Top Post Ad

गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील -  संभाजी भिडे यांचा दावा

गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील -  संभाजी भिडे यांचा दावा



सांगली :


“गाईच्या तुपाने भरलेलं बोट नाकात फिरवलं किंवा गोमूत्र प्यायला दिलं तर कोरोनाबाधित रुग्ण बरे होतील”, असा दावा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला आहे. संभाजी भिडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करा. सांगलीच्या एकाच कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा”, अशी मागणीही भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. केंद्र आणि राज्य सरकार भगवंतानं दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असं भिडे यांनी जाहीर केलं आहे.  


यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. भिडे यांच्यावर नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे  तसेच भिडे यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का याची तपासणी करा असं म्हणत बोचरी टीका केली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबत एक निवेदन काढत आपली भूमिका स्पष्ट केली. या निवेदनात म्हटले संभाजी ब्रिगेडने म्हटले, “संभाजी भिडे कोरोना व्हायरसपेक्षा भयानक आहेत. त्यांच्या मेंदूला कोरोनाची लागण झाली आहे का हे सांगलीच्या पालकमंत्र्यांनी तपासून घ्यावे. कोरोनाग्रस्तांना बरं करण्यासाठी ‘गोमूत्र आणि तूप खावू घाला’ असं सांगून ते लोकांची फसवणूक करत आहेत. या प्रकरणी संभाजी भिडे या भोंदूविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे.”
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी देखील संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खरोखरच सरकारने भिडेसारख्या लोकांवर त्वरित कारवाई करावी. कारण कोरोना प्रतिबंध उपायांमध्ये या उपायांची गरज महत्वाची आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे.”
महाराष्ट्र कोव्हिड 19 अधिनियम कलम 6 प्रमाणे गुन्हा दाखल करून  दंडनिय कार्यवाही करीत  भिडे यांना  अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.  देशात साथरोग अधिनियम लागु झाला आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून साथरोग अधिनियम 1987 नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण ह्या साठी " महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020"  दि. 14 मार्च 2020 पासून राज्यात लागू केला आहे.सदर अधिनियमातील कलम 6 नुसार कोणत्याही व्यक्तीस संस्था संघटनाना कोव्हीड 19 बाबत कोणत्याही प्रकारची अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक मिडीया किंवा सोशल मीडियाचे माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा पुणे व संचालक वैधकीय शिक्षण व संशोधन मुंबई, विभागेय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे मार्फतच अधिकृत माहितीचे प्रसारणाचे बंधन घालण्यात आले आहे. कोव्हीड 19 बद्दल कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या  व्यक्ती संस्था व संघटना ह्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही व दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित आहे. त्यामुळे भिडे ह्यांनी केलेली विधाने ही निव्वळ अफवा असून त्याला कुठलाही शास्त्राrय आधार नाही किंवा भिडे ही व्यक्ती अधिनियमातील माहिती प्रसारण करू शकणारी अधिकृत व्यक्ती देखील नाही. देश आणि राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम लागू झालेला असताना त्यांनी  सांगलीत पत्रकारांसमक्ष कोरोना पिडीत व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होईल अश्या उपाययोजना सांगून अफवा पसरविली आहे. करीता सांगली जिल्हा पोलीस अधिक्षकांनी भादंवि (45 ऑफ) 1860 चे कलम 188 नुसार संभाजी भिडे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे व दंडात्मक कार्यवाही देखील करण्याची मागणी पातोडे यांनी केली.



महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतूद
महाराष्ट्र सरकारचा ‘महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020’ मधील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्ती/संस्था/संघटनांना कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरकारी अधिकारी आणि विभागांकडून अधिकृत माहितीचं प्रसारण करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. याबाबतच्या कोणतीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था/संघटनांविरोधात कायदेशीर कारवाईचीही तरतूद करण्यात आलीआहे.


कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्यांच्या जाहिरातीवर पोलिसांची कारवाई
काही दिवसांपूर्वीच भिवंडीतील एका गादी कंपनीने आमच्या गादी वापरल्यास तुम्ही कोरोनापासून बचावला जाल, असा दावा करण्यात आला होता. अरिहंत मॅट्रेस या गादी कंपनीने वर्तमान पत्रात जाहिरात देऊन 15 हजार रुपयात ‘अँटी-कोरोना व्हायरस गाद्या’ घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरात केली होती. यानंतर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे आता वैज्ञानिक आधार नसलेला कोरोनावरील उपाय सांगणाऱ्या भिडेंवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com