कळवा रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक हवालदील
ठाणे
ठामपाच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने हनुमाननगर येथील एका नागरिकाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाइकांच्या स्वाधीन केला. अहवाल नसल्याने त्याच्या दफनविधीसाठी अनेक नातेवाईकांनी हजेरी लावली. मात्र त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे महानगर पालिका रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका अनेकवेळा प्रशासनाला बसला आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ठाणेकर नागरिक करीत आहेत.
कोरोनाशी संपूर्ण देश लढत आहे. पोलिस प्रशासन रात्रंदिवस जागता पहारा देत आहे अशा स्थितीत रुग्णालयाच्या बेजबाबदारीमुळे पोलिस प्रशासनावर ताण आला आहे. मृत व्यक्तीच्या अत्यविधीसाठी जमा झालेल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळीना शोधण्यासाठी आता पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे. अशा प्रकारची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी लोकमान्यनगर भागात एका मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत येथील बाधितांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. दिघा भागातील एक व्यक्ती येथे उपचारासाठी दाखल झाली होती. परंतु, तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांना दिला होता. त्यानंतर आता ही तिसरी चूक रुग्णालयाकडून झाली आहे. हनुमाननगर भागातील या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कळवा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, ३० एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. या कालावधीत त्याची कोरोना चाचणीही केली होती. परंतु, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. मात्र, रविवारी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयाच्या या भोंगळ काराभाराचा फटका येथील नागरिक, पालिका प्रशासन व पोलिसांनाही भोगावा लागणार आहे.
.
0 टिप्पण्या