Top Post Ad

परप्रांतियांसोबत राज्यातील मजूरांचीही अद्याप पायपीट सुरूच

परप्रांतियांसोबत राज्यातील मजूरांचीही अद्याप पायपीट


कल्याण



लॉकडाउन काळात हाताला काम नसल्याने आणि मिळणारी मदत अतिशय अल्प असल्याने राज्यातील कामगार आणि मजुरवर्गावर संकट कोसळले आहे.  उपासमारीने मरण्यापेक्षा अनेकांनी पायी गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे.  नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली. परिणामी मिळेल त्या वाहनाने ही मंडळी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परप्रांतीय मजुरांपाठोपाठ आता नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, नागपूरसह अन्य भागात जाणारे मजूर, कामगारांचे लोंढेही बाहेर पडले असून त्यापैकी अनेकांना घरमालकांनी घराबाहेर काढल्याने त्यांच्यापुढे गावाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
 या लोंढ्यांना कसारा येथील लतिफवाडी, इगतपुरी चेक पोस्ट येथे अडवले जात आहेत. नाशिकहून गाड्या सोडल्या जात आहेत, आम्हाला सोडा, अशी विनवणी हे मजूर पोलिसांना करत होते. कामगारांचा हा टाहो पाहून यंत्रणांचे मनही व्यथीत होत आहे. परराज्यातील मजुरांनी काळजी करू नये त्यांची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगूनही हे मजूर, कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. नाशिकहून गाड्या सुटत आहेत, अशी कुणीतरी अफवा पसरवल्याने त्यांना आशेचा किरण दिसू लागला. त्यामुळे ही मंडळी टेम्पो, ट्रक, सायकल रिक्षा प्रसंगी पायी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर काही पायी चालत ठाणेसह कल्याणकडे धाव घेऊ लागले आहेत. त्या ठिकाणावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वे सुटत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पायपीट सुरू केली आहे. परराज्यातील व्यक्तींना मूळगावी जाण्याला शासनाकडून सवलत मिळाली आहे; परंतु रेल्वेवर अवलंबून असलेल्या बहुतांश परप्रांतीयांना अद्याप प्रवासाचा पास मिळालेला नाही. अशा व्यक्तींकडून जिथून रेल्वे सुटत आहेत, अशा ठिकाणांकडे धाव घेतली जात आहे. त्यामध्ये ठाणे, कल्याण तसेच पनवेल स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकातून काही करून रेल्वे पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुंबईच्या अनेक भागातील परप्रांतीय नवी मंबईत प्रवेश करत असून रेल्वे रुळावरून अथवा रस्त्याने पायी प्रवासाचा टप्पा गाठत आहेत. तर ठाणे व कल्याणच्या दिशेने जाण्यासाठीदेखील नवी मुंबईतील मार्गाचा वापर होत आहे. अशाच प्रवासादरम्यान तुर्भे स्थानकाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबणाऱ्यांचे घोळके जमत आहेत. खासगी वाहनाने गाव गाठण्याची ऐपत नसल्याने ते रेल्वेवर अवलंबून आहेत; परंतु त्यांच्या प्रवासाचा मार्ग खुलत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत जिथून रेल्वे सुटतात तिथून त्या पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  नवी मुंबईत नाकाबंदीच्या ठिकाणी त्यांना अडवले जात आहे. त्यानंतरही दुसऱ्या मार्गाचा वापर करून  रेल्वेस्थानक गाठण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com