कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिका सज्ज
ठाणे
: महाराष्ट्राच्या विविध भागात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. या व्हायरचा फैलाव होऊ नये या दृष्टीकोनातून राज्यशासनाच्या आदेशानुसार सर्वच स्तरावर आवश्यक ती काळजी व उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका देखील कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सज्ज झाली असून महापालिकेची रुग्णालये, दवाखाने या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता स्वत: दक्ष राहून स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त (प्रभारी) राजेंद्र अहिवर यांनी केले आहे.
कोरोना या आजारांबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच महापालिकेच्या आरोग्यविभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी बैठक घेतली. या बैठकीस उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, मनीष जोशी, सचिन गिरी, वैद्यकीय आरोगय अधिकारी डॉ. अनिरुध्द माळगांवकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आदी अधिकारी उपस्थीत होते.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे 8 खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स 24 तास कार्यरत राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्तांनी यावेळी दिली. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात व खाजगी रुग्णालयात देखील या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, ज्या ठिकाणी कमी खाटा उपलब्ध असतील त्या वाढविणे, अत्यावश्यक सेवा म्हणून व्हेंटीलेटरची सुविधाही उपलब्ध करण्यात यावी असेही आदेश यावेळी संबंधितांना दिले. तसेच महापालिकेच्या आरोग्यविभागाच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांना भेट देवून तेथेही आवश्यक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना द्याव्यात.
तसेच सर्व शाळा, विविध आस्थापना, सार्वजनिक रहदारीची ठिकाणी, परिवहन बससेवेच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देणारी पत्रके लावण्यात यावीत. तसेच सार्वजनिक जीवनामध्ये काय करावे व काय करु नये याबाबतही भित्तीपत्र लावण्यात यावेत. सर्व शाळांमध्ये आवश्यक ती पाण्याची सुविधा उपलब्ध् करणेबाबत सूचना द्याव्यात. नागरिकांनी देखील गर्दीच्या ठिकाणी जाणे, हस्तांदोलन करणे टाळावे, प्रत्येक वेळी हात पाण्याने स्वच्छ धुवावेत तसेच कोणताही आजार उद्भवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करतानाच नागरिकांनी कोरोना या आजाराबाबत घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी व महापालिकेने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असेही यावेळी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी नमूद केले
0 टिप्पण्या