ठाणेकरांनी संयम दाखवून प्रशासनास जे सहकार्य केले आहे असेच यापुढेही करावे- पालकमंत्री
ठाणे
ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, हे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीकोनातून व सद्यस्थीतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात १७ एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेेळी ठाण्याचेे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या कोरोना विषाणूशी लढाई आपण लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटीबद्ध आहे. ठाणे जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कोरोना संकटाविरुद्ध सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देऊ या ठाणेकर नागरिकांनी आजवर जो संयम दाखवून प्रशासनास जे सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यकत करीत कोरोनाचे सावट दूर होईपर्यत असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बैठकीस ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापौर नरेश म्हस्के,महापालिका आयुक्त विजय सिंघल, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करीत असलेले सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. या बैठकीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना व्हायरसचा फैलाव हा प्रामुख्याने एकमेकांच्या संपर्कातून होत असल्याने सोशल डिस्टान्सींगला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे व याबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील अशा सर्वांनी स्वत: पुढे येवून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे तर आणि तरच आपण या आजाराची साखळी तोडून यातून मुक्त होवू शकतो. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा व्यक्तींचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात यावी, तसेच कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात रुग्णालयांची संख्या वाढवून यामध्ये आवश्यक असलेले डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी उपलब्ध करुन त्यांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन त्यांची निवास व भोजन व्यवस्था योग्य प्रकारे राहीत याकडे कटाक्षाने लक्ष राहील अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.
तसेच आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेवून आपल्याला अधिकचे डॉक्टर नियुक्त करणे आवश्यक आहे, यासाठी मुंबईच्या धर्तीवर डॉक्टरांना योग्य ते मानधन देवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सामान्य जिल्हा रुग्णालय तसेच महापालिका प्रशासनाला दिल्या. तसेच काही ठिकाणी भाजीपाला व अन्नधान्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी आवश्यकतेनुसार चित्रफलक लावण्यात यावेत व पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन पालकमंत्रयांनी या बैठकीत केले.
राज्यामध्ये लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत अनेक नागरिक अडकले असून तसेच मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, अशा नागरिकांना अनेक संस्थांच्या माध्यमातून नियमित जेवण पुरविण्यात येत आहे. स्वत:हून पुढे येवून ज्या संस्थांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे त्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच आभार व्यक्त करुन अभिनंदन केले. परंतु या सामाजिक संस्था गेल्या 25 दिवसापासून अन्नधान्याचे वाटप करीत आहे त्यांना आता आवश्यक अन्नधान्य व भाजीपाला उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, या संस्था स्वत: अन्न शिजवून त्याचे वितरण करण्याचे काम करीत आहे तरी या संस्थांना तांदूळ, डाळ, तेल, मसाले, भाजीपाला आवश्यकतेनुसार प्रभागसमितीनिहाय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
तसेच कोरोना संकट हे मोठे आहे, याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच यंत्रणा वेगाने काम करीत आहे, परंतु इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचार घेणे आवश्यक आहे, याकडे देखील दुर्लक्ष चालणार नाही तरी अशा रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळतील या दृष्टीने सर्व खाजगी रुग्णांलये सुरू राहतील या दृष्टीने सर्व संबंधितांना आदेश व्हावेत अशी सूचना या बैठकीत पालकमंत्र्यांनी केली. कोरोनाचा सामना करण्यासाठीच सर्वच विभाग प्रभावीपणे काम करीत आहे, यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास पालकमंत्री या नात्याने मला वैयक्तीक निदर्शनास आणून द्यावी याबाबत आपल्याला तातडीने योग्य ती मदत व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या