Top Post Ad

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाची २५ वर्ष... तरीही आरोपी मोकाटच...

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडुन २५ वर्षे पुर्ण होत आहेत...

मुंबईतील घाटकोपर येथील श्रमिक, कष्टकरी, लोकांची वस्ती म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर. या वस्तितील स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने एकत्रित येऊन वस्तीमध्ये असलेल्या पोलीस चौकीच्या अगदी जवळच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला.११ जुलै १९९७ साली भल्या पहाटे कोणीतरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली. शेजारील पोलीस चौकीमध्ये पोलीस हजर असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता. पहाटे ही बातमी संपूर्ण रमाबाई नगरात वेगाने पसरली. वस्तीतील सर्व आंबेडकरी जनतेने एकच आक्रोश केला. सर्व वस्तीमध्ये संतापाची लाट पसरली होती. लोक पुतळ्याभोवती जमु लागले होते. आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरू लागली. 

एका पोलीस अधिकाऱ्याने काठीने चपलांचा हार खाली काढला. लोक आरोपीच्या अटकेची मागणी धरुन वस्तीच्या शेजारील मुख्य हायवे वर ठाण मांडून बसले. तेवढ्यात अचानक खाड खाड बुट वाजवीत सशस्त्र जवान गाडीतून उतरले त्यांनी जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बंदुका रोखून धरल्या आणि तेवढ्यात फौजदार मनोहर कदम याने थेट गोळीबाराचा आदेश दिला. त्यानंतर जमलेल्या आंबेडकरी जनतेवर बेछुट पणे तीव्र असा गोळीबार करण्यात आला. दहा लोक जागच्या जागी मृत्युमुखी पडले. अनेक लोक प्रचंड जखमी झाले. रमाबाई नगरची संपूर्ण वस्ती रक्ताने माखली. काय करावे कुणाला सुचेनासे झाले. आंबेडकरी जनतेवरील अत्यंत भयानक आणि विषेश म्हणजे सरकारी यंत्रणेकडुनच झालेला हा खुनी भयावह हल्ला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. आंबेडकरी जनतेच्या इतका क्रुर आणि भयानक हत्याकांड घडल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गोळीबाराचा आदेश देणाऱ्या फौजदार मनोहर कदमची जाहीर प्रशंसा केली. संपूर्ण वस्ती संतापली होती. आंबेडकरी समाजामध्ये असंतोषाचा आगडोंब झालेला होता . 

ज्या लोकांनी वस्तीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवून अटक केली व त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या स्थापने नंतर सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्या. गुंडेवार आयोग स्थापन केला. न्यायालयीन लढाई सुरु झाली. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने आंदोलनात सातत्य ठेवले. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याला तोड नाही. गुंडेवार आयोगाचा अहवाल विधानपटलावर आणण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई झाली. अहवाल पटलावर आला. प्रसिद्ध झाला. न्या. गुंडेवारांनी हा गोळीबार निशस्त्र व शांत जनतेवर केला असा अभिप्राय दिला. नंतर आघाडी सरकार आले. त्यांनी मनोहर कदमवर भा.द.वी. ३०२ ऐवजी ३०४ हे कलम लाऊन तब्बल ८ वर्षांनी फिर्याद नोंदवली. कार्यकर्त्यांवरील केसेसच्या सुनावण्या सुरू झाल्या. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीच्या अथक परिश्रमाने रमाबाई नगरच्या वस्तीमधील कार्यकर्ते खोट्या केसेस मधून निर्दोष सुटले. विटंबनेच्या आरोपातून व दंगलीच्या आरोपातून कार्यकर्ते निरपराध शाबित झाले. गोळीबाराचा आदेश देणारा फौजदार मनोहर कदमला जन्मठेप झाली. पण तो आज जामिनावर मुक्त आहे. त्याचे अपिल मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.. 

 या हत्त्याकांडत अनेक भीमसैनिकांना, आबाल माया बहिणींना, वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी हा काळा दिवस आहे. इथल्या लोकांशी बोलताना ‘ती’ घटना घडल्यानंतचं सर्व काही डोळ्यांसमोर पुन्हा एकदा उभं राहतं- ११ जुलै 1997 ला  जातीवादी हरामखोर  राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम  याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण ठार झाले होते तर 23 जण जखमी झाले. या भ्याड  हाल्यात शहीद झालेल्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन.

या सर्व घटनेला एक राजकीय पाश्र्वभूमी देखील आहे. ती सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं ठरेल. ही घटना घडली तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. कदमने केलेला गोळीबार योग्य होता, हे दाखवणसाठी टँकर स्टोरी रचण्यात आली, असं इथला प्रत्येकजण सांगतो. पुढे ही टँकर स्टोरी युती सरकारला महागात पडली, हे वेगळं सांगायला नकोच. रमाबाई नगरातल्या या हत्याकांडानंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला. पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली. मनोहर कदमसाररखा अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. 

शिवाय, कदम याच्यामुळे रमाबाई नगरीत झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपकाही आयोगाने ठेवला होता.  असं असतानाही राज्य सरकारने त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबनासाठी गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता. सुरुवातीला या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी दलित कार्यकर्ते मोठय़ा संख्येने न्यायालयात जमत होते. पण जसजशी वर्ष गेली तसतशी नियमितपणे न्यायालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी कमी होत गेली..

 नंतर दलितांच्या रेटय़ामुळे अखेर सरकारने जलदगती न्यायालयाची स्थापना केली खरी, पण त्यातही सरकारचा पुढाकार दिसलाच नाही. अखेर शिवडीच्या जलदगती सत्र न्यायालयाने हा खटला १६ मार्च २००९ रोजी संपवला आणि एकदाचा याचा निकाल जाहीर केला. पण निकाल जाहीर करण्यासाठीही त्याचा दिवस दोनवेळा पुढे ढकलला. अखेर ९ एप्रिल रोजी निकाल लागला. न्यायालयाने हरामखोर मनोहर कदमला रमाबाई नगर गोळीबारप्रकरणी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निकाल लागला खरा पण लढाई मात्र संपलेली नाही. ज्या लोकांवर मनोहर कदमने गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्या साक्षीदारांनाच ‘दंगलखोर’ ठरवण्यासाठी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते. त्यामुळे रमाबाई नगरातले सामान्य लोक ’आम्ही गुन्हेगार नाही’ हे सिध्द करण्यासाठी अजूनही धडपडताहेत, कोणतीही चूक नसताना न्यायालयात चकरा माराव्या लागल्या. पण एक प्रश्न रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मानगुटीवर भूतासारखा बसलेला आहे प्रत्येकाला तो सतावतोय- ११ जुलै १९९७ रोजी रमाबाई नगरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना कुणी केली ? रमाबाई नगरातल्या प्रत्येकाच्या मनात खदखदणारी गोष्ट ती हिच. का केली कुणी आमच्या दैवताची विटंबना ?  

दरवर्षी ११ जुलै रोजी रमाबाई नगरात वेगवेगळ्या रिपब्लिकन गटांचे भरगच्च फ्लेक्स, बॅनर लागलेले असतात. अनेक नेते पुतळ्याला अभिवादन करायला येवून मोठमोठे भाषण ठोकून जातात. परंतु रमाबाई आंबेडकर नगर आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात रमाबाई नगर हत्त्याकांडात भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील मोठ्या अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय आहे. स्वतंत्र भारतात वावरणाऱ्या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समूहावरील द्वेष जगासमोर आणणारी हि घटना होती.ज्या वस्तीमध्ये जातीयवादी नेते यायला सुध्दा घाबरत होते आज त्याच वस्तीमध्ये कमळाच्या फुलाचे आणि धनुष्य बाणाचे जोरदार स्वागत होत आहे.. ज्यांनी मनोहर कदमला कायम पाठिशी घातले त्यांच्याशीच खुलेआमपणे राजकीय सौदेबाजी होताना दिसत आहे. अर्थात हे सर्व ब्राम्हणवादी शक्तींच्या युतीच्या शामियान्याच्या वळचणीला गेलेल्या आपल्या संधिसाधू जोकर पुढाऱ्यांमुळे...रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड, अभिवादन सभेचे आयोजन
मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांडाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात मारल्या गेलेल्या निरपराध आंबेडकरी कार्यकर्त्यांप्रती अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  शहीद स्मारक सभागृह, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व), येथे दि. ११ जुलै रोजी दु. ४ ते सायं. ७ दरम्यान या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समिती - मुंबई, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती - मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) - मुंबई यांनी दिली आहे. 

सभेच्या अध्यक्षस्थानी  अॅड. किरण चन्ने असतील तर  प्रस्तावना जयवंत हिरे  व सुत्रसंचालन डॉ. अरविंद उबाळे करणार आहेत तसेच यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्यामदादा गायकवाड, पार्थ पोळके, मिलिंद भवार, कॉ. उदय चौधरी, सुबोध मोरे, सयाजी वाघमारे, सुमेध जाधव आणि निखिल वागळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात जवखेड दलित हत्याकांडातील पीडितांची न्यायलयीन बाजू मांडणारे अॅड.एस्. जी. मगरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला जाईल.असे हिरामण गायकवाड, अविनाश खरात, रुपेश निकम, महादेव गोडबोले, प्रशांत दिवे, मनोज माने, योगेश संगारे, दिनेश गायकवाड, शैलेश खरात, बुध्दभूषण सुर्वे, विनोद खैरे, शेखर वाघमारे, जगन्नाथ ओगले यांनी सांगितले. 

----------------------------------- टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com