आता सोसायटीमध्ये प्रवेश करणा-या प्रत्येकाची होणार पल्स ॲाक्सीमीटर आणि थर्मल गनने तपासणी
महापालिका आयुक्तांचा निर्णय
ठाणे
ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता महापालिकेच्या माध्यमातून अनेकविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये येणा-या प्रत्येकाची पल्स ॲाक्सीमीटर आणि थर्मल गनच्या साहाय्याने तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. सोसायटीचे आवारात येणा-या प्रत्येक व्यक्तीची सोसायटीद्वारे पल्स ऑक्झीमीटर आणि थर्मल गनच्य साहाय्याने 24 तास तपासणी करण्यात यावी. कोव्हीडसाठी पल्स ऑक्झीमीटर तपासणी ही दिशादर्शक तपासणी असून ज्या व्यक्तीची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही 94 च्या खाली असल्यास त्यास त्वरीत पुढील तपासणी करण्याकरिता महानगरपालिकेची फिव्हर क्लिनिक अथवा खासगी डॉक्टर्स यांचेमार्फत तपासणी करुन घेण्याबाबतची सूचना देण्यासंदर्भात सूचित केले आहे.
त्याचबरोबर सोसायटीतील ज्येष्ठ व्यक्ती, 10 वर्षाखालील मुले किंवा इतर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांची पल्स ऑक्झीमीटरद्वारे तपासणी करुन त्यांची दैनंदिन नोंद सोसायटीचे स्तरावर ठेवण्यात यावी. या अनुषंगाने ज्या व्यक्तींची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ही 94 किंवा त्याखाली आल्यास अशा व्यक्तींची डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ स्वॅब टेस्ट करुन घेण्याबाबत सूचित करण्याबाबत स्पष्ट केले आहे.
सोसायटीतील कोव्हीड-19 व्यतिरिक्त इतर आजारांकरिता रुग्णालयात दाखल असणा-या रुग्णांबाबातची माहिती कृपया महापालिकेस कळवावी. जेणेकरुन केवळ कोव्हीड-19 चे अनुषंगाने माहितीचे विश्लेषण करुन वैद्यकीय विभागामार्फत पुढील मदत उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर सोसायटीचे आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल व प्रत्येक व्यक्ती मास्कचा वापर करेल याबाबतची दक्षता घ्यावी. याबाबत सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या अखत्यारीत येणा-या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना मार्गदर्शक सूचना असलेली पत्रे पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या