Trending

6/recent/ticker-posts

यस बँकेकडून नो बँकिंग कडे 

यस बँकेकडून नो बँकिंग कडे आज आणखी एक बँक आर्थिक डबघाईला आल्याचे व समाज मनावर त्याचे होणारे विपरीत परिणाम मन सुन्न करून गेले.  स्वकष्टर्जित पैसे देण्यास आपल्या बँकेला रिजर्व बँके कडून अटकाव केला जातो.  एका दिवसात संपूर्ण संसाराची घडी विस्कटायची पाळी येते. अनेक कुटुंब हलाखीच्या उंबरठ्यावर येऊन उभी राहतात.  आज ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या काठावर असलेल्या या बँकेच्या बाहेरील दृश्य अतिशय हेलावणारे होते.  प्रत्येकाची अशी आपली कथा होती.  परंतु आता त्याचे व्यथित कथन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच नव्हते आणि नेमके त्याच वेळी बाजूच्याच एक प्रथित यश खाजगी बँकेचे रिलेशन शिप मॅनेजर त्याच्या हातात आपले व्हिजिटिंग कार्ड ठेवून त्या बँकेत खाते उघडण्यास सांगत होते नवे स्वप्न पाहण्याची निर्लज्जपणे विनंती करीत होते. प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाण्याचाच प्रकार होता तो.  
या घडामोडीचा धांडोळा घेताना मला काही प्रश्न निर्माण होतात ते खालील प्रमाणे :
१)  आज पर्यंत कोणत्याही बँकेच्या बाहेर पुढील सूचना मिळेस्तोवर आम्ही सद्द्या ठेवी स्वीकारणे स्थगित ठेवले आहे असा फलक पाहण्यात आला नाही. २)  आज पर्यन्त कोणी आपल्या बँकेच्या मॅनेजरकडे या शाखेतील डिपॉजिट इन्शुरन्सचा प्रीमियम भरलाय का त्याची पावती पाहावयास मिळेल का अथवा भरलेल्या प्रीमियम मध्ये माझ्या ठेवी अंतर्भूत आहेत का असे विचारलेले आठवत / पाहण्यात नाही. ३) काही ठेवी गेली ३० ते ४० वर्षे सतत रिनिवूच करण्यात आल्या  कधीही त्यातील काही रक्कम परत घेण्यात आली  नाही म्हणजे त्या जोगे आपली बँक आपले पैसे परत करू शकते कि नाही याचा अनुभव कधीच घेण्यात आला नाही. ४) पसंतीची / विश्वासाची/ आपुलकीची अशी विशेषणे बँकेला लावणे किती मूर्खपणाचे आहे हे कळण्यासाठी ती बुडण्याची वाट बघणारे काही महाभाग आजही आरे * बँक कधीच बुडणार नाही त्याच्या मागे * उभा आहे आणि आबासाहेब ***ची बँक आहे बुडणे शक्यच नाही.  प्रत्येक शाखेत त्यांचे  मोठे तैलचित्र लावलेले असते ते काय उगीचच ..... असे नाक्यावर उभं राहून छाती ढोक मिशीला पीळ देऊन सांगणारे दिसले कि त्याच्या अकलेचे अप्रूप वाटल्या शिवाय राहत नाही. 
विश्वासाच्या नागरी बँकांबाबत मला नेहमी एक प्रश्न पडतो तो हा कि त्याचे ठेवीदार एक प्रवित्र कर्तव्य असल्यागत बेसुमार ठेवी या बँकामध्ये वर्षानुवर्षे ठेवत असतात यात सामान्य ठेवीदार पासून ते मोठ्या मोठया सामाजिक संस्था, सार्वजनिक न्यास, शिक्षण संस्था इत्यादींचा भर अधिक असतो. 
आता आपण एक उदाहरण म्हणून बघूया कि आपल्या अतीव आणि ओतीव प्रेमामुळे बँक डबघाईला येऊ शकते का.???
आपल्या पसंतीच्या नागरी बँकेत समजा आपण आपल्या आयुष्याची सगळी कमाई ठेवली.  आपल्या नगरातल्या सर्वानी त्या बँकेत समजा २०१८-१९ वर्ष्याकरिता ठेवी रूपाने १२०० कोटींच्या ठेवी अदमासे ८ टक्के दराने ठेवल्या. म्हणजे बँकेला सर्व मिळून साधारण ९६ कोटी व्याज या ठेवीदारांना देणे आहे. समजा आर्थिकमंदीमुळे या ठेवीतील केवळ ४०० कोटींची कर्जे बँकेने अदमासे १४% दराने वितरित केली म्हणजे अदमासे ८०० कोटी रुपये बँकेकडे पडून राहिले.  आता वितरित केलेल्या कर्जातून ५६ कोटीचे व्याज बँकेला मिळणार म्हणजेच व्याजरूपाने जवळपास ४० कोटींचा तोटा बँकेला होऊ शकतो त्यात ४०० कोटी पैकी आणि पूर्वी दिलेल्या कर्जापैकी अनुत्पादित कर्जे व त्यावरील व्याज याची तरतूद या मार्गानेहि बँकेस तोटा होऊ शकतो. बर बँकांचे पगार, भाडी, इंटिरिअर या वरचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या काही बँकांचे राजकीय लागेबांधे त्यांना मोठ्या प्रमाणात अनुत्पादीत कर्जे वितरित करण्यास भाग पाडत असतात.  बँक बुडल्यास हि राजकीय व्यक्तिमत्वे खाके वर करून दाखवतात आणि दोष ठेवीदारांच्या माथी मारण्यास विसरत नाही.  आजकाल बँकांची परिस्तिथी भर समुद्रात तरंगणाऱ्या जहाजा सारखी झालेली आहे आधीच अर्थ व्यवस्थेत होणाऱ्या बदलांच्या लाटांशी झुंजी देताना त्यांना नाकी नऊ आलेले आहे त्यातच बँके बाबत एक अफवा दहा ते वीस टक्के ठेवीदारांना आपल्या ठेवी एक दिवसात काढून घेण्यास प्रवृत्त करतात.  रिजर्व बँकेने अलीकडेच दंडित केलेल्या एक नागरी बँकेस यास अलीकडेच सामोरे जावे लागले आहे.  यश बँकेच्या अपयशाच्या पार्शवभूमीवर इतर खाजगी बँकांना, नागरी सहकारी बँकांना याची झळ बसल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. आग लागलेल्या ठिकाणी आलेले अग्निशमन पथक आधी आग अधिक पसरू नये म्हणून आजूबाजूच्या गोष्टीवर पाणी मारतात तसेच यश बँकेच्या आगीत होरपळणारे ठेवीदार इतर बँकावरील आपला विश्वास गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सायकल स्टॅण्डवर उभा असलेल्या सायकलींप्रमाणे एक मेकांशी व्यवसायिक संबधाने जोडलेल्या या अर्थ संस्था कोसळण्यास सुरुवात होऊ शकते आणि हमाम मे  सब नंगे अशी अवस्था बनू शकते. याचा फटका या अति विश्वासाच्या बँकेकडे ठेवींचा महापूर येऊन व त्या प्रमाणात कर्जे न वितरित होऊन त्या निवळ तोट्याकडे वाट चाल करू शकतात. तेव्हा सावध एका भविष्याच्या हाका.  केंद्रीय बजेट मध्ये डिपॉजिट इन्शुरन्सच्या रकमेत केलेली भरगोस वाढ (१ लाख वरून ५ लाख) बँकाच्या भविष्या बद्दल चिंता वाढवणाऱ्या आहेत. आज पर्यंत बुडलेल्या अथवा बुडवलेल्या बँकेच्या ठेवीदारांना पूर्वीची १लाख हि विम्याची रक्कम मिळाल्याचे  ऐकिवात नाही म्हणजे डिपॉजिट इन्शुरन्स म्हणजे  "बोलाची कढी आणि बोलाचा भातच"  म्हणावा लागेल.  असो मी काही अर्थतज्ञ नाही मी एक सामान्य ठेवीदार आहे.  माझ्या वरील शंका/ कुशंका/ विवेचनावर उलट सुलट चर्च्या करण्यास बौद्धिक देण्यास उत्सुक अर्थभाटांनी कृपया याची नोंद घावी.  
यश बँकेच्या बाहेरील लाईनीत उभ्या असलेल्या आणि बाजूच्याच मासुंदा तलावाकडे खिन्न नजरेने पाहणाऱ्या एक गृहिणीची नजर काळीज चिरून गेली .... या समयी एवढेच.


-- महेंद्र मोने.... ठाणे


Post a Comment

0 Comments