Top Post Ad

उद्रेक झाल्यानंतरच सरकार सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करणार का

 उद्रेक झाल्यानंतरच सरकार सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करणार का


ठाणे


तीन महिन्याच्या प्रदिर्घ कालावंती नंतर मिशन बिगेन अगेन मोहिमेची सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आली. शहरातील छोटे-मोठे उद्योगधंदे व खासगी कार्यालये काही निर्बंध घालून सुरु करण्यात आली.  मात्र  सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत सुरु झालेली नसल्याने खासगी कार्यालयांमध्ये कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच ‘रखडपट्टी’चा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. कामावर जायचे तरी कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचा उद्रेक झाला होता. तसाच उद्रेक झाल्याशिवाय सरकार सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत करणार नाही का? असा संतप्त प्रश्न खासगी कार्यालयात कामावर जाणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.



15 जूनपासून सरकारने सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे उपनगरीय सेवा सुरु केली आहे. सर्वसामान्य नोकरदारांना या लोकलमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी कार्यालय गाठण्यासाठी खासगी कर्मचाऱयांना रोजच तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे लोकल सेवा बंद असल्याने  खासगी कर्मचाऱयांना दुसऱ्या शहरात कामावर जाण्यासाठी एसटी, बेस्ट, एनएमएमटी बस आणि खासगी वाहने, रिक्षा मधून प्रवास करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर मर्यादा आल्याने सर्वसामान्य नोकरदारांना खासगी वाहने आणि रिक्षा मधून प्रवास करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना कामानिमित्त ये-जा करण्यासाठी एसटी, बेस्ट आणि एनएमएमटी बसचाच नाईलाजाने आधार घ्यावा लागत आहे. मात्र यामध्ये नेहमीच अनियमितता आहे.
बससाठी रांगेत ताटकळत उभे राहणे, वाहतूक कोंडी, खासगी वाहन आणि रिक्षा चालकांनी चालवलेली आर्थिक लूट याचा अनुभव नित्य येत आहे. कामावर जाण्यासाठी पदरमोड करुनही खासगी कर्मचाऱ्यांना रोजच आटापिटा, जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सरकारने खासगी कार्यालय, कंपनी मधील कर्मचारी वर्गासाठी पुरेशी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध केलेली नाही. एसटी, बेस्ट, एनएमएमटी बसमधून मर्यादित प्रवासी वाहतूक होते. बस उशिरा येत असल्याने कामावर जाण्यासाठी उशीर होतो. कामावर गेलो नाही तर नोकरी जाण्याची भीती, नोकरी टिकविण्यासाठी अक्षरश जीवावर उदार होऊन कर्मचारी रोज कामाचे ठिकाण गाठत आहेत. या सर्व गोष्टींच्या उद्रेकाची सरकार वाट पहात आहे का असा  सवाल प्रत्येकजण विचारत आहे.


बसभाडे परवडत नसतानाही, ‘नोकरी गेली तर पुढे जगायचे कसे?’ या विवंचनेत असलेले खासगी कर्मचारी खिसा रिकामा करुन, रखडपट्टी सहन करुन दररोज कार्यालयात जात आहेत. उपनगरीय रेल्वे लोकलच्या तुलनेत सरकारने पर्यायी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध न केल्याची झळ नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, टिटवाळा आदी शहरातील खासगी कर्मचाऱ्यांना सोसावी लागत आहे. ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमध्ये येण्या-जाण्यासाठी एसटी आणि एनएमएमटी बस सुविधा खासगी कर्मचाऱ्यांसाठी आहे. मात्र, ती खूपच अपुरी आहे. थेट ठाणे-वाशी दरम्यान एसटी आणि बेस्ट बस सुविधा उपलब्ध नाही, परिणामी ठाणे-वाशी दरम्यान प्रवास करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून काही सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत होण्याची वाट न पाहता सार्वजनिक प्रवासी सेवा सुरळीत करण्याची मागणी सर्वसामान्य नोकरदारांमधून जोर धरु लागली आहे. खासगी प्रवाशांना रोजीरोटीसाठी रस्ता मार्गे, ताटकळत प्रवास करुन, प्रवासासाठी पर्यायी वाहनांची संख्या कमी असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करुन कार्यालय गाठण्याचे दिव्य रोजच पार पाडावे लागत आहे. एकीकडे ‘कोरोना’चे संकट तर दुसरीकडे कामावर जाण्यासाठी करावी लागणारी जीवघेणी कसरत, या दुहेरी कात्रीत सर्वसामान्य नोकरदार सापडला आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com