निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आश्वासनांची खैरात
बदलापूर :
२०१५ च्या निवडणुकीत अंबरनाथमध्ये ३ तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेमध्ये ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. असाच प्रयोग यंदाही करण्याचा मानस दोन्ही नगरपालिकांतील वजनदार नगरसेवकांनी व्यक्त केला असून त्यासाठीही बैठकांचा जोर वाढला आहे. त्यासाठी इच्छुकांना मोठमोठी आश्वासनांची खैरात वाटल्या जात असल्याची चर्चा अंबरनाथ, बदलापूरमध्ये रंगली आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वपक्षीयांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यातही भूमिपुत्र म्हणून आपला टक्का राखण्यासाठी आजी-माजी भूमिपुत्र नगरसेवकांनी गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आपापसांत लढून पराभूत होण्यापेक्षा वेळेप्रसंगी तडजोड करण्याची तयारीही अनेक नगरसेवक करीत असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.
नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येणार असल्याने निवडणूक आयोगातर्फे निवडणूकपूर्व तयारी सुरू आहे. गेल्याच आठवडय़ात दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग आरक्षण जाहीर झाले. अंतिम आरक्षण जाहीर होणे अद्याप शिल्लक असले तरी प्रारूप आरक्षणात बदल होणे अशक्य असल्याने सर्वपक्षीयांनी तयारीला सुरुवात केली आहे. दोन्ही शहरांमध्ये बहुभाषिक नवमतदार मोठय़ा संख्येने वाढला आहे. तरीही दोन्ही नगरपालिकांमध्ये भूमिपुत्र नगरसेवकांची संख्या मोठी आहे. अंबरनाथ नगरपालिकेत २५ तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत ३० नगरसेवक भूमिपुत्र आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे आपला टक्का घटण्याचा धसका बहुतांश भूमिपुत्र नगरसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे आपापल्या समाजांच्या ज्येष्ठांना एकत्र करत निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याबाबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांशी लढण्यात पैसा, वेळ खर्ची घातल्याने भूमिपुत्र नसलेल्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी भूमिपुत्र आजी-माजी नगरसेवकांचा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जाते. काही तरुण इच्छुकांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न या बैठकीच्या निमित्ताने केला जातो आहे.
0 टिप्पण्या