श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या मालकाला कारावासाची शिक्षा
नवी मुंबई
पनवेल तालुक्यातील चिपळे येथे नियोजित गृहप्रकल्पातील फ्लॅट विक्रीच्या अमिषाने ११२ फ्लॅट बुकींगधारकांची फसवणूक झाली. या ग्राहकांना तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला. शंकर नांगरे हा श्री साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचा मालक आहे. त्याने ४ वषार्पूर्वी पनवेलच्या चिपळे भागात साई अंबर रेसिडेन्सी नावाने भव्य गृहप्रकल्प उभारत असल्याची जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीला भुलून ११२ सर्वसामान्य नागरिकांनी नांगरे आरोपीच्या गृहप्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग केली. फ्लॅटच्या बुकींगपोटी त्यांनी आरोपीला तब्बल ४ कोटी ५४ लाख रुपये दिले होते. मात्र त्यानंतर नांगरे याने गृहप्रकल्पाचे कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले नाही. तसेच नागरिकांना त्यांच्या बुकींगची रक्कमही परत न करता पोबारा केला. खांदेश्वर पोलिसांनी नांगरे विरोधात फसवणुकीसह मोफा कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला.
याप्रकरणी नांगरे याला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पनवेल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी ही शिक्षा देत ५० हजार रुपये दंडही लावला. या प्रकरणात न्यायालयाने भरडल्या गेलेल्या पीडित फ्लॅट बुकींगधारकांना त्यांच्या रक्कमेवर ६.५ टक्के व्याज देण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या निकालामुळे सर्वसामान्यांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणाºया बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आरोपी शंकर नांगरे याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणी दरम्यान, आरोपी नांगरे याने पीडित फ्लॅट बुकींगधारकांना ५० लाख रुपये परत केले. परंतू उर्वरीत ४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम त्याने परत न केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी शंकर नांगरे याला सप्टेंबर २०१८ मध्ये अटक करुन त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. त्याच्या विरोधात पनवेलच्या प्रथम वर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हापासून आरोपी नांगरे हा न्यायालयीन कोठडीत आहे. मागील वर्षभर या खटल्याचे पनवेल येथील न्यायालयात कामकाज सुरु होते.
0 टिप्पण्या