निषेध कोणाचा करायचा
आमच्या काळजावर दगडफेक करणा-याचा की त्याच्या डोक्यात ज्यांनी हे कृत्य करण्यास फितवले त्या कुटील व नीच प्रवृत्तीचा.? करोडो जनतेचे प्रेरणास्थान असणा-या राजगृहावर दगडफेक करून उसळणा-या प्रतिक्रिया अजमावत पुढील रणनीती आखणा-यांचा निषेध करावा की आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळून स्वतःचा वैयक्तिक विकास घडवून आणणा-या नेत्यांचा करावा? बाबासाहेबांच्या कठीण कालखंडात जेव्हा जातीयवाद प्रचंड होता त्यावेळीही जेवढे अत्याचार झाले नाहीत त्याच्या दसपट अत्याचार आजच्या स्वातंत्र्य व लोकशाहीच्या कालखंडात होत आहेत त्या अत्याचार करणा-या नराधमांचा निषेध करायचा की त्या अत्याचाराविरूद्ध ब्र ही न काढणा-या नपुंसक समाजाचा करावा? पोलीस, न्याय व्यवस्था, शैक्षणिक संस्था, राजकारण, इ. सर्वच क्षेत्रात पदोपदी चिरडले जाऊनही त्यांना नक्षलवादी ठरवूनही या देशावर मनोमन प्रेम करणा-यांचा निषेध करावा की हा अन्याय सहन करणा-यांचा निषेध करावा. आजपर्यंत फक्त निषेध व्यक्त करणा-या माझा स्वतःचा निषेध करावा?
मित्रांनो आपल्याला ही समाजव्यवस्थाच बदलायची असेल तर पेटून उठा व चेतवा. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान दहा लोकांना तरी आंबेडकर समजावून सांगा. आपल्या येणा-या पीढीला बाबासाहेब समजु द्या. तीच पुढच्या लढाईची फौज असणार आहे.
बाबासाहेब व रमाईच्या वास्तव्याने पुलकित झालेले राजगृह राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे. त्यासाठी वारसदारांचे पुनर्वसन लगतच करून व योग्य मोबदला देऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. समाजानेही हातभार लावला पाहिजे व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
- बाबा रामटेके (कल्याण)
0 टिप्पण्या