठी पंढरपूरला गेले असता वारकरी कुटुंबियांशी अगदी जवळचे कुणी असल्यासारखे त्याची चौकशी करणे, नम्रपणे आणि झुकून त्यांना प्रणाम करण्याची त्यांची कृती सहज होती. कुठलाही दिखाऊपणा त्यात नव्हता.
कोरोना काळात घालून दिलेले नियम पाळायचे हा त्यांचा कटाक्ष. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि आपणही सुरक्षित असावे म्हणून स्वत:च आपले वाहन चालविणारे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री असतील कदाचित. स्वत: मास्क घालणार आणि बरोबरच्यांना वारंवार याबाबतीत सुचना देऊन अगदी स्वत:पासून सगळ्या गोष्टी सुरु करणार हे त्यांचे विशेष.
कुणी शुभेच्छा म्हणून दिलेले फुल सुद्धा इकडेतिकडे न टाकून देता व्यवस्थित ठेवण्याची त्यांची वृत्ती प्रभावित करून जाते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, हावभावातून ते त्यांचे सहकारी किंवा कर्मचारी यांच्याशी त्यांच्या प्रती आपला एक स्नेह आहे असा संदेश देतात आणि तो देखील अगदी सहजच. जवळजवळ प्रत्येकाला त्याच्या पहिल्या नावाने हाक मारणारे आणि असे करतांना कुठेही त्या व्यक्तीचा मानभंग होणार नाही हे पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या विनयी वृत्तीने त्यांनी प्रशासनाला आपलेसे केले आहे यात काही शंकाच नाही.

कुठलाही निर्णय घेतांना तो लादला जाणार नाही आणि यातून समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घेणारे मुख्यमंत्री जेव्हा निर्णय घेण्यामागचे कारण समजावून सांगतात, तेव्हा त्यांची भाषा, देहबोली आणि संयत शब्द समोरच्या व्यक्तीस सुखावून जातात.
त्यांच्या फेसबुक लाईव्हचे उदाहरण... तर, एखाद्या राजकीय नेत्याचा जनतेशी कसा संवाद असावा हे शिकवते असे म्हणतात. राजकारण असो किंवा प्रशासकीय गाडा ओढणे असो, आपण काय बोलतो, कसे बोलतो, कुठे कसे बोलायला पाहिजे याचे नैसर्गिक तंत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, मात्र आपल्याला बोलता येत नाही असेही विनयाने म्हणून ते लोकांना जिंकतात. मध्यंतरी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका परिषदेत केंद्रीय वित्तमंत्री यांच्या उपस्थितीत भाषण करतांना त्यांनी जनसामान्यांचे अर्थसंकल्पाविषयीचे मत त्यांनी इतक्या सहज आणि नेमक्या भाषेत मांडले की, ते सत्र त्यांनी जिंकलेच.
मी प्रशासक नाही तर तुमचा प्रतिनिधी आहे असे वारंवार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपण कारभार करणार असे नुसते सांगितले नाही तर येता जाता नजरेसमोर ते सतत राहावे म्हणून मंत्रालयात प्रवेशद्वारावर तो दगडी फलकच लावला.
फक्त जयंती, पुण्यतिथीलाच नव्हे तर मंत्रालयात आलो की आवर्जून पहिले छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून मग सहाव्या मजल्यावर जाणारी लिफ्ट घेणारा हा मुख्यमंत्री निश्चितच लोकांच्या मनातला आहे.- अनिरुध्द अष्टपुत्रे
मुख्य जनसंपर्क अधिकारी
मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय मुंबई....

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1