महापौरांचे हस्ते परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
कार्यशाळेतून मार्गस्थ होणाऱ्या बसेस निर्जंतुकीकरण करूनच बाहेर
ठाणे
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महापालिका कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुरक्षेतेच्यादृष्टीने मास्क व सॅनिटायझर वाटप आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, उप आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते. दरम्यान परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणारी प्रत्येक बस निर्जंतुकीकरण कऱण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. परिवहन सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सातत्याने विविध लोकांच्या संपर्कात येत असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने कामगिरीवर असताना त्यांनी मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साबण व पाण्याने हात धुणे, ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होत आहे किंवा अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत, आदी सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन सेवेकडून कर्मचाऱ्यांना मास्क वाटप, हात धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे यासोबतच सर्व बसेसवर जनजागृतीपर पोस्टर्स, बसस्टॉपवर होर्डिंग, बॅनर लावून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच परिवहन सेवेत कार्यरत कर्मचारी यांच्या दैनंदिन हजेरीसाठी वापरण्यात येणारी बायोमेट्रीक मशिनची हजेरी प्रक्रिया बंद करण्यात आली असून, हजेरीपट ठेवून त्याद्वारे हजेरीची नोंद ठेवण्यात येत आहे.
0 टिप्पण्या