‘समर्थवाडी’चे शिल्पकार सुमंत वासुदेव आठल्ये डॉक्टरेटने सन्मानित
ठाणे
विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून स्थापना केलेल्या प्रसिद्ध समर्थवाडी या उपासना केंद्राचे शिल्पकार व संस्थापक सुमंत वासुदेव आठल्ये यांना बँकॉक येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिवर्सिटीतर्फे ‘अध्यात्म’ या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. हॉटेल बायोके स्काय बँकॉक, थायलंड येथे झालेल्या समारंभात डॉ, अनस अमातयाकुल, डॉ, मोहम्मद फहीम, डॉ. तासापोर्ण मोहम्मद, डॉ. प्रसेत सुक्सास्क्विन, श्री प्रेम सिंग गील यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली अशी माहिती समर्थ वाडीचे ट्रस्टी प्रद्युम्न आठल्ये व डॉ. हेमंत जगताप यांनी दिली.
या डॉक्टरेटसाठी जगभरातून साधारण २५०० प्रोफाइलचे विश्लेषण केले गेले, त्यापैकी काही निवडक जणांना डॉक्टरेटसाठी निश्चित करण्यात आले. श्री सुमंत वासुदेव आठल्ये या निवडक काही जणांपैकी एक आहेत. "अध्यात्म" या क्षेत्रात डॉक्टरेट प्राप्त करणारे आठल्ये हे महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्तीमत्व आहे. कासगाव सारख्या दुर्गम परिसरातील वातावरणातील प्रदूषण लक्षात घेऊन विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची तसेच विविध वृक्षांची लागवड येथे केली आहे. पाण्याचे महत्त्व जाणून व येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे महत्त्व पटविण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प राबवून ६०,००० घनलिटर क्षमतेचा प्रकल्प पूर्ण केला. शेततळ्यांची निर्मिती केली, सौर उर्जेची येणाऱ्या काळात गरज ओळखून सौर उर्जेवर चालणारी उपकरणे , सौर चूल यांसारखे प्रकल्प कार्यान्वित केले तसेच पवन चक्कीची उभारणी केली. तसेच परिसरातील आदिवासी साठी रोजगार उपलब्ध करून दिला याची दखल घेत आठल्ये यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. दरम्यान समर्थ वाडीची दखल शासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या