Top Post Ad

महाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या सीमाभागातील मराठी बांधवांना शुभेच्छा

महाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या सीमाभागातील मराठी बांधवांना शुभेच्छामुंबई 
महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने मराठी भाषा दिन साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सीमाभाग समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केलेले छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील मराठी जनांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही मंत्र्यांनी सीमा लढ्यात भाग घेतला आहे. भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्या, खेडे हा घटक आणि लोकेच्छा या चार मूलभूत तत्त्वांच्या आधारे हा सगळा प्रदेश महाराष्ट्रात यावा यासाठी सनदशीर मार्गाने आपण गेली जवळपास ६५ वर्षे लढत आहात आणि महाराष्ट्रातील जनता आणि सरकार आपल्या मागे ठामपणे उभे आहे, असे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी आम्हा दोघांची सीमाभाग समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक केली. १९५६ साली तत्कालीन म्हैसूर राज्याची स्थापना झाल्यापासून सीमाभागातील मराठी जनतेने महाराष्ट्रात येण्याच्या एकमेव इच्छेसाठी घाम गाळला आहे, रक्त सांडले आहे. साराबंदीपासून कन्नड सक्तीला केलेल्या विरोधापर्यंत आणि येळ्रळूरमधली जय महाराष्ट्रची पाटी हटवून तिथल्या स्त्रियांना अमानुष मारहाण करण्यापासून सीमाभागातील मराठी शाळा बंद करण्यापर्यंत अनेक पद्धतींनी भाषिक दडपशाहीचा वरवंटा मराठी जनतेवर फिरला आहे. तरीही आपण ताठ मानेने महाराष्ट्रात यायचे, मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे जतन - संवर्धन करायचे या इच्छेने इरेला पेटल्यासारखे काम करत आहात. आज सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही खात्री देऊ इच्छितो की, शक्य ते सर्व प्रयत्न करून सर्वोच्च न्यायालयापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली जाईल आणि लवकरच उरलेल्या महाराष्ट्रातील जनतेप्रमाणे आपण सगळे महाराष्ट्राच्या छायेत येऊन विसावाल, अशी ग्वाही दोन्ही मंत्र्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून भाई दाजीबा देसाईंपासून बापूसाहेब एकंबेकर पाटील ते एन. डी. पाटील  साहेबांपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड आर्थिक छळ सोसून, प्रसंगी तुरुंगवास भोगून आपल्या हक्काच्या भाषेच्या राज्यात येण्यासाठी जी ताकद उभी केली, तिला तोड नाही. सीमाभागातील तरुण पिढीला आम्ही हे सांगू इच्छितो की, आपल्या रोजगार उद्योगांच्या आशाआकांक्षाच्या पूर्तीसाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करेल. मा. मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांवर जबाबदारी सोपवली आहे ती महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षांच्या आणि जनतेच्या सहकार्याने पार पाडू आणि सीमाभागासह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आपण लवकरच पूर्ण करू, असा आम्हाला विश्वास वाटतो, अशा भावनाही  भुजबळ आणि  शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com