वर्गणी गोळा करून पायी जाणाऱ्या स्थलांतरीत कामगारांकरिता जेवणाची व्यवस्था
पालघरमधील चारोटी गावातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम
पालघर -
कोरोना या विषाणू ने जगात थैमान घातले असून याने कोणत्याही जाती धर्माच्या सीमा सोडल्या नाही. केवळ माणुसकी हाच एक धर्म आहे या भावनेतून पालघर मधील चारोटी गावातील काही तरुण युवक व ग्रामपंचायत चारोटी सरपंच महादेव तांडेल, उपसरपंच कैलाश चौरे यांनी पुढाकार घेवून वर्गणी गोळा करत या पायी जाणाऱ्या स्थलांतरीत कामगारांना गेल्या दोन दिवसापासून चारोटी नाका येथे जेवणाची व्यवस्था करत आहेत.
मुंबई -अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग गुजरात, राजस्थान या राज्यांना जोडतो त्यामुळे हजारो स्थलांतरित कामगार गुजरात सीमेजवळ अडकून पडले आहेत. पालघर मधील सामाजिक संस्था, राजकीय पुढारी व तरुण मंडळे आपापल्या परीने या लोकांना मदत करताना दिसत आहेत. कॉ.धनेश आक्रे, कॉ.चेतन माढा, कॉ.रशीद भाई, निकणे ग्रामपंचायत लिपिक किसन चव्हाण यांनी लोकांना चारोटी टोल नाका येथे काही कामगारांना पुरीभाजी दिली. त्याचप्रमाणे महालक्ष्मी ट्रस्टने बिस्कीट व पाण्याची व्यवस्था केली होती.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक देश आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. देशात हा व्हायरस पसरू नये त्यावर पायबंध घालण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, वसई, कल्याण, भिवंडी, पालघर या शहरात रोजगारानिमित्त गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील असंख्य स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हजारो किलो मीटर चा रस्ता पायपीट करत जात आहेत. हॉटेल, धाबे, दुकाने बंद असल्यामुळे खाण्या-पिण्याची या लोकांचे खूप हाल होत आहेत.
0 टिप्पण्या