सरकारच्या मदतीने अखेर ' ती ' सुखरूप इटलीहून भारतात परतली
ठाणे
पाचपाखाडी येथे राहणारी संजना कदम ही इटली येथे उच्चशिक्षणासाठी गेली होती. मात्र जगभरात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसचा फटका तीलाही बसला. मात्र परतीच्या प्रवासात अनेक अडथळे येत होते. यावर भारतीय सरकारने अतिशय व्यवस्थितरिता मार्ग काढून संजना कदमला सुखरूप भारतात आणले आहे. त्याबद्दल तिच्या कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले.
४ फेब्रुवारी २०२० ला उच्च शिक्षणासाठी गेली. तेथे गेल्यानंतर तिचे २० फेब्रुवारी रोजी महाविद्यालय सुरू होणार होते. इटलीची राजधानी मिलान येथे ती वास्तव्यास होती. जिथे भाडेतत्त्वावर रूम घेतली, त्यांनीही चार महिन्यांचा करारनामादेखील केला. परंतु, कोरोनाचे संकट यायला सुरुवात झाल्यावर दर सात दिवसांनी सांगायचे की, महाविद्यालय काही दिवसांनी सुरू होईल. यादरम्यान महाविद्यालयाने आनलाइन अभ्यास सुरू केला. १० मार्च रोजी तेथील सुपर मार्केटही बंद करण्यात आले. संजनाकडे १५ दिवसांचा अन्नसाठा होता. तिने आपले वडील सुजय कदम यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिला तातडीने भारतात निघून येण्यास सांगितले. परंतु, प्रवास करायचा असेल तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली होती.
त्यावेळी वडील कदम यांनी भारतीय दूतावासाला पत्र लिहिले व त्यात सांगितले की, 'माझी मुलगी इटलीमध्ये अडकली असून तिला प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करा,' आणि संजनाची माहितीही देण्यात आली.१२ मार्च रोजी कदम यांनी त्यांना ई-मेल केला होता. त्यावेळी भारतीय दूतावासाने मिलान दूतावासाशी संपर्क केला आणि मिलान दूतावासाने १३ मार्च रोजी संध्याकाळी संजनाला संपर्क करून दुसऱ्या दिवशी भारतात जाण्यासाठी विमान तयार आहे, असे सांगितले.१४ मार्च रोजी रात्री ८ वाजता ती विमानात बसून १५ मार्च रोजी भारतात परतली. विमानातही तिच्यासह इतर प्रवाशांचीही विशेष काळजी घेण्यात आली. नवी दिल्लीत आल्यावर तिला आयटीबीपी रुग्णालयात ठेवण्यात आले. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. पुढील १२ दिवस तिला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
जगभरात उन्द्रवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे इटलीहून भारतात येणे माझ्या मुलीसाठी कठीण दिसत होते. परंतु, भारत सरकारने माझ्या मुलीला भारतात परतण्यासाठी जी मदत केली, त्याबद्दल मी ऋणी राहील. ती भारतात सुखरूप आली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला. सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या. भारतात कोरोनासंदर्भात जितक्या तत्परतेने कार्यवाही केली जाते, तितकी इटलीमध्ये नाही. भारतीय दूतावासाने स्वजबाबदारीवर तिला भारतात आणले, असेही कदम यांनी सांगितले.
0 टिप्पण्या