साहब हम भिकारी नही......बाल बच्चे के लिये थोडा दाल- चावल दो!
फुटपाथवासीय महिलेची याचना
बहुजन संग्रामचे मदत कार्य सुरूच- २१ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात शिधा वाटप
ठाणे
साहब, हम भिकारी नही है. मैं कामवाली बाई हूं. कोरोना की वजह से सोसायटीने कामपर आना मना कर दिया है. मुझे बाल बच्चे के लिये थोडा दाल-चावल दो.... ठाण्यातील तळावपाली येथे सिग्नलवर गाडी थांबताच ती महिला याचना करू लागली होती. त्या गरीब महिलेची याचना ऐकून बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आपली गाडी बाजूला घेत खाली उतरून तिची विचारपूस केली. आपल्या तीन मुलांसह फुटपाथवर राहणाऱ्या त्या महिलेचे नाव होते गौरी यादव. तिला त्यांनी पाच किलो गव्हाचे पीठ,पाच किलो तांदूळ, एक किलो गोडेतेल, एक किलो तूरडाळ, एक किलो साखर, पाव किलो चहापत्ती,एक मिठाचे पाकीट आदी वस्तूंचे एक किट दिले.
लॉक डाऊन लागू झाल्यापासून झोपडपट्टीतील हातावर पोट असलेले गरीब श्रमजीवी रहिवासी आणि आदिवासींना शिधा- किराणा वाटप करणाऱ्या 'बहुजन संग्राम' या संघटनेची गाडीच त्या महिलेने नेमकी रोखली होती. ठाण्यातील दात्यांकडून मदत कार्यासाठी मिळालेले अन्न धान्य आणि किराण्याची किट्स घेऊन ती गाडी मदत कार्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे निघाली होती. गौरी यादव या फुटपाथवर राहणाऱ्या महिलेचा हा हृदयस्पर्शी किस्सा गेल्या मंगळवारचा असून बहुजन संग्रामने मंगळवारी आणि बुधवारी दिडशेच्यावर गरिबांना शिधा- किराणा वस्तूंचे वाटप केले.
त्यानंतर बहुजन संग्रामने दैनिक ' वृत्तमानस' चे पत्रकार संजय गिरी यांनी गरजू गरिबांच्या दिलेल्या यादीप्रमाणे घाटकोपर भटवाडी, मोहिली व्हिलेज,चांदीवली संघर्ष नगर,साकिनाका या भागात शिधा आणि किराणा वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर पुढे गोरेगाव येथील आरे कॉलनी,मालाड येथील आप्पापाडा येथील गरजूनाही किटसचे वाटप करण्यात आले.प्रत्येक किटमध्ये एक हजार रुपये किमतीचा शिधा- किराणा असतो, असे चिलगावकर यांनी सांगितले.
येत्या २१ जुलै मंगळवार रोजी १२०० गरजुंना ठाणे जिल्ह्यात डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर,या भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, बहुजन संग्रामचे हे मदत कार्य १५ ऑगस्ट पर्यंत राज्यात सुरूच राहणार आहे. त्यात बहुजन संग्रामच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रंजनाताई कांबळे, संघटन सचिव विनोद कांबळे, तेजस वाघ आदी पदाधिकाऱयांचा सहभाग आहे.
बहुजन संग्रामने १४ एप्रिलच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला या मदत कार्याचा प्रारंभ केला होता. त्याचा सहावा टप्पा गेल्या आठवड्यात ७ आणि ८ जुलै रोजी सलग दोन दिवस पार पडला. त्यापूर्वी मुंबईतील पहिल्या टप्प्यात १६००, दुसऱ्या टप्प्यात ७००,तिसऱ्या टप्प्यात ९०० कुटुंबाना शिधा- किराणाचे वाटप करण्यात आले. चौथ्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातच ६०० आदिवासी कुटुंबाना मदतीचे वाटप करण्यात आले. पाचव्या टप्प्यात त्याच जिल्ह्यातील घोडमाळ या आदिवासी गावातील रहिवाशाना शिधा आणि किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉक डाऊनमुळे रूरोजगार गमावलेल्या गरीब श्रमजीवी लोकांना बहुजन संग्रामतर्फे १४ एप्रिलपासून शिधा आणि किराणा वस्तूंचे वाटप टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महापालिका, महसुल, जल सिंचन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आदी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मानवतावादी कार्यासाठी हातभार लावला असल्याची माहिती चिलगावकर यांनी दिली.
0 टिप्पण्या