किराणा साहित्य होम डिलिव्हरीसाठी ठाणे पालिकेचा आणि डिजीठाणेचा उपक्रम:
झोमॅटोच्या माध्यमातून होणार डिलिव्हरी
ठाणे
ठाणे शहरासह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचे संकट आटोक्यात ठेवण्यासाठी लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांचा ऑनलाईन सेवेद्वारे आवश्यक गोष्टी मागवण्याकडे कल वाढला आहे. नागरिकांची ही मागणी लक्षात घेवून आणि टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला असून महापालिकेच्या डीजी ठाणे प्लॅटफॅार्मच्यावतीने झोमॅटोच्या माध्यमातून आता किराणा साहित्य घरपोच मिळणार आहे.
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून http://essentials.thanecity.gov.in/ हे विशेष संकेतस्थळ डिजी ठाणे या प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले असून, त्यास संबंधित व्यवसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता या प्रकल्पांतर्गत ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा-साखळी बळकट करण्यासाठी काही नोंदणीकृत दुकानांना आता झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आले आहे.
डिजी ठाणे या प्रणालीद्वारे झोमॅटोच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरी किराणा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत किराणा दुकानांशी संपर्क साधून या दुकानांना झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आले आहे.
पुरवठा-साखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि डिलिव्हरी वाहने (किराणा मालासाठी) यांच्या नियमित निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून बहुविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत.
यासाठी कर्मचार्यांना आणि माल पुरवणार्या व्यापार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना घरपोच डिलीव्हरी केलेले पदार्थ हाताळण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सींग चे पालन करणे, डिलीव्हरी बॉयने सॅनीटायझर, ग्लोव्हज, मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे तसेच कॉन्टॅक्ट लेस डिलीव्हरीवर भर द्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे बनवलेल्या http://essentials.thanecity.gov.in/ ला भेट देऊन दिलेल्या यादीतील दुकानदारांकडे फोनवरून संपर्क साधून ऑर्डर करु शकतात. ऑर्डर केलेले किराणा साहित्य झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरपोच मिळणार आहे.
डिजी ठाणे या प्रणालीच्या माध्यमातून आता ठाणेकरांना सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करुन देवून लॉकडाऊनच्या कालावधीत महापालिकेने नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. यामुळे किराणा दुकानांमध्ये होणारी गर्दी टाळणे शक्य होणार असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
0 टिप्पण्या