Top Post Ad

 मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन ऐनवेळेस उरकला भूमीपुजन सोहळा 

 मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन ऐनवेळेस उरकला भूमीपुजन सोहळा 
 नगरसेवकांचा ठामपा प्रशासनावर गंभीर आरोपठाणे : 
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाणे शहरातील समुह पुनर्विकास योजनेसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन नुकतेच झाले. त्यामध्ये बाळकुम भागातील विज्ञान केंद्र आणि शहरी जंगले या प्रकल्पांचा भूमीपुजन सोहळाही मोठय़ा थाटात झाला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांमध्ये या प्रकल्पांचा समावेश होतो. मात्र भूमीपुजन होताच हे दोन्ही प्रकल्प वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत मोठय़ा प्रमाणावर त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनीच हा प्रस्ताव स्थगीत ठेवल्याने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन प्रशासनाने ऐनवेळेस भूमीपुजन सोहळा उरकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. मात्र महापालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले.
बाळकुम भागातील विज्ञान केंद्र आणि शहरी जंगले या दोन्ही प्रकल्पांतील प्रस्तावित त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केवळ विकासकाच्या फायद्यासाठी हे प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  याठिकाणी खेळाचे मैदान विकसित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आयुक्त जयस्वाल यांच्यावर टिकेचे आसूड ओढल्याने अधिकारी वर्गात अस्वस्थता पसरली.  एका प्रतिथयश विकासकाच्या वास्तुविशारदाने महापालिकेकडे यापुर्वी प्रस्ताव सादर करत याठिकाणी सेंट्रल पार्क विकसित करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्याने कोणताही मोबदला घेतला जाणार नाही असेही स्पष्ट केले होते. या विकासकास या प्रकल्पाच्या उभारणीसाठी टिडीआर बहाल करण्यात आला. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या विज्ञान केंद्र आणि शहरी जंगले या प्रकल्पांची जागा बदलण्यात आली. त्यासही सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आलेली नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी यावेळी केला.
 या आरोपासंबंधीचे पुरावे सादर करून याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आव्हान त्यांनी प्रशासनाला दिले.  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत प्रशासनाच्या भुमिकेवर संशय घेऊ नका, असेही स्पष्ट केले. त्यावर नगरसेवकांनी आरोप फेटाळण्याबाबत स्पष्टीकरण देण्याचा आग्रह धरला. याविषयी ठोस माहिती देण्यात प्रशासन अपयशी ठरले. तर या प्रकल्पांचा सविस्तर अहवाल लवकरच सादर करण्यात येईल, असे उन्हाळे यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरातील समुह पुनर्विकास योजनेचे भुमीपुजन, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उद्घाटन, दिव्यांगांना घरे वाटप असे कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमात होते. विज्ञान केंद्र आणि शहरी जंगले या दोन्ही प्रकल्पांना स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता. या नगरसेवकांशी चर्चा केली असून त्यांचा विरोध मावळल्याचे प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर ऐनवेळेस मुख्यंत्र्यांच्या हस्ते प्रशासनाने या दोन्ही प्रकल्पांचे भुमीपुजन करून घेतले. या दोन्ही प्रकल्पांबाबत नगरसेवकांनी सभागृहात बरेच आक्षेप घेतले. अखेर हे दोन्ही प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावेत, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com