Top Post Ad

ठाण्यात "आंदोलनजीवी" कार्यकर्त्यांचा सन्मान

ठाणे,
            दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता. अशा शब्दात परिवर्तनाचा वाटसरु या सध्या समाजाला भेडसावणार्‍या ज्वलंत विषयाला वाहून घेतलेल्या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनांचे समर्थन केले. पुणे ते दिल्ली किसान ज्योत यात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाउन च्या अकस्मात लादलेल्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकर्‍यांना,रोजंदारीवर काम करणार्‍या मजुरांना, घरकाम करणार्‍या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून  त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले. 

या वेळी अभय कांता दिल्ली येथे चालू असणार्‍या शेतकरी आंदोलनाला भेट देऊन नुकतेच परत आले होते. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की सरकारने आणि सरकारच्या पाठीरख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले. जेणे करून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये! तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशांच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खर्‍या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खालिस्तानापासून आंदोलनजीवी पर्यन्त अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकर्‍यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी शेवटी आवर्जून संगितले. प्रास्ताविक संस्थेत एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगतापने तर आभार प्रदर्शन संस्थेतली सह सचीव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाची सूत्र संचालन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केले.

            कोरोना काळात ठाण्यातील विविध वस्तीत धान्यवाटप करण्यात न घाबरता हिरीरीने काम करणार्‍या तसेच किसान ज्योत यात्रेत सहभाग घेऊन दिल्लीबाहेर चाललेल्या शेतकरी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपली लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविणार्‍या एकलव्य कार्यकर्ता साथी अजय भोसले यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी आपले किसान ज्योत यात्रेचे आणि २६ जानेवारीला दिल्लीत घडलेल्या घटनांचे थरारक अनुभव कथन करताना सांगितले की पुण्याहून किसान ज्योत आणि मिट्टी कलश घेऊन शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून या किसान ज्योत यात्रेचे आयोजन केले गेले. या यात्रेत संपूर्ण वेळ सतत तेवत असणारी ज्योत रिले बॅटन पद्धतीने कार्यकर्त्यांनी पळत पुढे नेली आणि बाकी सर्व सहभागी कार्यकर्ते दुचाकी वरून ज्योतीला साथ देत तिरंगा झेंडा फडकवत एकूण १४६५ किमी अंतर पार करून दिल्लीला पोहचले आणि प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर परेड मध्ये सहभागी झाले. तिथे स्वतः प्रत्यक्ष अश्रुधूराचा मारा सहन करत असताना अनुभवलेली सत्य परिस्थिती आणि सरकारने पोलिसांच्या सहाय्याने परेडमधल्या शेतकर्‍यांची कशी दिशाभूल केली आणि तरीही शेतकर्‍यांनी शांतिपूर्ण रित्या परेड पार पाडली याचे प्रभावी वर्णन केले. 

            या वेळी देश पातळीवर काम करणार्‍या अन्न अधिकार मंचाच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि संशोधक मुक्ता श्रीवास्तव यांनी कोरोंना लॉकडाउन च्या काळात देशातील गरीबांच्या अन्न सुरक्षा आणि अधिकारावर काय परिणाम झाला केलेल्या सर्वेचा निष्कर्ष सादर केला. त्यावरून असे दिसून आले की हातावर कामअसलेल्या अनेक कष्टकर्‍यांना पुरेसे पोषक अन्न तर मिळाले नाहीच पण जवळ जवळ 20 % लोकं एक वेळच जेवत होती. स्त्रीया आणि मुलांच्या खाण्यावर खूपच वाईट परिणाम झाला. अध्यक्षीय समारोपात बोलताना जगदीश खैरालिया म्हणाले की शांततापूर्ण रित्या चाललेले शेतकरी आंदोलन ही आपली  आणि समाजाची ताकत आहे. बाकी सर्वांनी या आंदोलनाला समर्थन देऊन लोकशाही पद्धतीवरील आपला विश्वास बळकट करण्याची वेळ आली आहे. यासाठीच समाजातील संवेदनशीलतेचे आणि धैर्याचे प्रदर्शन घडविणार्‍या या वीरांचा सन्मान करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. 

या वेळी तेजस्विता प्रतिष्ठान,आपले ठाणे आपले फाऊंडेशन,जाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, म्युज फाऊंडेशन, झेप प्रतिष्ठान, वुई टुगेदर फाऊंडेशन, फीड इंडिया या संस्था आणि सुनील दिवेकर, प्रवीण खैरालिया, सुजीत भाल, स्नेहा रथोड, घनश्याम मिश्रा, रवी आयझक, प्रतीक गावडे, निरंजन जाधव, आकाश धोत्रे, अल्पेश ठाकुर, चेतन ठाकरे, रोशन पार्टे, शोभाताई वैराळ, जॉन डिसा, प्रा. अनिल आठवले, मीनल भालेकर, मेघना भालेकर, अंकुश चिंडालिया, आतिष राठोड, अक्षय भोसले, अमित  मंडलिक, मंगेश गुप्ता, शैलेश रणशिंगे, कमलेश शार्दुल, हरीश अलमारे, प्रणील वाघमारे, किसन जाधव, करण अंकुश, अजय चिंडालिया, राधिका गोलिकेरे, जितीन कुरियन, दर्पण सांगूर्डेकर या वीरांचा प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला डॅा. गिरीष साळगावकर, जयंत कुलकर्णी, शिवाजी पवार, अविनाश कदम, संध्या सिनकर, संस्थेच्या मनीषा जोशी, लतिका सू. मो. आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या फेसबुकवरूनही हा कार्यक्रम लाइव्ह प्रसारीत करण्यात आला होता. 


आम्ही आंदोलनजीवी तुम्ही "जीओ"जीवी 👇👇👇
https://www.prajasattakjanata.page/2021/02/blog-post_57.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com