Top Post Ad

न्यायाच्या प्रतीक्षेत.... रमाबाई आंबेडकर नगर

 


 रमाबाई नगर गोळीबार 

११ जुलै १९९७ रोजी माता रमाई आंबेडकर नगर, घाटकोपर, मुंबई येथे प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. पुतळा विटंबनेनंतर आंबेडकरी अनुयायाच्या जमावावर राज्य राखीव पोलीस दलाचे मनोहर कदम या अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला. त्यात त्याने लहान लहान मुलासह आणि महिलेसह ११ निष्पाप जिवांचा बळी घेतला. वास्तविकता कुठल्याही जमावावर पोलिसांनी कधी बेछूट गोळीबार केल्याचे स्मरत नाही. जमलेल्या जमावावर त्यांना पांगविण्यासाठी प्रथम लाठीमार केला जातो. अश्रुधूर सोडला जातो. मात्र रमाई नगरात आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार का करण्यात आला ?  सदर जमाव शांततेच्या मार्गानेच आपला संताप आक्रोश व्यक्त करत होता. त्याच्यावर लाठीमार अश्रूधूर सोडण्याचीही गरज नसतांना अंदाबूद गोळीबार केला जणू भारत पाकिस्तानच्या सीमेवर सदर गोळीबार सुरू होता काय? रमाई नगरात गाळीबारात बळी गेलेले पाकिस्तानी होते काय ?

आज ११ जुलै २०२३ साल उजाडले २५ वर्षे झाली. मात्र हे सतत जाणवत राहिले. शासन आणि प्रशासन दलितांना मारणाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो. कारण जेव्हा सदर घटना घडली तेव्हा शिवसेना बीजेपीचं सरकार होतं. तेव्हा ही शासन प्रशासन मनोहर कदमला वाचविण्यासाठी सतर्क होतं. नंतर झालेल्या निवडणूकीत आंबेडकरी जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मते दिली. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आलं. मात्र सदर सरकारही मनोहर कदमच्या बाजूनेच आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) चे कार्यकर्तेच सतत न्यायालयीन लढाईत सुध्दा सतत अग्रेसर राहिले आहेत. खरं तर मनोहर कदमला सरकारने अटक करणे गरजेचे होते मात्र अँड. शकिल अहमद यांना कोर्टात केस दाखल करावी लागली. त्यासाठी अॅड. संघराज रूपवते सतत कोर्टाच्या लढाईत अग्रेसर राहिले. अँड. गजानन लासुरे, अँड. अनिकेत देशकर, अॅड. मनोज जाधव सतत या संघर्षात अग्रभागी राहिले. म्हणून किमान सदर खटला चालू तरी राहिला व कोर्टाला दखल घेऊन मनोहर कदमला अटक करण्यात आली. मात्र ती अटक फक्त कागदोपत्रीच झाली आणि विना विलंब कोर्टातच मनोहर कदमची जामिनावर मुक्तताही झाली. एवढी चपळाई पोलिस यंत्रणेने केली, तरीही लोकशाही कोर्टाच्या माध्यमातून सदर लढाई सुरू ठेवली. 

एवढेच नव्हे तर जलदगतिने न्यायालयात खटला चालविण्यासाठी आम्ही अँड. विजय प्रधान यांची नियुक्ती करावी तसेच अँड बी.जी. बनसोडे यांची नियुक्ती करावी म्हणून त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना निवेदन दिली  प्रस्थपित यंत्रणेकडून सतत टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आले. तरीही आम्ही सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यावेळचे गृहमंत्री आर.आर.पाटीलांनी वकिलांची मागणी मान्य केली. पोलिस यंत्रणेकडून सदर खटल्याची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही लक्षात येत होते. तरीही कोर्टाची लढाई अॅड. संघराज रूपवतेच्या माध्यमातून सुरूच होती. आम्ही ही सतत रस्त्यावरची लढाई लढतच होतो. ही लढाई तशी विषमच. प्रस्थापितांविरूध्द संघर्ष करणे किती अवघड असते याची जाणीव सतत येत होती. एका पोलिस अधिकारी मनोहर कदमला वाचविण्यासाठी पोलिस यंत्रणा किती कार्य तत्पर होती हेही दिसत होते.

मध्यतरी ऑस्ट्रेलियामध्ये एका माथेफिरून गोळीबार केला. त्यात पुण्याचा एक विदयार्थी मरण पावला. ऑस्ट्रेलियाचे पोलिस पुण्यापर्यंत आले. त्या विदयार्थीच्या माता-पित्यांची भेट घेतली. त्यांना आश्वस्त केले कि तुमच्या मुलाच्या मारेकन्यांना सजा देऊ आणि खरोखरच अवघ्या सहा महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या पोलिस यंत्रणनेने कोर्टामार्फत मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा दिलीच. आपल्या देशात न्यायाच्या नावाने बोंबच आहे. आज मनोहर कदम नावाचा सैतान सनातन धर्माध दहशतवादयांना बंदूक चालविण्याचं प्रशिक्षण देतोय असं अनेक वृत्तपत्रात छापून आलयं. ज्यानं ११ माणसं मारली तो अधिक माणसे मारण्यासाठी सनातन्यांना प्रशिक्षण देतोय हे फक्त आपल्याच देशात घडू शकतं.

सुदैवानं महाराष्ट्राला आपण पुरोगामी म्हणतो ते सत्य आहे. मात्र निवडणूकीचा राजकारणात बाळ ठाकरे नावाच्या इसमाने दलितांविरूध्द सतत द्वेष ओकत होता. त्याचा त्याला राजकिय आर्थिक लाभ झालाच पण थोडाफार पुरोगामी असणारा महाराष्ट्र जात्यंध आणि धर्मांध करण्याचं श्रेय नक्कीच बाळ ठाकरेला दयावेच लागेल आणि त्यामुळेच पेरलं तसं उगवलं महाराष्ट्राच्या भूमीत धर्माध जात्यंध दहशतवादी गावोगाव तयार झाले आणि त्याचं राजकियकरण होत, खरं तर त्यावेळी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पद भूषविणारे छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांच्याकडून अपेक्षा होत्या मनोहर कदमला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेतील असं वाटत होत 

कारण रमाई नगरात झालेल्या गोळीबारानंतर विरोधी पक्षात असताना अत्यंत आक्रमकपणे सेना बी.जे.पी. सरकारच्या विरोधात पवित्रा घेणारे व शहीदांना न्याय देण्याची भाषा करणारे भुजबळ जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र त्यांनीही मनोहर कदमची पाठराखण केल्याचे जाणवते. छगन भुजबळांच्या मलबार हिल येथील बंगल्यावर अॅड. संघराज रूपवते, अॅड, शकिल अहमद आणि मी स्वतः राजाराम खरात त्यांची भेट घेतली आणि मनोहर कदमला ३०२ कलम लावण्याची मागी केली असता हाताच्या मुठी एकमेकांवर आपटून आवळून अत्यंत नाटकी भाषेत त्यांनी ३०४ कलम कसे योग्य आहे असे सांगितले आणि ताबडतोब प्रतिवाद करण्याची आम्हास संधीच न देता भुजबळ आतल्या दालनात निघुन गेले. राजकारणी माणसे किती भयानकपणे बदलतात याचा अनुभव आला.

पुन्हा सत्तांतर झालयं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आले. त्यांना ही अनेकदा निवेदने दिली. मात्र सनातन्यांना पाठीशी घालणारे  फडणवीस यांच्याकडून तर अपेक्षा करणेही गैर आहे होते. ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक दलितांचे निर्दयी खून करण्यात आले. अनेकदा दलितांवर अन्याय अत्याचार झाले. एवढेच नव्हे तर १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगांव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड संख्येने आंबेडकरी जनता आली होती. तीन किलोमीटर अंतरावर आंबेडकरी अनुयायांच्या गाडया थांबवण्यात आल्या आणि अदयापही गुडघ्यात अक्कल असलेल्या भिडेच्या मराठी धारकरी दहशतवादयांनी अनेकांवर जिवघेणे हल्ले केले. त्यांच्या गाडया तोडल्या. एवढेच नव्हे तर पोलिसांशी संगनमत करून आलेल्या आंबेडकरी जनतेला अन्नच काय पाणी सुध्दा मिळणार नाही याची तजवीज केली. संपूर्ण भिमा कोरेगाव मधील हॉटेल, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हे सगळं माहित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहर उर्फ संभाजी भिडेला आणि त्यांच्या पिळावळीला शासन करू शकले नाहीत मात्र त्यांची पाठराखण स्वतः त्यावेळचे मुख्यमंत्री करतात त्या मुख्यमंत्र्याकडुन किंवा या व्यवस्थेकडून या दोन्ही मनोहरांना शिक्षा होईल अशी अपेक्षा कशी काय ठेवणार? 

अमेरिकन काळया इसमाला द्वेषबुध्दीने पोलिस अधिकान्याने ठार मारले. मात्र तेथील सजग पोलिस यंत्रणेने त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली. एवढेच नव्हे तर त्या देशाचे प्रमुख असलेले अध्यक्ष बायडेन सुध्दा गुडघे टेकून त्याच्या कुटुंबियांची माफी मागतात. आपल्या देशातील पोलिस प्रशासनातून जातीवाद हद्दपार होईल ? उलट लाखे नावाच्या महिला पोलीस अधिकारी गर्वाने बोलतात दलित लोक तक्रार करायला आले की, मी त्यांना झोडपून काढते, किती जातीयवाद आहे पोलिस खात्यात.

खैरलांजी प्रकरणी जेव्हा आंबेडकरी महिला भोतमांगे कुटुंबियांना न्याय दयावा अशी मागणी घेऊन मंत्रालयात जातात तेव्हा एक पोलीस अधिकारी महिलांसोबत द्वेषपूर्वक वागणूक करतो आणि अरेरावीने म्हणतो ५ लाख रूपिया दिया ना अभी जाव, क्या है इधर ? किती उध्दटपणा, ज्या देशातील पोलीस यंत्रणा एवढी पराकोटीची सडलेली असेल त्या देशात गोरगरीबांना दलितांना न्याय मिळणेच शक्यच नाही. रोगाने जर्जर झालेला हालचाल करू न शकणारा ८४ वर्षांचा वयोवृध्द स्टेन स्वामीचा हालहाल होऊन मृत्यूच होतो. त्याला शेवटपर्यंत जामिनच मिळत नाही. मात्र बॉम्बस्फोट घडवून आणणरे शस्त्र धारण करणारे, बॉम्ब बनविणारे सनातनी मात्र मोकाट हयाच देशात असू शकतात.

मध्यंतरी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असं महाआघाडीचं सरकार सत्तेवर आले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. काही अंशी त्यांच्या बाबतीत आपूलकी असू शकते पण दलित विरोधी गुन्हेगारांवर ते कारवाई करतील अशी अजिबात शक्यता वाटत नव्हतीच. आज पुन्हा नव्याने सत्तांतर झाले. उध्दव ठाकरेचं सरकार पाडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांना ही निवेदन दिले. विदयमान उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना ही निवेदन दिले. तरीही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळण्याची आशा नाही. आज फोडाफोडीच्या राजकारणात सारेच सत्ताधीस मग्न आहेत. नव्याने त्यांना राष्ट्रवादीचा फुटीर गट मिळाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. रमाई आंबेडकर नगरात नकाश्रू ढाळणारे छगन भुजबळ पुन्हा मंत्रीपदी विराजमान झाले. आजचे सत्ताधीश सतत सत्तेत असूनही रमाई आंबेडकर नगरात गोळीबार करणान्या सैतान मनोहर कदमला गेल्या २५ वर्षात शिक्षा देऊ शकले नाहीत. उलट सदर सत्ताधान्यांनी सतत मनोहर कदमची पाठराखण केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर के) च्या माध्यामातून सतत मोर्चे धरणे आंदोलने केली अदयापही त्यासाठीचा संघर्ष करतोय, लोकशाहीच्या माध्यामातून निवडून आलेल सरकार लोकशाहीच्या पध्दतीने आंदोलन करणाऱ्यांची दखल घेते असं कधी जाणवलंच नाही आणि आजही तसं जाणवत नाही. दलितांना मारा, झोडा अन्याय अत्याचार करा महिलांवर बलात्कार करा - - - त्यांच्या नग्न धिंड काढा सरकार ढिम्म असतं. कारण दलितांकडून मोठया प्रमाणावर उद्रेक होणार नाही याची सरकारला आता खात्री झाली आहे. असे उद्रेक झालेच तर कोम्बीन ऑपरेशन करून तरूणांना हकनाक आरोपी केले जाते. त्यांना अटक केली जाते. जामिन मिळणार नाही अशी कलमे लावली जातात. त्यांचे जीवनच सरकारी इथली प्रस्थापित यंत्रणा उध्दवस्त करते आणि ही कोम्बींग ऑपरेशन होतात ती ही फक्त बौध्दांच्याच वस्तीत. 

अनेकदा अनेक ठिकाणी भयानक उद्रेक झालेले पाहिले.  मात्र त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा शेपूट घालून असते आणि दलितांच्या बाबतीतच पोलिसांना स्वतः मर्द असल्याची जाणीव होते. दलितांना मारताना त्यांची ५६ इंचाची छाती ११२ इंच ही होते. किती भयानक हा जातीवाद आणि तो फक्त ठरावीक समाजाच्या बाबतीत असतो. कोम्बींग ऑपरेशन दहशतवादयांना हुडकण्यासाठी केले जाते. भारताच्या सीमा परिसरात अशी कोम्बींग ऑपरेशन केली जातात. मात्र येथील पोलीस यंत्रणा नागरीवस्तीत आणि त्याही ठरावीक वस्तीतच कोम्बींग ऑपरेशन करतील इतर ठिकाणी त्याची हिम्मतच होणार नाही प्रचिती येते जाणीव होते. हा भारत देश आमुचा आहे याची प्रचंड मोठी जाणीव येथल्या प्रत्येकाला आहे. देशाच नुकसान व्हावं अस कधीही इथल्या बौध्द समाजाला वाटणार नाही. भारतीय सैन्यात भरती होऊन देशाच्या रक्षणाचं काम करतात. शत्रूशी लढता लढता शहीद होतात. मात्र इकडे त्याच शहीदांच्या माय भगिनींची नग्नधिंड काढली जात असेल, त्याच माय भगिनीवर बलात्कार होत असतील त्याच्यावर सामुदायिक बहिष्कार टाकला जात असेल, त्यांना ठार मारल जात असेल तर असा अन्याय अत्याचार किती दिवस सहन करायचा हा मोठा प्रश्नच आहे.

बॉम्बस्फोट घडवून निपराधांना मारावं एवढं निर्दनीपणा आमच्या ठायी नाही. मात्र संघर्ष अटळ असेल. आम्ही जाती धर्मापेक्षा भारत देश मोठा समजतो. आम्हीच खरे भारतीय आहोत आणि अखेरपर्यंत भारतीयच असणार आहोत. जगात सैतान आहे कि नाही माहिती नाही. मात्र जातीयवादी सैतान आजही सतत जवळून पहात आहोत आणि  मनोहर कदम नावाच्या सैतानाला प्रशासनातील जातीयवादी  जाणीवपूर्वक वाचवित आहेत. माणसांमध्ये दडलेली ही सैतान, उदया देशाचा घात ही करतील. तसे इतिहासात अनेक दाखले मिळतातच.

. जातीयतेचा उन्मात ज्यांच्या नसानसात भिनलाय त्यांना कसली आलीय लाज, निर्लज्ज प्रस्तापित रिपाई नेत्यांनी अन्य पक्षांशी युती करताना एक दिलाने मनोहर कदमच्या फाशीची मागणी केली असती आणि सतत गदारोळ केला असता तर कदाचित मनोहर कदमला फाशीही झाली असती. मात्र सत्तेच्या डावपेचात सदर विषय रिपाई नेतृत्त्वाकडून अदखलपात्र करण्यात आला. एवढेच नव्हे तर रमाई नगरातील गोळीबारानंतर चार खासदार निवडून गेले. त्यांनी संसदेमध्ये यावर एक शब्द ही उच्चारला नाही. असे एकीवात ही नाही अशी बोथट अन् बेपर्वा असणाऱ्या  नेतृत्वाच्या नादी आम्ही लागावं हे अत्यंत घातकच नव्हे काय ? -  

११ जुलै १९९७ रोजी गोळीबारात शहीद झालेल्या भिमसैनिकांना दरवर्षाप्रमाणे विनम्र अभिवादन.

राजाराम खरात,  M- 88791 26103

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com