Top Post Ad

वगसम्राट दादू इंदुरीकर शासनदरबारी अद्याप उपेक्षितच - अशोक सरोदे

 गाढवाचं लग्न केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही पोहोचवणारे वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मारकासाठी मागील २० वर्षापासून शासन दरबारी मागणी करीत असून देखील आतापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. अशी खंत वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे अशोक सरोदे यांनी व्यक्त केली. भारत सरकारचा "संगीत कला अकादमी" 1973 चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दादू इंदुरीकर महाराष्ट्र शासनदरबारी अद्याप उपेक्षितच असून आता तरी शासनाने लवकरात लवकर स्मारकासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी विनंती अशोक सरोदे यांनी केली. दादू इंदुरीकर स्मारकाबाबत माहिती देण्याकरिता आज मुंबईतील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी करुणा सरोदे, राहूल सावळाराम सरोदे, नितीन सखाराम शिंदे , संतोष रोकडे, भगवान गायकवाड, संतोष नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

तमाशा कलावंत स्मृतिशेष दादु राघू सरोदे-इंदुरीकर ह्यांनी त्यांच्या "गाढवांच लग्न" या तुफान लोकप्रिय वगनाट्यातील अभिनय व विनोदामुळे 1968-80 या कालखंडात इंदुरीकर ह्यांनी जनतेचे नुसतं मनोरंजनच नाही तर महाराष्ट्रासह देशी-विदेशी जनतेच्या मनावर आपल्या विनोदी कला-अभिनयाने अधिराज्य केले. दादु इंदुरीकरानी तमाशा कलेसाठी आपले जीवन अर्पण केले हा इतिहास आहे. परंतु अलीकडच्या काळात ही कला लोप पाऊ लागली आहे. या कलेचे जतन व्हावे व या क्षेत्रातील कलावंत त्यांचे कुटूंबीयाना मदत-सहकार्य करणे व स्मृतिशेष इंदुरीकर यांचे बहुउदेशीय समाजउपयोगी उचित स्मारक व्हावे या हेतूने "वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठान"  कार्य करीत आहे. मात्र जागेची अडचण असल्याने हे कार्य गतीमान होत नाही. इंदुरीकरांचे स्मारक झाल्यास या कलेला वाव देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतील असेही सरोदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मारका करिता सवलतीच्या दरात शासकीय भूखंड जागा उपलब्ध करून देणे विषयी विनंती व पत्रव्यवहार 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आला होता. त्यावेळी  मनोहर जोशी यांनी स्मारकासाठी जागा किती व कोठे पाहिजे या बाबतचा प्रस्ताव सादर करा असे लेखी पत्राद्वारे प्रतिष्ठानला कळविले होते व तत्कालीन महसूल मंत्र्यांनाही इंदुरी गावी मावळ तालुक्यातील व मुंबई ठिकाणी जागा उपलब्ध करून देणेबाबत तशा सूचना देणारे पत्र पाठवले होते. महसूल मंत्र्यांकडूनही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याशी पत्र व्यवहार झालेला आहे.  वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानला जागा मिळण्याबाबत 'ग्रामपंचायत इंदुरी' यांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ग्रामपंचायत इंदुरी यांना सप्टेंबर 1998 साली विनंती पत्र दिलेले होते. परंतु ग्रामपंचायत इंदुरी यांनी आजपर्यंत हे प्रमाणपत्र न दिल्याने हा प्रस्ताव अद्याप सादर होऊ शकला नाही. परिणामी  वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित राहिला असल्याची खंत अशोक सरोदे यांनी व्यक्त केली.

वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे मुळ गाव इंदुरी (ता. मावळ जि. पुणे) हे असल्याने या गावात किंवा मावळ तालुक्यात वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे बहुउदेशीय समाज उपयोगी असे वस्तूरुपी-स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने प्रतिष्ठानला भूखंड उपलब्ध करून द्यावा,  या प्रतिष्ठानला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी. इंदुरीगावा बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडवर दुभाजकाच्या बेटात राज्य शासनाकडून "गाढवांच लग्न" वगनाट्यातील सीन-प्रसंगाचे चित्र शिल्पासह वगसम्राट इंदुरीकर यांचा हास्य-अभिनय संपन्न पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. त्याकरिता 2024 पूर्वी मंजुरी द्यावी.  महाराष्ट्र शासनाने स्मृतिशेष वगसाम्राट दादु इंदुरीकर यांना मरणोत्तर "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे.  लोककला-तमाशा कलावंतांमध्ये अभिनय आणि विनोद याचा संगम असलेल्या उत्कृष्ट तमाशा कलावंतास राज्यशासनातर्फे प्रतिवर्षी दहा लाखाचा "वगसम्राट दादू इंदुरीकर जीवन गौरव पुरस्कार" व स्मृतीचिन्ह देण्यात यावे. तळेगांव-इंदुरी- चाकण या 12 कि.मी. महामार्गाचे व भविष्यात ह्या महामार्गावर उड्डाणपूल झाल्यास ह्या सर्व उड्डाणपूलासह महामार्गास (हायवेस) "स्मृतिशेष दादु  इंदुरीकर महामार्ग" असे नामकरण करण्यांत यावे.  राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर या प्रतिष्ठानचा अथवा प्रतिष्ठानने सुचविलेला एका प्रतिनिधिची नियुक्ती करण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी शासनाला देण्यात येणार असल्याचे सरोदे म्हणाले.

राजकीय गटाप्रमाणे दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचेही दोन गट

स्मृतिशेष दादु इंदुरीकर यांचे बहुउदेशीय समाजउपयोगी उचित स्मारक असे व्हावे या हेतूने "वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठान" राज्याच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात सन 1989 मध्येच नोंदणी झालेली असून, या प्रतिष्ठानचा "उदघाटन सोहळा" मुंबईत तत्कालीन खासदार बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष   वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे प्रथम सुपुत्र व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश दादू सरोदे इंदुरीकर होते. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमास "प्रमुख अतिथी म्हणून  प्रकाश खांडगे (तत्कालीन उप-संपादक नवशक्ती) उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश दादु सरोदे (स्मृतिशेष) हे प्रकाश खांडगे यांना गुरुस्थानी मानीत. त्यांचे आग्रहास्तव प्रकाश खांडगे यांना प्रमुख अतिथी म्हणून या उद्घाटन प्रसंगी बोलावण्यात आले होते. 

मात्र त्यांना या कार्यक्रमाचा विसर पडला असे दिसते, कारण मुंबई मराठी पत्रकार संघात 15 फेब्रुवारी 2022 ला प्रकाश खांडगे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन "विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे आपण स्वतः अध्यक्ष असल्याचे जाहीर केले. त्यांनी दादु इंदुरीकर यांचे नावाच्या अगोदर विनोद सम्राट हा शब्द लावून नवीन प्रतिष्ठान स्थापन केले असल्याचे दिसते. वगसाम्राट दादु इंदुरीकर यांचे नांवे अगोदरच एक प्रतिष्ठान असताना व त्या प्रतिष्ठानचे उदघाटन प्रसंगी ते स्वतः प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना पुन्हा दादु इंदुरीकरांच्या नावे नवीन प्रतिष्ठान स्थापन केले याबाबत आश्चर्य व खेद वाटतो.  प्रकाश खांडगे यांचा तमाशा लोककला विषयाचा अभ्यास व योगदान विचारात घेता त्याचा आदर वाटतो. तसेच लोकशाही असल्याने कोणीही वेगवेगळ्या संघटना निर्माण करू शकतात पण दादू इंदुरीकर यांच्या नावाने संघटना उभी करतांना त्यांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वेळ आमच्या प्रतिष्ठान सोबत बोलायला व संपर्क साधावयास हवा होता अशी खंत अशोक सरोदे यांनी व्यक्त केली.

"वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सरोदे-इंदुरीकर यांचे 01 डिसेंबर 1999 रोजी निधन झाल्यानंतर खांडगे यांच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन एक/दोन वेळा भेट घेतली आणि त्यांना "वगसम्राट दादु इंदुरीकर प्रतिष्ठान" चे अध्यक्ष पद स्वीकारावे अशी विनंती केली होती. त्यावेळेस त्यांनी बघू या, भेटू, बोलू एवढाच प्रतिसाद दिला. त्यानंतर आमचा संपर्क झाला नाही, त्यांनीही याबाबत संपर्क केला नाही. तरीही वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या स्मृति दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या  वर्तमानपत्रातील जाहिरातीत तसेच इंदुरी गाव मावळ तालुक्यात लावण्यात येणाऱ्या बॅनरमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव छापत असे / देत असे. असे असतानाही एखाद्या राजकीय गटाप्रमाणे त्यांनी इंदुरीकर प्रतिष्ठानचा दुसरा गट निर्माण करणे शोभनिय नसल्याचे अशोक सरोदे यांनी स्पष्ट केले.


गाढवाचं लग्न : दादू इंदुरीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com