Top Post Ad

रस्त्यांशेजारील वाफाळत्या चहाचा आस्वाद पुन्हा घेणे शक्य होणार

रस्त्यांशेजारील वाफाळत्या चहाचा आस्वाद पुन्हा घेणे शक्य होणार



मुंबई:


काचेच्या ग्लासऐवजी पेपर ग्लासला प्राधान्य देणे, चहा केंद्राच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणे, चहाविक्रेत्याने स्वतः मास्क, हातमोजे परिधान करावे, ग्राहकासही मास्कबाबत आग्रह करावा अशा काही अटीशर्तीसह मुंबईतील चहा केंद्रे पुन्हा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. संचारबंदीच्या आदेशात शिथिलता मिळताच लवकरच राज्यभरात विशेषतः मुंबईत कोव्हिडपासून सुरक्षित असलेली चहा केंद्रे सुरू करण्याचे नियोजन टी अँड कॉफी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांतच चहाविक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असून, करोना संकटामुळे गायब झालेल्या रस्त्यांशेजारील वाफाळत्या चहाचा आस्वाद पुन्हा घेणे शक्य होणार आहे.


मुंबईत जवळपास १२ हजारांहून अधिक चहाविक्रेते कार्यरत असून यापैकी बहुतांश विक्रेते आपापल्या मूळगावी परतले आहेत. मात्र भूमिपुत्र असलेले चहाविक्रेते भविष्यात आपला व्यवसाय सावरण्यासाठी संचारबंदी शिथिल होण्याची आदेश पाहत होते. त्यानुसार केंद्र तसेच राज्य सरकारकडून शिथिलता आणण्याबाबत सकारात्मक इशारा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कुठलाही खाद्यव्यवसाय सुरू करताना यापुढे ग्राहकांची मागणी लक्षात घ्यावी लागणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तर संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक आमच्याकडे येतील का, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.


त्यामुळे चहाविक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टी अँड कॉफी असोसिएशनने यावर तोडगा म्हणून कोव्हीड विशेष मार्गदर्शक तत्त्वे (नियमावली) तयार केली आहेत, असे टी अँड कॉफी असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी सांगितले. या नियमावलीनुसार, असोसिएशनने नियुक्त केलेली डॉक्टरची टीम चहाविक्रेत्यांची तपासणी करून त्यांना फिट असल्याचे प्रमाणपत्र देईल. त्यानंतरच सदर विक्रेत्यास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच सुरक्षित वावर राखून चहाची विक्री कशी करावी याबाबत नियमावलीत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत प्रत्येक नोंदणीकृत चहावाल्यास ड्रेसकोड बंधनकारक असणार आहे. आमचा व्यवसाय सांभाळताना आमच्या ग्राहकांचे आरोग्य जपणे याला निश्चितच प्राधान्य असणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत आयुष मंत्रालयाने शिफारस केल्यानुसार ब्लॅक मसाला चहाची विक्री करण्याबाबत विक्रेत्यांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाईल.असेही वाकोडे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com