Trending

6/recent/ticker-posts

पुन्हा एकदा शिवजयंतीचा वाद ऐरणीवर

पुन्हा एकदा शिवजयंतीचा वाद ऐरणीवरमुंबई
कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दोन वेळा साजरी करण्यात येते. हा वाद कायम ठेवण्यात इथल्या राजकीय पक्षांना रस असल्याचे म्हटले जाते.  शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यामुळे आता शिवसेना शासकीय आदेशानुसार जयंती साजरी करणार की तिथीनुसार जयंती साजरी करणार असा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. 
'शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी. तारखांचा वाद सुरू आहे. त्यावरून महाराजांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा माझा आरोप आहे. प्रत्येक राजकीय पक्ष किंवा जाती धर्माचे लोक महाराजांना मानतात. त्यामुळे सरकारने कुठली तर एक तारीख ठरवावी. जर एकच तारीख असेल तर त्या सोहळ्याला भव्य स्वरूप येईल,' अशी भूमिका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे.
'मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार,' अशी माहिती शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रहाने मांडत असलेल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 'शिवजयंती एक साजरी व्हावी हा वाद होता, त्याबाबत सरकार एक समिती गठीत करणार आहे. त्यानंतर शिवजयंती एकच साजरी करण्याबाबत निर्णय होईल,' असंही अनिल परब म्हणाले. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा हट्ट शिवसेना सोडणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
भाजपचे आमदार नितेश राणेंनीही एकच शिवजयंती झाली पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचं सांगत शिवसेनेला डिवचलं आहे. 'राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय,' अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments