ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे पुन्हा मुंबई महापालिकेत
ठाणे :
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 4 मार्च रोजी कार्यमुक्त होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासांमध्येच ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा गिरीष झळके यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी काळे यांची काही अटी शर्थीवर २ जून २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. याच पार्श्वभूमीवर काळे हे ६ जून २०१६ रोजी ठाण्यात मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर रुजू झाले होते. काळे यांची मुंबई महापालिकेनेही मागणी केल्यामुळे त्यांना ३ मार्च २०२० पासून ठाणे महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांची सेवा मुळ विभागाकडे प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर अधिकारी उपलब्ध होईपर्यंत प्रशासकीय कारणास्तव मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय अधिकारी झळके यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ३ मार्च रोजी काढले आहेत.
0 टिप्पण्या