निवडणूक आयोगाचे सोशल मिडीयाचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याला
मुंबई
विधानसभा निवडणूक २०१९ च्या वेळी भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे कंत्राट हे एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला दिले. असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इतकेच नव्हे तर तो पदाधिकारी भाजपच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. म्हणूनच आपण या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे २४ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु या प्रकारावरून असे स्पष्ट दिसून येते की महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. उपरोक्त घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोग – भाजप यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम भाजपच्या आयटी सेलच्या कंपनीला देण्यात आले होते. त्याचा भंडाफोड करणाऱ्या व्यक्तीच्या घरी आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी काल २४ जुलै रोजी धडक दिली. माहीती कार्यकर्ते साकेत गोखले राहात असलेल्या ठाण्यातील परिसरात जाऊन 'जय श्रीराम'ची घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्यांचा व्हिडीओ साकेत गोखले यांनी चित्रीत करून तो ट्विटरवरून जाहीर केला. 'आरएसएसचे कार्यकर्ते माझ्या घराबाहेर 'जय श्रीराम' घोषणाबाजी करीत आहेत. ते माझ्या आईला धमकी देत आहेत. तातडीच्या मदतीची विनंती आहे' असा मेसेज लिहून गोखले यांनी अनिल देशमुख आणि ठाणे पोलिसांना टॅग केले आहे. गोखले यांच्या या संदेशाची गृहमंत्री देशमुख यांनी तातडीने दखल घेतली. आम्ही या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिल्याचे देशमुख यांनी गोखले यांना प्रत्युत्तर दिले.
0 टिप्पण्या