(जागतिक चिमणी दिवस.)
चीनने सन १९५८-६२च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळजवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत. कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा हा महत्त्वपूर्ण संकलित लेख... संपादक._
जागतिक चिमणी दिन- वर्ल्ड स्पॅरो डे हा २० मार्च रोजी पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा दि.२० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोखा निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातोय. भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. याशिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. २०२०मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे.
गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती- १) पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर), २) रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट), ३) भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर), ४) सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर), ५) बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर). चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे. चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर दिसून येत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकांचा उतारा देखील कमी होत आहे. यावर उपाय म्हणून पिकांवर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे.
चिमण्या कमी होण्याची कारणे- १. उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण. २. शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे. ३. कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले. ४. शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ५. विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. ६. वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. ७. पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत. ८. जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात. चिमण्यांच्या संवर्धनाचे उपाय- १.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो. २. पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे. ३. शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे. ४. जागतिक चिमणी दिन या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे. ५. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.
चीनने सन १९५८-६२च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती "चिमणी जगायला हवी" याची जाणीव निर्माण झाली. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.
महंमद दिलावर यांनी सन २००६मध्ये नाशिक येथे नेचर फॉरएव्हर सोसायटी नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील इकोसिस अॅक्शन फाऊंडेशन आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने सन २०१०पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात, अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो. या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे, हे योग्यच आहे!
!! जागतिक चिमणी दिनी सर्वांना सावध होण्यास हार्दिक हार्दिक शुभेच्या !!
- संकलन व शब्दांकन - कृष्णकुमार आनंदा-गोविंदा निकोडे गुरूजी.
- रामनगर वॉर्ड, गडचिरोली. -
0 टिप्पण्या