करोना विषाणूवर मात करणं शक्य
नवी दिल्ली :
करोना व्हायरसवर मात करण्यासाठी औषध नसणं ही सर्वात चिंतेची बाब होती. पण भारतीय संशोधकांच्या या प्रयत्नामुळे करोना विषाणूवर मात करणं शक्य होणार आहे. आयसीएमआरचे डॉक्टर, बलराम भार्गव यांच्या मते, हे मोठं यश आहे. कारण, यामुळे औषध, लस आणि चाचणी करण्यासाठी मोठी मदत होईल. करोना व्हायरसला वेगळं करणं अत्यंत कठीण होतं, कारण भारतात करोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी आहे. करोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत असतानाच भारताला मोठं यश मिळालं आहे. करोना विषाणू शरीरातून विलग करणारा भारत जगातला पाचवा देश ठरला आहे.
यापूर्वी चीन, जपान, थायलंड आणि अमेरिकेने हे यश मिळवलं होतं. जगभरात आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे जीव गेला आहे, तर जवळपास दीड लाख लोक यामुळे बाधित आहेत. भारतात ८३ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरचे शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी याबाबतची माहिती दिली. करोना व्हायरस हा सहजपणे विलग होत नाही. त्यामुळे विलगीकरण करण्यात यश मिळणे ही मोठी कामगिरी आहे. यामुळे लस तयार करणे आणि चाचणी करणे सोपे होईल, असं गंगाखेडकर यांनी सांगितलं. कारण, प्रत्येक औषधाच्या चाचणीसाठी विषाणूची आवश्यकता असते, ज्याच्याविरोधात औषध तयार केलं जातं.
0 टिप्पण्या