Top Post Ad

कोट्यवधी रुपयांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त


    अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारवायांचा धडाका सुरु ;कोट्यवधी रुपयांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त

सणासुदीच्या पार्श्वभुमीवर खाद्यतेल, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई विक्रेते, इत्यादी एफ.डी.ए. च्या रडारवर असून सदर अन्न पदार्थांमध्ये तपासणी दरम्यान भेसळ आढळून आल्यास भेसळखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेले आहेत.  आत्राम यांनी मंत्रीपदाचा कार्यभार घेताच कोकण, बृहन्मुंबई, नागपूर, अमरावती इ. विभाग स्तरावर आढावा बैठक घेऊन अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले व उपलब्ध मनुष्यबळामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अधिकारी जोमाने कामाला लागले असून अन्न व औषध पदार्थांची मोठ्या प्रमाणात जप्ती मोहिम संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदांची संख्या मोठी असली तरी उपलब्ध सर्व स्टाफ पुर्ण क्षमतेने कामाला लागला असून अगदी सुटीच्या दिवशीसुध्दा धाडसत्र सुरु आहे.

त्याचबरोबर विभागाच्या अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन विभागातील मनुष्यबळ, साधनसामुग्री, इ. अडचणी सोडविण्याबाबत पुढाकार घेतला. त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यामध्ये आशादायक चित्र निर्माण झाले. ज्याचा परिणाम म्हणून सर्व अधिकारी व कर्मचारी पुर्ण क्षमतेने कामाला लागले असून विभागाने आजपर्यंत सुमारे दहा कोटी पेक्षा अधिक किमतीचे अन्न पदार्थ व प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त केले असून नाशवंत अन्न पदार्थांचा साठा घटनास्थळी नष्ट करण्यात आलेला आहे. मागील महिन्यात जप्ती/घाडीच्या एकूण ८३ कारवायांमध्ये १५३ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले असून सुमारे २,४२,३५२ कि. लो. इतका अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. ज्याची किंमत रुपये ४,४९,९४,७४७/- इतकी आहे. त्याचबरोबर प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या ४६ कारवाया करण्यात आलेल्या असून एकूण ३,०६,७२, १३९ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून सदर प्रकरणी भा.द.वि. कलम ३२८ सह विविध कलमांतर्गत ३९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

या कारवायांसोबतच ईट राईट इंडिया उपक्रमाअंतर्गत, ईट राईट मिलेट मेला, मिलेट वॉकॅथॉन, क्लिन स्ट्रीट फुड हब, इट राइट कॅम्पस, अन्न व्यावसायिकांना फॉस्टँक ट्रेनिंग, ईट राईट स्कुल, इ. जनजागृतीचे कार्यक्रम व्यापक स्तरावर घेण्यात येत असल्यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत अशा मंत्री आत्राम यांनी विभागास सुचना दिल्या. त्याचबरोबर कारवाईची व्याप्ती येणाऱ्या दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर वाढविण्यात येईल असे सुतोवाच  मंत्री महोदयांनी केले आहेत. तसेच नागरिकांच्या काही तक्रारी असतील किंवा अन्न पदार्थामधील भेसळीच्या अनुषंगाने काही गुप्त माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने  केले आहे.

हे पण वाचा- # दुग्धजन्य व मावा मिठाचे काळे सत्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com