कोरोनाचा कहर आणि बौद्धिक दिवाळखोरी
- डॉ. बालाजी जाधव,मराठा सेवा संघ, औरंगाबाद
सध्या कोरोनाचा कहर इतका वाढलाय की अख्खे जग भयभीत झाले आहे. कोणताही धर्म, त्या धर्माचा देव, त्या देवाचा दलाल आणि त्या त्या देवाचे भक्त सगळे आपापल्या धर्माची कवाडे बंद करून विज्ञानाने बनवलेल्या मास्कच्या आड दडून बसले आहेत. एका डोळ्याला न दिसणाऱ्या क्षुद्र व्हायरसला देवापासून भक्तांपर्यंत सगळेच घाबरलेले आहेत. अर्थात देवांनी दडी मारून लपून बसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. शिवकाळात सुद्धा परकीय आक्रमणाने घाबरून समस्त देव दडी मारून बसले आणि त्या देवाना सुद्धा वाचवायला शिवरायांना तलवार घ्यावी लागल्याचे कवी भूषण यांनी आपल्या काव्यात लिहून ठेवलेले आहे. (संदर्भ - निनाद बेडेकर) थोडक्यात काय तर कहर कशाचाही असो मानवी मेंदू आणि मानवी कर्तृत्वाच अशा संकटांवर मात करते हा जगाचा इतिहास आहे.
सध्या कोरोनाचा कहर असाच जात, पंथ, धर्म, प्रांत, भाषा या सगळ्यांच्या सीमा ओलांडून सगळ्यांवर सारख्या प्रमाणात बरसत आहे. तो निसर्ग आहे ना, त्याला जात पात उच्च नीच काही कळत नाही. तो सर्वांना समान वागवतो. त्याच्यासमोर सर्व धार्मिक स्थळे आणि धर्म बंद पडलेले असताना काही खुळ्या लोकांना आपला धर्म कसा वैज्ञानिक आहे हे सांगण्याचा कंडू काही केल्या आवरताना दिसत नाहीये. कुणी गोमूत्र पार्ट्यांचे आयोजन करत गाईचे मुत ढोसत आहेत तर कुणी शेणाचा हौदात नखशिखांत हैदोस घालत आहेत. इथे मला आठवण येते ती माझ्या आजीची. आमची आजी सकाळी उठून गाईचे शेण मुत आवरल्यानंतर, सडा संमार्जन केल्यानंतर शेणा मुताने जे हात भरायचे ते हात भक्ती भावाने चाटून खात नव्हती तर पाण्याने स्वच्छ हात धुवून मगच चुलीपुढे स्वयंपाक करायला जायची. शेण आणि मूत ही खायची प्यायची गोष्ट नसून उकिरड्यावर टाकण्याची गोष्ट आहे हे त्याकाळातील न शिकलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्याना सुद्धा समजायचे. परंतु एकविसावे शतक उजाडले, २०१४ साल आले, भारत देशात सनातनी मनुवादी विचारांचे सरकार अवतीर्ण झाले आणि गाय, शेण, तिचे मूत्र यांचा प्रचंड महिमा वाढायला सुरुवात झाली. अंगाला खाज सुटली थापा शेण अंगाला, डोळे आले टाका दोन थेंब गोमूत्राचे डोळ्यात, तब्बेत बिघडली गडबडा लोळा शेणात.....कोरोनाचा कहर आला ओरपा गाईचे शेण तिच्या मूत्रात टाकून. असले जीवघेणे आणि किळसवाणे प्रयोग तर अश्मयुगीन काळात सुद्धा झाले नसतील. जुन्या काळातील लोकांना एवढी अक्कल नक्कीच होती की शेण गाईचे असो की म्हशीचे त्याची जागा घरात फक्त सारवण्या पुरतीच आहे आणि नंतर उकिरडा आहे. परंतु ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीच गाय पाळली नाही ते मात्र आज आम्हाला हर मर्ज की एकही दवा... गो शेण आणि गोमूत्र.... असे सांगत आहेत. रामदास आठवले यांच्या गो कोरोना घोषणेची टिंगल सर्वांनी उडवली परंतु कोरोना शांत हो म्हणत गोमूत्राचे कुल्हड च्या कुल्हड रिकामे करणाऱ्या चक्रपाणी महाराजांचे काय? रामदास आठवले यांनी किमान शेण खा आणि कोरोना दूर ठेवा असे तर म्हटके नाही ना? (टीप : आमचा गाईला आणि गोसेवेला अजिबात विरोध नाही)
ही सगळी उठाठेव करणार्यांना तुकोबांनी त्यांच्या काळात सांगून ठेवले होते - उदकी कालवी शेण मल मूत्र । तो होय पवित्र कासयाने ।। अर्थात पाण्यात शेण मल मूत्र कालवून ते प्राशन करण्याने अथवा त्याने अंघोळ करण्याने अथवा ते घरात शिंपडण्याने कुणी पवित्र होत नाही. आता जे शेण तुमचे बाह्यांग पवित्र करायला कुचकामी आहे ते शेण खाल्ल्यानंतर तुमच्या आतील आजार कसे बरे होतील? एवढा साधा तर्क आज भक्त मंडळी करत नाहीत. ही परिस्थिती अशीच चालत राहिल्यास काही दिवसांनी गोमूत्र आणि गोशेण यांचा राष्ट्रीय खाद्य पदार्थात समावेश झाल्यास नवल नाही. आणि ज्यांच्या डोक्यात मेंदू ऐवजी शेण भरलेले आहे ती मंडळी शेणाला च्यवनप्राश समजून खायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. असो.
0 टिप्पण्या