Top Post Ad

जयंती साजरी केली म्हणून जातीवादी गावगुंडांनी केली तरुणाची निर्घूण हत्या


 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून बौद्ध  तरुण अक्षय भालेरावची निर्घूण हत्या. ...

गाव बोंडार तर्फे हवेली जिल्हा नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनी अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची गावातील जातीवादी लोकांनी भीषण हत्या केली. अक्षय भालेराव हा तरुण वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणीचा महासचिव म्हणून कार्य करीत होता. या गावात जातीवादी लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू देत नव्हते, संपुर्ण गावावरच बहिष्कार असा या गावाचा इतिहास आहे. 2023 मध्ये अक्षय भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते व उपाध्यक्ष फारूख अहमद यांच्या मदतीने रितसर पोलिसांची परवानगी घेऊन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.जातीवादी लोकांना याचा भयंकर राग आला. हा राग क्रूरुपणात परिवर्तित झाला. त्यांनी अक्षय भालेराव याची भिषण हत्या केली.  पुरोगामी महाराष्ट्र म्हणल्या जाणाऱ्या राज्यात ही घटना  हादरून टाकणारी आहे. कितीही निषेध केला तरी कमी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक नेते आहेत. त्यांची जयंती साजरी करण्याची किंमत गावातील लोकांनी अक्षय भालेराव चा जीव घेऊन वसूल केली.

 ही कृती किती घृणास्पद आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद यांनी सदर गावात घटनास्थळी भेट दिली. एस पी, डी वाय एस पी,वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यांच्या सोबत फारूख अहमद यांनी चर्चा केली अनुसूचित जाती जमाती आचार अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट लावण्यात आला व गुन्हा नोंदविण्यात आला. हे हत्याकांड घडवून आणण्यात हत्येमध्ये कोण कोण सहभागी होते? हत्याकांडाचे प्रमुख सूत्रधार कोण आहेत? किती जणांना अटक झाली? याची माहिती मला अद्याप उपलब्ध झालेली नाही.  परंतु अक्षय भालेराव याच्या हत्त्येची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे. सदर गावचा इतिहास पोलिसांना माहिती होता त्यांनी एक महिनाभर पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही? आमचे म्हणणे असे आहे की गृहमंत्रालयाने अशा गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. बोंडार गावचा इतिहास पोलिसांना माहिती होता त्यांनी एक महिनाभर गावात पोलीस बंदोबस्त लावला असता तर सदर हत्याकांड कदाचित घडले नसते?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे जर महाराष्ट्रात हत्या होणार असेल तर घटनाकारांना  समजून घेण्यात व त्यांचा योग्य तो माणसांना करण्यात आपण यशस्वी झालो असे म्हणण्यास वाव आहे. ग्रामीण भागात जातिवाद व जातीय द्वेष मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच ही घटना घडली. महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी संघटनांनी व पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला पाहिजे, फुले आंबेडकर विद्वत सभा या हत्याकांडाचा तीव्र शब्दात धिक्कार व निषेध करीत आहे. गुन्हेगारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहे.

प्राचार्य म.ना. कांबळे

--------------------------------

नांदेड शहराला लागून असलेले बोंढार हे गांव जातीचा माज असलेले जातीयवादी गांव असून या गावात दर वर्षाला दोन चार अॅट्राॅसिटी घडतातच. या अगोदर ही बौध्द वस्तीवर मराठा समाजाने हल्ले केलेले आहेत. २०१६ मध्ये संपूर्ण विहाराची तोडफोड केली गेली होती. आंबेडकर जयंती काढू दिली जात नाही. परंतू या वर्षी या गावात भीम जयंती साजरी केली.  मी स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सरांकडे पाठपुरावा करून भीम जयंतीची परवानगी मिळवून दिली होती. गावात जयंती झालीच कशी ? याची चीड मनात ठेऊन हे जातीचा माज असलेले बिनडोके मोठ्या हल्ल्याची तयारी करूनच होते आणि तो दिवस कालचा ठरला. पण यात निष्पाप असणा-या अक्षयचा या गावगुंडांनी चाकूने भोसकून क्रूरतेने खून केला. अक्षयच्या आई आणि भावाला ही चाकूने दगडाने मारहाण केली. नंतर बौध्द वस्तीवर दगडफेक करत हल्ला करून दहशत निर्माण केली. 

या घटनेनंतर गावातून मला महिलांनी फोन करून ही सगळी माहिती दिली. यानंतर मी पहिला फोन पीआय घोरबांड यांना केला आणि दुसरा फोन एसपी कोकाटे सरांना केला. त्यांना घटनेची माहिती देऊन त्यांना तातडीने गावात येण्यास सांगितले. रात्री ९ ला मी गावाला भेट दिली. त्यावेळी एसपी कोकाटे सर हे पण गावात आले होते. एकूण या गावाची जातीयवादी पार्श्वभूमी मी एसपींना सांगितली.  या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक मराठा खासदार, आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख बोंढारकर यांनी जात भावांना वाचविण्यासाठी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी प्रशासनाच्या छातीवर बसून संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनला थांबून अक्षय भालेरावचा खून केलेल्या सर्व आरोपींना अटक करायला लावून या माजलेल्या सर्व ९ जणांवर ३०२, ३०७, ३२४, ३२३, २९४, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, ४, २५, २७, ॲट्राॅसिटी ॲक्ट ३ (१) (r), ३ (१) (s), ३ (२) (va) या कलमांव्दारे गुन्हे दाखल करून सकाळी ५ वाजता घरी गेलो.  सकाळीच जिल्हाधिकारी राऊत सर यांच्याशी बोलून तातडीची आर्थिक मदतीची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी समाजकल्याण विभागाला तातडीने आर्थिक मदतीचे आदेश दिले आहेत. 

- राहूल प्रधान

-----------------------------

2010 साली मी आणि माझी आई नांदेडात रूम पाहत होतो.. एका ठिकाणी रूम मिळाली होती.. सगळं ठरल्यानंतर घरमालकिनला आईचा गळ्यातील अशोकचक्र दिसलं.. तेंव्हा ती म्हणाली की बाई तुमची जात कोणती आई म्हणाली आम्ही बौध्द.. तेंव्हा त्या बाईने आम्हाला सरळ तोंडावर म्हंटल की आम्ही बौद्धांच्या लोकांना रूम देत नाही. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आम्ही मराठा समाज, ब्राह्मणांकडे (म्हणजे नकळतपणेच ) रूम पाहायला गेलो तेंव्हा तेंव्हा ही अशी प्रश्न विचारली गेली आणि आता पर्यंत तो पथक्रम चालूच आहे... भीषण आहे हे  जातीयवाद,मनुवाद हा कागदोपत्री संपला जरी असला तरी प्रत्यक्षात तो अजूनही तसाच आहे किंवा जास्त फोफावतोय अस म्हणाव लागेल... आज अक्षय भालेराव नामक तरुणाची खुलेआम हत्या केली जाते जयंती साजरी केली म्हणून या पेक्षा मोठ दुर्दैव भारताच काय असू शकतं.. -
ॲड.आकांक्षा आळणे

--------------------------------

वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुक्यातील बोंढार हवेली या गावात गेले कित्येक वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली निघाली नव्हती कारण या गावातील जातीयवादी मानसिकता असलेल्या गावगुंडांकडून जयंती साजरी करू दिली नाही. परंतु या वर्षी सदरील गावात वंचित बहुजन आघाडीची ग्राम शाखा दिनांक स्थापण केली आणि गावातील वंचितांना हक्काचे विचारपीठ मिळाले. जयंती यावर्षी काढली पाहिजे या हेतूने ग्रामशाखेचे अध्यक्ष नितेश भालेराव, अक्षय भालेराव तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी संदेश भालेराव सह यांची संपूर्ण टिम राज्य प्रवक्ते फारुक अहमद सरांकडे चर्चा करण्यासाठी आली सरांनी तात्काळ मला व माझ्या टिमला ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक घोरबांड यांची वेळ घ्यायला सांगितले आणि आम्ही सर्व जण ठाणेदार अशोक घोरबांड यांच्या सोबत चर्चा करून संवैधानिक मार्गाने रीतसर परवानगी घेऊन दिली. मिरवणूकीत स्वतः फारूक अहमद सर, ठाणेदार अशोक घोरबांड यांच्या सह मी, केशव कांबळे, विजय भंडारे, धम्मदिप एंगडे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते. गावातील सर्व वाद संपुष्टात आला. असे चित्र परवा पर्यंत होते.

परंतु काल सायंकाळच्या सुमारास सुनिल सोनसळे यांना गावातील एका महिलेने फोन करून सांगितले की अक्षय भालेराव यांच्या वर हल्ला झाला आहे तुम्ही तात्काळ या. सुनिल सोनसळे यांनी तातडीने फारूक अहमद सरांना फोन करून माहिती दिली लगेच फारूक सरांनी संदेश भालेराव यांना फोन करून विचारणा केली असता हो सर अक्षयला खुप मार लागला आहे त्याला आम्ही विष्णुपुरी येथे हाॅस्पीटलला घेऊन निघालो आहोत असे सांगितले सरांनी लगेच महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांना फोन करून हाॅस्पीटलला पोहोचा म्हणून सांगितले त्याचक्षणी मी, अनिल वाघमारे, केशव कांबळे अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे हि सर्व टिम हाॅस्पीटलला पोहोचलो आणि संपूर्ण परीस्थिती लक्षात घेऊन पुढील कारवाई साठी पोलीस स्टेशनला पोहोचलो तोपर्यंत फारुक अहमद सर, अय्युब खान, हे सुद्धा गावात घटनास्थळी पोहोचले होते. तिथे एस पी, डि वाय एस पी , ठाणेदार यांच्या सह मोठा पोलिस बंदोबस्त होता.

गावातील व अक्षयच्या कुटुंबीयांना समजवुन ग्रामीण पोलीस स्टेशनला अक्षय भालेराव यांच्या हत्येची तक्रार दाखल करण्यासाठी आनले आणि तक्रार दाखल करण्याची रितसर प्रक्रिया राबवुन शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर रात्री उशिरा आम्ही सर्व जण घरी आलो. नंतर सकाळी पी. एम करून अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत फारुक अहमद सर, गोविंद दळवी, श्याम कांबळे, रवि पंडित, विठ्ठल गायकवाड, अय्युब खान, मी, डॉ सिध्दार्थ भेदे,इशान खान,अमृत नरंगलकर, अनिल वाघमारे, साहेबराव भंडारे, धम्मा एंगडे, वैभव लष्करे यांच्या सह नांदेड मधील आंबेडकरी संघटनांचे अनेक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
विनायक गजभारे
तालुकाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी
नांदेड दक्षिण तालुका


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com