कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ
मुंबई
अत्यावश्यक सेवेतील कामगार असलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी लॉकडाऊनच्या काळातही काम सुरू ठेवले आहे. लोकल बंद असल्याने या कामगारांची ने-आण करण्यासाठी शटल सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेत प्रचंड गर्दी होत असून चढायलाही जागा मिळत नसल्याने या कामगारांनी अखेर रेल्वे रोको केला. विद्याविहार येथे रुळावर उतरून या कामगारांनी रेल्वे रोको केल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणा-या रेल्वे कर्मचा-यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासूनच ही रेल्वे भरून येत असल्याने या मधल्या स्टेशनवरील या कामगारांना रेल्वेत चढायलाही मिळत नाही. कुर्ला, विद्याविहार येथे तर गाडीला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेक कामगारांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर आज या कामगारांच्या संतापाचा उद्रेक झाला. या कामगारांनी थेट रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे सुमारे अर्धातास ही रेल्वे कुर्ला-विद्याविहार स्टेशनवर खोळंबून होती. शटल सर्व्हिसच्या संख्येत वाढ करा, अशी मागणी हे कामगार करत होते. रेल्वेत गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचेही या कामगारांनी सांगितले. जीव धोक्यात घालून आम्ही प्रवास कसा करणार? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच अधिका-यांनी धाव घेऊन या कामगारांना समजावले. त्यानंतर रेल्वे सुरू झाली.
0 टिप्पण्या