Top Post Ad

भाजप, काँग्रेससह ठाणेकरांच्या विनंतीनंतरही आयुक्तांनी वाढवला लॉकडाऊनचा कालावधी

भाजप, काँग्रेसच्या विनंतीनंतरही आयुक्तांनी वाढवला लॉकडाऊनचा कालावधी


 ठाणे


कोविड-१९ विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी १९ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत आदेश क. ६ अन्वये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.  मात्र परिस्थितीवर अद्याप नियंत्रण न आल्याने हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन वाढविणे आवश्यक असल्याने  साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबंधित तरतूदींसह प्राप्त अधिकारांचा वापर करुन हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये ३१ जुलै सायंकाळी ५  वाजेपर्यंत लॉकडाऊन कायम राहिल असे ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे.


हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने दिनांक २९ जून, २०२० रोजीचे उपरोक्त संदर्भ क्र. ४ चे आदेशान्वये जाहीर केल्याप्रमाणे Mission Begin Again सुरु राहिल, यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने P-1 व P-2 तत्त्वावर चालविण्यास परवानगी असेल. ( रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज, इत्यादी समतारखांना उघडले जावेत. तर दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखेला उघडली जावीत.) सदरची दुकाने सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०५.०० या वेळेत उघडी राहतील, P-1 व P-2 हे संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी ठरवतील. असेही ठाणे महानगर पालिकेने १८ जुलै रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने १९ जुलै पर्यन्त ठाणे शहरात लॉकडाऊन केले आहे मात्र या लॉकडाऊनमुळे लहानसहान उद्योगाना, कामगारांना बसलेला फटका लक्षात घेऊन १९ जुलै नंतर कालावधी वाढवू नका असा आशयाचे विनंती करणारे पत्र ठाणे शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्तांना १८ जुलै रोजी देण्यात आले होते. त्याआधी भाजपानेही लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही आयुक्तांनी लॉक़डाऊनचा कालावधी वाढवून सदर पत्रांना केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये रंगली आहे. 

 

करोनावर मात करण्यासाठी लॉकडाउन हा उपाय नसला तरी एक पर्याय नक्की आहे. प्रशासनाला व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना शिस्त लागण्यासाठी लॉकडाउन गरजेचा होता. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केल्यास पुन्हा लॉकडाउन घेण्याची वेळ येणार नाही.असे मत व्यक्त करीत महापौर नरेश म्हस्के यांनी लॉक़़डाऊनचे समर्थन केले आहे.  
 

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाब म्हणून भाजी विक्रेता, औषधांची दुकाने, दूध, पेट्रोल पंप या बाबींना मान्यता देत असताना दारूची दुकाने यांनाही शासनाच्या निर्देशानुसार विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी काही प्रमाणात का होईना गर्दी होत असते. असे असताना या सर्व उद्योगधंद्यांवर मेहरनजर दाखवून दुसरीकडे रोज हातावर पोट असणारे फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला, वृत्तपत्र विक्रेते, गाड्या धुणारे कामगार, प्लंबर, वायरमन व इतर छोटे-मोठे व्यापारी यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. असे हे दुटप्पी धोरण मनाला पटणारे नसून या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे यापुढील काळात लॉकडाऊन वाढवू नये अशी शहर काँग्रेसने भूमिका घेतली आहे.  

 लॉकडाऊन वाढविण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अटीशर्ती घालून उद्योगाना परवानगी देणें गरजेचे आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. वेळेचे बंधन, स्वच्छता, सामाजिक अंतर, स्वतः वाहतूक व्यवस्था करणे, आदी अटीशर्तींवर लॉकडाऊन शिथिल करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे ठाणे शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

 

ठाण्यातील लघु उद्योजकांच्या 'टीसा' संघटनेने यापुढे लॉकडाउन करू नये, असे आर्जव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले. २० जुलैपासून सर्व प्रकारचे उद्योग व व्यवसाय संपूर्ण काळजी घेऊन सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. लॉकडाउनपेक्षा करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करावे आणि लघु उद्योजकांची आर्थिक कोंडी सोडवावी. त्यासाठी उद्योजकांकडून प्रशासनाला सहकार्या करण्यात येईल, अशी भूमीका टीसाचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन खांबेटे यांनी व्यक्त केली होती.

दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या साखळीत परवानगी मिळूनही ठाण्यातील घाऊक अन्नधान्य विक्रेत्यांना लॉकडाउनच्या झळा बसल्या आहेत. महापालिकेने घाऊक मार्केट बंद केल्यामुळे सध्या लाखो रुपयांची अन्नधान्य विक्री बंद झाली आहे. पावसाळ्यात अन्नधान्याचा साठा खराब झाल्यास मोठा धोका उद्भवण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. याशिवाय शहरातील हॉटेल व्यवसायिक, कामगार, कलाकार, रिक्षा-टॅक्सी चालक अशा सर्वांकडूनच शिस्त पाळून करोना रोखण्याची गरज व्यक्त होत असतानाही प्रशासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने सर्वत्र नाराजीचा सुर उमटला आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com