म्हणून झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे

सार्वजनिक शौचालयांमधून होतोय कोरोनाचा सर्वाधिक प्रसार
उपाययोजना करण्याची भैय्यासाहेब इंदिसे यांची मागणी ठाणे


 राज्यातील बहुतांश लोकवस्ती ही झोपडपट्टी आणि बैठ्या घरांमध्ये आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी, पनवेल, नवी मुंबई आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक झोपडपट्ट्यांमध्ये रहात आहेत. 10 बाय 15 फुटांच्या घरात राहणार्‍या या लोकांना घरात स्वतंत्र शौचालय बांधणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये सार्वजनिक शौचालयांचाच वापर या लोकांकडून अधिक प्रमाणात होत असतो. सध्या राज्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. यामागे सार्वजनिक शौचालये हे मोठे कारण आहे. त्यामुळे शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्वीटही केले आहे. 


अनेकदा तर या शौचालयांमध्ये पान खाऊन पिचकार्‍या मारणारे अनेकजण दिसून येतात. थुंकीतून कोरोनाचा फैलाव अधिक होत असल्याचे अनेक संशोधकांनी सांगितलेले आहे.  गेल्या काही दिवसांचा आढावा घेतल्यास ठाणे शहरात वागळे इस्टेट आणि कळव्यातील पूर्वेकडील भागात कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने झाला होता किंवा होत आहे. दुसरीकडे कल्याणमध्येही अशाच पद्धतीने कोरोना रुग्णांनी उच्चांकी संख्या गाठण्यास सुरुवात केली आहे. कधीकाळी ज्या कल्याणमध्ये दिवसाला 100 रुग्ण आढळत नव्हते; त्याच कल्याणमध्ये आता दिवसाला सुमारे अडीचशे रुग्ण आढळत आहेत. ही सर्व आकडेवारी झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या गोरगरीब जनतेची आहे.


श्रीमंतांनी परदेशातून आणलेल्या या आजारामध्ये आता गोरगरीब लोक बळी पडू लागले आहेत. या गोरगरीबांना वाचविण्यासाठी शौचालयांची स्वच्छता अधिक महत्वाची ठरणार आहे; एवढेच मव्हे तर या शौचालयांची सफाई करणार्‍या कर्मचार्‍यांनाही पीपीई किट  देण्यात यावे;   आजमितीला अनेक शौचालये ही विविध संस्थांच्या ताब्यात आहेत. त्याचे ठेके स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. मात्र, या ठेकेदारंकडून अपेक्षित स्वच्छता पाळली जात नाही. याचा गांभीर्याने विचार करुन सरकारने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असे आवाहन इंदिसे यांनी केले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या