Top Post Ad

पारदर्शक बॉडी बॅगचा महापालिकेचा निर्णय

पारदर्शक बॉडी बॅगचा महापालिकेचा निर्णय


ठाणे


ग्लोबल हब येथील मृतदेह अदलाबदलीच्या गोंधळप्रकरणातील दोषींवर कारवाई करतानाच महापालिकेने पारदर्शक बॉडी बॅग व मनगटावर टॅग लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्लोबल हब येथील रुग्णालयात मृतदेह अदलाबदलीच्या गोंधळापूर्वी 2 महिन्यापूर्वीही वाशी येथेही मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापालिकांच्या आयुक्तांना पत्राद्वारे पारदर्शक बॉडी बॅगसाठी आग्रह धरला होता. मात्र, याबाबत निर्णय घेण्यात येत नव्हता. 
ग्लोबल हब येथील प्रकार उघड झाल्यानंतर, त्यात पारदर्शक बॉडी व मनगटावरील टॅगमुळे ही घटना टाळता आली असती, हे स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्याच्या दौर्‍यात हा मुद्दा अधोरेखित केला होता. ग्लोबल हब येथील घटनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याशी झालेल्या चर्चेतही पारदर्शक बॉडी बॅगची गरज व्यक्त करण्यात आली होती. ती मागणी आयुक्तांनी मान्य करून पारदर्शक बॉडी बॅग व मनगटावरील टॅगची तातडीने खरेदी करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.


महापालिकेच्या ग्लोबल हब येथील रुग्णालयातील गोंधळ प्रकरणी भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारींची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली असून कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश शर्मा यांची बदली करण्यात आली आहे तर चार नर्सना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या रुग्णालयात भालचंद्र गायकवाड यांना बेपत्ता दाखविण्यात आले होते. मात्र त्यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे यांच्या कुटुंबियांना देण्यात आला तर सोनावणे यांच्यावर मोरे नावाने उपचार सुरू होते. या प्रकरणी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यपाल तसंच महापालिका आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत आज संध्याकाळी पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली.


डॉ. योगेश शर्मा यांची मूळ पदावर राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिक्षक पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नर्स पूजा सावंत, जीरा धनका, रवीना आणि कामिनी भोईर यांना रुग्णालयाच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची बैठक व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोविड हॉस्पिटलच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान या कारवाईचे निरंजन डावखरे यांनी स्वागत केले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com