माजिवडा ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील कोव्हिड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
ठाणे
ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रुग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. ठाण्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या १ हजार खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. करोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी ५०० खाटा विनाऑक्सिजन, तर ५०० खाटा ऑक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असतील; शिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलिसिस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा देखील येथे असणार आहेत.
गेले दोन आठवडे हे रुग्णालय उभारण्याचे काम दिवस-रात्र सुरू असून गुरुवारी शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त विजय सिंघल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘तात्पुरत्या स्वरुपातील हे रुग्णालय असले तरी जागतिक दर्जाच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत,’ असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या