धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११७

धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११७


मुंबई: 


धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११७ झाली असून यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मुस्लिम नगर  आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.


राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीत शनिवारी रुग्णांच्या संख्येत आणखीन भर पडली. आज दिवसभरात धारावी परिसरात कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी १० रुग्ण कल्याणवाडी भागातील आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मरकजहून परतलेल्या व करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या भाचीचाही समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये एक पुरुष रुग्ण ६१ वर्षांचा आहे तर बाकीचे रुग्ण १५ ते ४५ वर्षे या वयोगटातील आहेत.
प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. 
विशेष म्हणजे डॉ. बालिगा नगरमधील कन्टेन्मेंट झोनचे निर्बंध उठवल्यानंतरही याठिकाणी आज एक नवा रुग्ण सापडला. त्यामुळे अजूनही या परिसरात कोरोनाचा धोका कायम असल्याचे सिद्ध झाले. या भागातील संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही दररोज नवे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA