Trending

6/recent/ticker-posts

पावसाळ्यापूर्वी जोगीला तलाव पुनर्जीवित होणार

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली पाहणीठाणे


ऐतिहासिक जोगीला तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून येत्या पावसाळ्यामध्ये तलावात पाणी साठवले जाईल असा विश्वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जोगीला तलावाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त व्यक्त केला. दरम्यान तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
    आज १५ फेब्रुवारी रोजी  महापालिका आयुक्त  जयस्वाल यांनी जोगिला तलावाच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास नगरसेवक सुधीर कोकाटे,  अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे,  उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रविंद्र खडताळे,  उप नगर अभियंता विनोद गुप्ता, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड आदी उपस्थित होते.
     जोगिला तलावाच्या जागेवर वसलेल्या वसाहतीमधील जवळपास  350 कुटुंबाचे पुनर्वसन करून बीएसयूपी योजनांतर्गत त्यांना घरे देण्यात आली आहेत. यासोबतच तलावाच्या मागील बाजूस प्रस्तावित डीपी रस्त्यामधील व तलावालगत असलेल्या वस्त्यांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन त्याच जागी कसे करता येईल याबाबत नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तलावाच्या बाजूला असणारी मूळ तलावाची जास्तीत जास्त जागा यामध्ये कशी सामावून घेता येईल याबाबतचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी या तलावाच्या गॅबियन भिंतीचे बांधकामाचे काम पूर्ण करून पावसाळ्यानंतर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. 
    जोगिला मार्केट येथील सिमेंट काँक्रीटमध्ये निद्रिस्त झालेल्या जोगिला तलावाच्या पुनरूज्जीवनाचे काम युध्यपातळीवर सुरु आहे. तलावात अस्तित्वात असलेले सर्व नैसर्गिक स्रोत पुनर्जीवित झाले असून २४ तास पाण्याचा प्रवाह सुरु आहे. या प्रवाहातून येणारे पाणी स्वच्छ असून आज महापालिका आयुक्त श्री.जयस्वाल यांनी स्वतः पाण्याचे निरीक्षण केले. नैसर्गिक तलाव संरक्षित करून अशा पद्धतीने पुनरूज्जीवित करण्यात येणारे हे देशातील पहिले उदाहरण ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments