Trending

6/recent/ticker-posts

साडेसात लाख रुपये मूल्याच्या सुमारे दीड हजार बनावट नोटा जप्त 

साडेसात लाख रुपये मूल्याच्या सुमारे दीड हजार बनावट नोटा जप्त मुंबई
गुन्हे शाखा ९ च्या पथकाने काही दिवसांपूर्वी अंधेरीत तीन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. त्यात मूळच्या केरळच्या असलेल्या तिघांना अटक झाली होती. मुंबई गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २४ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. मुंबईत हातोहात बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून कारवाईची तीव्रता वाढविली जात आहे. गुन्हे शाखा युनिट ४ ने नुकत्याच केलेल्या कारवाईत बनावट नोटांची सूत्रे तमिळनाडूत असल्यावरून तिथे तपास सुरू केला. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तमिळनाडूत छापा टाकून बनावट नोटांच्या छपाईत मश्गुल असलेल्या आरोपीकडून साडेसात लाख रुपये मूल्याच्या सुमारे दीड हजार बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा जामानिमा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही गुन्हे शाखेच्या कारवाईत तमिळनाडूचा संबंध समोर आल्याने त्या पद्धतीनेही तपास केला जात आहे.
गुन्हे शाखा ४ च्या पथकाने काही दिवसांपूर्वीच सायनमध्ये भास्कर नाटर नावाच्या आरोपीकडून १,२८,६०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यातील बऱ्याच नोटांवरील क्रमांक सारखा असल्याने काही ठराविक नोटांचा वापर करून बनावट नोटा केल्या जात असल्याच्या संशयावरून तपास सुरू झाला. नाटरच्या चौकशीतून तमिळनाडूतील सर्वनन वनियार नावाच्या माणसाने या सर्व बनावट नोटा मुंबईत एकास देण्यासाठी दिल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा, गुन्हे शाखा युनिट ४ चे प्रभारी पोलिस निरीक्षक निनाद सावंत आणि पथकाने तमिळनाडूत दडलेल्या वनियारचा शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी सहाय्यक निरीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तमिळनाडूत रवाना झाले. सर्व माहिती गोळा करत या पथकाने तिथल्या तिरुपुथूर जिल्ह्यातील अय्यानूरमध्ये राहणाऱ्या वनियारच्या घरात छापा टाकला. तेव्हा तिथे ५०० रुपये मूल्याच्या १४७६, तर २०० रुपये मूल्याच्या ८५ नोटा अशा एकूण ७ लाख ५५ हजार रुपये मूल्याच्या १५६१ नोटा हस्तगत करण्यात आल्या. या छाप्यात बनावट नोटांच्या छपाईसाठी लागणारे स्कॅनर-प्रिंटर, पेपर कटर आदी साहित्यही जप्त केले. या छपाईसाठी खऱ्या नोटा स्कॅन करून त्यांच्या प्रिंटआऊट घेतल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर नोटा खऱ्या वाटाव्या म्हणून हिरवट रंगाच्या प्लास्टिक रोलचे तुकडे नोटेवर चिकटवण्याचेही तंत्र अवलंबले गेल्याचे आढळले.


Post a Comment

0 Comments