Trending

6/recent/ticker-posts

वाहनचालकांकडून उघड्यावर रसायने टाकण्याचे प्रकार

अंबरनाथमध्ये वाहनचालकांकडून उघड्यावर रसायने टाकण्याचे प्रकार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची गरजअंबरनाथ
अंबरनाथ शहरात आनंदनगर, मोरीवली आणि वडोल या तीन भागात एमआयडीसीचा कारभार विस्तारला आहे. मात्र मोरीवली आणि वडोल एमआयडीसी भागात सर्वाधिक रासायनिक कंपन्या आहेत. त्यात रासायनिक कंपन्यांनी त्यांची सर्व टाकाऊ रसायने तळोजा येथील डम्पिंगवर कागदोपत्री प्रक्रिया करून टाकणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा वाहतूक आणि डम्पिंगचा खर्च वाचवण्यासाठी कंपन्या आणि रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून उघड्यावर रसायने टाकण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे अशा कंपन्या आणि रसायनांची वाहतूक करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची गरज आहे.
अंबरनाथ पाइपलाइन रस्त्याला लागून असलेल्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवरील आग आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुराचे लोट यामुळे या भागातील नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी डम्पिंगलाच लागून असलेल्या भागात पावडर सदृश रसायनांच्या साठ्याच्या शेकडो गोण्या टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. शेकडो गोण्यांमध्ये भरलेला हा रसायनांचा साठा कोणी आणि कधी टाकला, याबाबत कुणालाच माहिती नाही. गेल्या दहा दिवसांपासून हा साठा येथे टाकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकमधून रसायनांचा साठा येथे टाकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवाजीनगरचे पोलिस, एमआयडीसीचे अधिकारी तसेच नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी या गोण्यांमधील रसायने प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेली आहेत. उघड्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात टाकलेली ही रसायने घातक आहेत की नाही याचा उलगडा प्रयोगशाळेतील अहवालानंतरच होणार आहे. मात्र यापूर्वीही डम्पिंगवर रसायनांच्या गोण्या टाकण्यात आल्याचे प्रकार उघड झाले होते. मात्र रासायनिक कंपन्यांकडून वारंवार डम्पिंग आणि त्याच्या परिसराचा वापर घातक रसायनांचा साठा टाकण्यासाठी होत असल्याने तो आगीत मिसळल्यास त्यातून घातक वायू पसरत आहे. या भागातील हजारो नागरिकांच्या जिवाला त्यामुळे धोका उद्भवू शकतो. डम्पिंग आणि त्याच्या परिसरात रसायनांचा साठा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या