चीन देशाची सत्ता तेव्हा 'माओ झेडाँग' च्या हाती होती.त्यावेळी चीनची अर्थव्यवस्था दोलायमान झालेली तिला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व आपले पारंपारीक शत्रू अमेरिका व ब्रिटन तथा इतर युरोपीय देशांच्या श्रेणीत चीनला बसविण्यासाठी माओने चीनमधे काहीतरी भपकेबाज कृत्य करण्याचे ठरवले.चीन तेव्हा आजच्याप्रमाणे पुढारलेला नसून शेतीप्रधान होता.शेतीव्यवसाय व कारखानदारीत झपाट्याने वाढ घडवून आणून अवघ्या एक-दोन दशकात आपण आर्थिक क्रांतीचे जनक बनू,या ध्येयाने माओला झपाटलेले.यातूनच 'द ग्रेट लीप फाॅरवर्ड' ही विघातक मोहीम उदयाला आली.अन्नधान्य पिकांची शेती,ही सामूहीक पद्धतीने करण्याचा अजबच फैसला माओने घेतला व त्याच्या भोवतीच्या स्तूतीपाठकांनीही हा निर्णय कसा योग्य (?) आहे हे त्याला फुगवून-पटवून दिले.
यावेळी कुणा तज्ञांनी (?) माओपुढे हे ज्ञान पाजळले की "ग्रेट लीप मोहिमेला पक्षी,विशेषतः चिमण्या धोक्यात आणू शकतात"(सोबतच त्यांनी उदीर,पानकिडे व इतर किटकांचीही उदाहरणे दिली)...यावर माओच्या 'का?' ला त्यांनी उत्तर दिले की,"चिमण्या दिवसात ४ते५किलो धान सहज खातात,देशात त्या लाखोंच्या संख्येत असून एकाच वेळी जर त्या धान्यावर तुटून पडल्या तर राष्ट्रीय उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होईल.तेव्हा त्यांचा बंदोबस्त करणे राष्ट्रहिताचेच आहे".....झालं!...हे ऐकून माओच्या डोक्यात हेच फ्याड शिरले व त्याने *'चिमण्या मारो आंदोलन'* ची अधिकृत सरकारी घोषणा दिली.मग काय? सरकारचाच आदेश असल्याने जनतेने गावोगावी चिमण्या मारायचे जगातील सर्वात संहारक सत्र आरंभले.हातात वाद्ये, काठ्या, जाळ्या, पिंजरे, बंदूका, भाले, लगोरी, तीरकामठे, दगड, मशाली, आकडे, तारा,दोर,कापड लावलेले वेळू इ.घेऊन लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी 'चिमण्या मारण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात' हटकून पुढाकार घेतला.
झाडांवर बसलेल्या चिमण्या उडवून लावत काठ्यांनी डिवचून,दगडे मारून त्रस्त केले जाई,त्यांना एका ठिकाणी क्षणभर सुद्धा बसू न् देता समूहाने त्यांचा सातत्याने पाठलाग करून कोंडी केली जात असे.'टाळ्या-थाळ्या वाजवून' त्यांना घाबरवून सोडीत. मग पंख फडफडवून थकलेल्या चिमण्या कंटाळून जमीनीवर पडत व मारल्या जात.अनेकांनी बंदूकीने हजारो चिमण्या टिपल्या,तर अनेकांनी 'ट्रक भरून' मारलेल्या चिमण्या सरकारी कार्यालयासमोर सादर करून बक्षीसे मिळवली.लाकडी गाड्यांवर मारलेल्या चिमण्यांना हजारोंच्या संख्येने उलट्या टांगून मिरवणूक काढली जाई.'कोण किती जास्त चिमण्या मारतो' याची पाशवी स्पर्धाच चीनमधे जुंपली.
विकृतीचे हे चित्र इथेच थांबले नाही,ते इतके विदारक होते की चीनी जनतेने मारलेल्या चिमण्या दोरीत ओवून त्याचे हार गळ्यात घालून मिरवले.
अशा प्रकारे चीनच्या एकट्या शांघाय प्रांतात 'फक्त एकाच महिन्यात' सुमारे १३लाख७०हजार चिमण्यांची सरकार व जनतेकडून कत्तल केली गेली असे 'फ्रँक डिकोटर' याने पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.(चीन सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी हा आकडा दीड लाख इतका कमी दाखवला असला तरीही फ्रँक डिकोटर च्या 'माओज ग्रेट फेमीन' या ग्रंथातील पृष्ठ क्र.१००ते१२०दरम्यान त्याने वरील आकडा संशोधनातून दिला आहे).ही मोहीम दोन वर्षे चालू होती मग यात किती चिमण्या व इतर पक्षी मारले गेले असतील याची कल्पनाच न् केलेली बरी.
चिमण्यांच्या या संहाराचा जो परिणाम व्हायचा होता तोच झाला.केवळ एक वर्षाच्या आत चीनचे शेतीव्यवसायातील उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झाले. का? तर त्या वर्षी 'टोळ' या किटकांच्या करोडोंच्या संख्येने 'टोळधाडी' देशातील शेतीपिकांवर पडू लागल्या.शेतीउत्पन्न घटले व पुन्हा आर्थिक दारिद्र आले.'टोळांना खाणार्या चिमण्या,टोळांचा फडशा पाडणार्या चिमण्या' चीनी जनतेने संपवून टाकल्याने चीनमधील बहुतांशी शेतपिकांचा सुपडा साफ झाला,सुमारे ६५-७०%चीनी शेतकरी रस्त्यावर आले व सुमारे '४.५कोटी चीनी जनता' केवळ उपासमारीमुळे तडफडून मेली(हा आकडा सुद्धा चीन सरकारने १कोटी इतका कमी करून दाखवला परंतु प्रामाणीक पत्रकार,संशोधक व पर्यावरणवाद्यांनी ४.५कोटी लोक मेल्याचे पुरावे दाखवून दिले).
उपासमार इतकी की एका संशोधक पत्रकाराच्या मते चीनी जनतेकडील अन्नधान्यच संपल्याने शेवटी गावोगावचे लोक चिखलाचे गोळे करून त्यावर मीठ लावून खाऊ लागले व त्यातच त्यांचा अंत झाला.चिमण्या केवळ धान्न्यच खातात व शेतीस नुकसान पोचवतात असे नसून त्या किटकांचे सुद्धा भक्षण करून शेतपिकांना एकप्रकारे संरक्षणही देतात,त्या शेतकर्यांच्या मित्रच आहेत ही बाब चीनी लोकांच्या ध्यानात येईपर्यंत खूप-खूप उशिर झाला होता ज्याची किंमत ४.५कोटी जनतेच्या मृत्यूतून मोजावी लागली.शेवटी माओला याचा प्रचंड पश्चाताप झाला.ग्रेट फाॅरवर्ड लिप वगैरे फोल गेले.टोळांनी व इतर किटकांनीही चीनी लोकांचे जगणेच हराम करून टाकले.किटकांकडून माणसे जिवंत पोखरली जाऊ लागल्यावर मात्र घाबरून जाऊन माओने सोव्हिएत युनियन मधून 'चिमण्यांची अंडी व जिवंत चिमण्या मागवल्या' व चीनमधे या 'मागवलेल्या चिमण्यांना' विवीध ठिकाणी रहिवासासाठी सोडून दिले.इतकी आफत चिमण्यांची व इतर पक्षांची कत्तल केल्यामुळेच ओढवली हे पुढे जनतेच्याही ध्यानात आले.
हे संपूर्ण संहार सत्र पाहता हा बोध घ्यायला हवा,की मनुष्यजन्माच्या लाखो करोडो वर्षांपूर्वीपासून श्रृष्टीचक्र अविरतपणे चालू आहे व पुढेही ते अज्ञात काळापर्यंत चालूच राहिल.इथला प्रत्येक सजीव हा निसर्गनिर्मीत सजीवसाखळीचा- निसर्गचक्राचा अविभाज्य घटक आहे.या साखळीतील एक कडी जरी निसटली तर संपूर्ण साखळी विस्कटून जाईल.फक्त दोनच वर्षात चीनने साडेचार कोटी माणसे गमवीली.कल्पना करा चिमणी व इतर पक्षी कुळे जर धोक्यात आली तर 'किती तास' मनुष्य या पृथ्वीवर जगू शकेल? निसर्गचक्राचा नियमभंग करून मानवी स्वार्थासाठी हवा तसा बदल करण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याचा 'माओ' झाल्याशिवाय राहणार नाही!!
या सर्व श्रृष्टीवरील जैवविवीधता टिकवून ठेवणारा जो 'झाड नावाचा बाप' आहे,त्याला जपा...मग सगळं नियंत्रणात राहील....!
0 टिप्पण्या