धाडसी मराठी टॅक्सीचालक महिला...

धाडसी मराठी टॅक्सीचालक महिला...
'स्मिता अशोक झगडे'आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑफिसची गाडी बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर कालिना ते सायन स्टेशन पर्यंत ऑटोने यावे लागले. पावसाची रीपरीप थोडीशी चालूच होती. तोंडावर मास्क त्यामुळे डोळ्यावर असलेल्या चष्म्यावर धूकं जमलेलंं... घाईघाईत ऑटोतून उतरतानाच टॅक्सी स्टँडवर असलेल्या एका टॅक्सीकडे हात दाखवत सवयीप्रमाने मोठ्याने विचारले, "बरकत अली नाका चलोगे क्या?" त्याच वेळी ड्रायव्हर सीटच्या बाजूचा दरवाजा उघडत एक हसऱ्या डोळ्यांचा चेहरा बाहेर डोकावत बोलला, "कुठे...?" तोवर माझ्या चष्म्याची काच क्लीअर झाली होती. आता मला स्पष्ट दिसले, ती एक महिला होती...


मी थोडा गोंधळलो... मागे फिरणारच होतो, इतक्यात पुन्हा प्रश्न आला, "कुठे जायचेय?" मी गोंधळलेल्या चेहऱ्याने कसेतरी हसत (मास्कमुळे न दिसलेले) मराठीत बोललो, "बरकत अली नाका, वडाळा." त्या म्हणाल्या, "बसा सर." ...मी आणि आझे एक सहकारी दोघे आत बसलो. नवीकोरी टॅक्सी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून, पुढच्या आणि मागच्या सीटमध्ये प्लास्टीकचा पारदर्शक पडदा. टॅक्सी स्टार्ट करून त्यांनी विनंती केली, "सर, मला रस्ता गाईड करा प्लीज." मी हो म्हणालो. असे विचारणारा ड्रायव्हर नवा असतो हे सांगायला नको. थोड्यावेळाने सरदार नगर, सायन कोळीवाडा येथे माझे सहकारी उतरले.


महिला टॅक्सी ड्रायव्हर, विशेष म्हणजे आपली मराठी महिला, असलेल्या टॅक्सीत मी प्रथमच प्रवास करत होतो... त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ईच्छा झाली. त्यांचा प्रतिसाद कसा असेल याचा विचार करत होतो. बरकत अली नाक्यापर्यंत प्रवासात त्यांच्याशी बोलावे म्हणून विचारले, "किती वर्षं झाली टॅक्सी चालवता?" त्या म्हणाल्या, "एक महिना झाला.... "त्यांचे उत्तर आणि माझे प्रश्न असा प्रवास चालू होता... काळाचौकी येथे राहणाऱ्या या धाडसी महिलेचे नाव स्मिता अशोक झगडे.


लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली... चिंचपोकळी येथील प्रसिद्ध शोरूम लॉकडाऊनकाळात बंद असल्याने तिथली नोकरी नसल्यातच जमा. कुटुंबाची जबाबदारी, वाढत्या महागाईमध्ये पती-पत्नी दोघेही कमावते असले, तरच निभाव लागेल अशी परिस्थिती. हाताला काम नाही... ड्रायव्हींग लायसन्स २०१२ला बनवून घेतले होते. मग डोक्यात विचार आला, खचून न जाता नव्या क्षेत्रात धाडस करायचे. 
एका महिलेने टॅक्सी चालवणे हा विचार तसा सहजा-सहजी कोणालाही न पटणाराच. 
पाय ओढणाऱ्या आपल्याच लोकांचा नेहमीचा बुरसटलेला प्रश्न तयार होताच, "लोकं काय म्हणतील??" पण हे अपेक्षित होतेच. 


काठावर बसून बुडणाऱ्याची मजा पाहणाऱ्या लोकांची पर्वा न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडता येणे हीच मोठी गोष्ट. स्मिता झगडे यांनी घरातल्यांच्या पाठबळावर टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला... त्यांना रोज वेगवेगळे अनुभव येतात, पण इतरांना वाटते तशी 'आमची मुंबई' वाईट नाही याचाही त्यांना विश्वास वाटतो. 


ड्रायव्हींग करत असताना मुंबईच्या रस्त्यांची पुरेशी माहीती नसते तेव्हा प्रवाश्यांनाच  विनंती करण्याची त्यांची तयारी असते. प्रवाश्यांशी वागताना सौजन्य हा महत्वाचा गुणधर्म त्यांच्या अंगी जाणवला. विशेष म्हणजे त्यांनी भाडे नाकारले नाही. (भाडे नाकारणे हा इथल्या टॅक्सीचालकांचा जन्मसिध्द अधिकार आहे की काय असे वाटते.) प्रवाश्यांच्या प्रतिक्षेत असताना ड्रायव्हर सीटवर महिला पाहून कधी कधी लोकं न विचारताच पुढे जातात. बरेचदा लोकांना कुतुहल वाटते. महिलांना असे काही वेगळे करताना पाहण्याची सवय नसल्याचा हा परिणाम असेल. स्मिता झगडे यांच्याशी बोलताना एक गोष्ट सतत मनात येत होती... यांच्या धाडसाची दखल माध्यमांनी घेतली पाहीजे. महिला सबलीकरणाच्या फक्त गप्पा मारून चालणार नाही. अशा वेगळ्या वाटा निवडणाऱ्या हिरकणींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. स्मिता झगडे सारखी परिस्थितीवर मात करू पाहणारी स्त्री इतर स्त्रियांसाठी उदाहरण असते. 


कोणतेच काम लहान-मोठे नसते.  तुमची मानसिकता आणि स्वत:ला स्वयं-प्रकाशित करण्याची जीद्द तुमच्या कामाचा दर्जा ठरवते. परिस्थितीपुढे हतबल होणारे, खचून जाणारे समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत. समाजाचे खरे आदर्श असतात ते स्मिता झगडे यांच्यासारखी सामान्यांतली असामान्य माणसं... अशा धाडसाला हवी असते ती प्रोत्साहनाची शाबासकी, आत्मविश्वास वाढवणारे दोन शब्द. त्यांची लढाई ते लढत असतात आपण फक्त लढ म्हटले तरी त्यांना हत्तीचे बळ मिळते. 


मी असेच त्यांच्या धाडसाला प्रोत्साहन दिले. बरकत अली नाका आल्यावर एक फोटो काढू का विचाले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. मास्क घातलेला एक फोटो क्लिक केल्यावर त्यांनीच मास्क बाजूला करून दुसरा फोटो काढायची परवानगी दिली. नंतर माझा मोबाईल नंबर मागून घेतला. त्यांचे नाव पत्ता दिला. मुंबईसारख्या ठिकाणी २५-३० मिनीटांच्या प्रवासातल्या ओळखीत आपल्यावर कोणी असा विश्वास दाखवते, तेही एक महिला, तेव्हा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच वाढलेली असते. 


मित्रांनो, स्मिता अशोक झगडे यांची मुंबईतल्या प्रवासात कधी, कुठे भेट झाली तर त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका...!


--- सुहास मुकुंद मोरे 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1