वसईतही वीज कार्यालयांमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांची गर्दी
वसई :
मागील तीन दिवस वसई तालुक्यातील सर्वच भागातील वीज कार्यालयांमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. रविवारीही अनेक केंद्रांवर तक्रारींसाठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती. मात्र आता टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही, अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने ती वाढीव दिली असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. यावर वसई महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता मंदार अंत्रे म्हणाले की, टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकांना सरासरी वीजदेयके देण्यात आली आहेत.जून महिन्यापासून मीटर रीडिंग घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील.
महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वीजदेयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विविध विभागीय कार्यालयांत फेन्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आधीच वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यातच बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या