Top Post Ad

आम्ही आंदोलनजीवी तुम्ही "जिओ"जीवी - मिलिंद रानडे

सर्वच आंदोलकांना उद्देशून ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खास कुत्सित हास्यानंतर “आंदोलनजीवी” असे लोकसभेत म्हणून त्यांची निर्भत्सना केली. सहाजिकच आहे. हा देश ज्या स्वातंत्र्य संग्रामातून मुक्त झाला त्या ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्य आंदोलनात मोदी ज्या वैचारिक खानदानातून येतात त्या R.S.S. लोक सामील नव्हते. त्यांचे पाप फक्त सामील नव्हते एवढेच मर्यादित नाही, तर ब्रिटीश सरकारचे ते दलाल होते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी प्रचंड आंदोलने झाली त्यात (R.S.S.) / जनसंघ / भाजप यांच्यापैकी कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजकीय खानदानात आंदोलक किंवा मोदींच्याच म्हणण्याप्रमाणे "आंदोलनजीवी" कोणीच कधी त्यांना दिसला नाही. त्यांचे राजकीय खानदान ब्रिटिशांची मानसिक गुलामी आणि प्रत्यक्षात दलाली करण्यातच वाढले. 

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सामील झालेल्यात काही मवाळ होते तर काही जहाल होते. काही नेमस्त होते तर काही अहिंसक मार्गाने जाणारे, काही हिंसक तर काही क्रांतिकारक मार्गाने जाणारे होते. पण त्यांच वेळी अर्धी खाकी चड्डी  आणि  काळी टोपी घालून रिकाम्या मैदानात काठ्या फिरवणारे संघाचे स्वयमसेवक केाणत्याच  ब्रिटीशविरोधी आंदोलनात सामील नव्हते. त्यामुळे नरेंद्र मोदींसारख्या RSS सेवकांना आंदोलन विरोधाचेच बाळकडू मिळालेले आहे आणि आंदोलन करूनच हा देश स्वतंत्र झाला याचे शल्य त्यांच्या मनात खदखदत आहे. ज्या डाव्या विचारसरणीशी संघाचे हाडवैर आहे त्या लेनिनच्या पुस्तकाचे वाचन झाल्यावर भगतसिंग म्हणाला “एक क्रांतिकारी दुसरे क्रांतिकारी ये मील रहा है” आणि त्यानंतर हसत हसत फासावर गेला हे सत्य त्यांना लपवायचे आहे. ज्या गांधीजींचा चष्मा वापरून ( चष्मा उधार घेतां येतो पण द्दुष्टिकोन उधार घेतां येत नाही) मोदींना स्वतःची टिमकी वाजवावी लागते, त्या गांधीजींचे आयुष्य दक्षिण आफ्रिका ते भारत आंदोलनातच गेले, ज्या वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करताना ते जणूकाही मोदींच्या विचाराचे होते असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागतो, त्या वल्लभभाई यांचे जीवन स्वातंत्र्याच्या आंदोलनातच गेले आणि गांधीजींच्या खुनानंतर (R.S.S.) वर बंदी त्यांनीच घातली हेही सत्य दडवावे लागते. 

या मोदी आणि कंपनीला नेहरूंवर टीका केल्याशिवाय चैन पडत नाही. जवाहरलाल नेहरू हे ब्रिटीशविरोधी स्वातंत्र्य आंदोलनात अकरा वर्षे ब्रिटिशांच्या तुरूंगात होते हेही सत्य त्यांना लपवावे लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीभेद विरोधाच्या समतावादी लढ्यात हे संघीय कधीही नव्हते. एवढेच काय त्यांच्या तोंडून समता हा शब्दही निघत नाही. त्याऐवजी समरसता हा भोंदू शब्द ते वापरतात. ही संघाची मंडळी कामगार, महिला अशा कोणत्याच आंदोलनात कधीही नव्हती. त्यामुळे "बंदर तू क्या जाने अदरक का स्वाद " अशीच परिस्थिती सध्याच्या संघीष्ट राज्यकर्त्यांची आहे.

याच भाषणात मोदींनी आपले फालतू कोट्या करण्याचे कौशल्य पुन्हा एकदा दाखवले. आंदोलन करताना देशद्रोही ठरवायचे हा या राजकीय खानदानाचा जुनाच धंदा आहे.आंदोलन करणारे आदिवासी असतील तर त्यांना मावोवादी म्हणायचे, आंदोलन करणारे मुसलमान असतील तर त्यांना आतंकवादी ठरवायचे, आंदोलन करणारे शहरातील शिक्षित असतील तर त्यांना शहरी नक्सली ठरवायचे, शेतकर्यांना खालिस्तानी ठरवायचे हे उद्योग जुनेच आहेत. त्यांची 'री' ओढण्यासाठी गोदी मीडियाची तैनाती फौज आहेच. FDI (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट)  साठी मोदी सरकार जगभर वणवण भटकत आहे. अशावेळी FDI चा नवा 'गहन' अर्थ शोधण्याच्या अविर्भावात मोदी म्हणाले की एफडीआय म्हणजे "Foreign Destructive Ideology"  विनाशकारी विदेशी विचारसरणी. पण मोदींच्याच राज्यात दिल्लीच्या सिमेवर बसलेले शेतकरी बोंबलून सांगत आहेत FDI म्हणजे "Farmers Dying In India" म्हणजे देशात शेतकरी मरत आहेत. पण त्याचे सोयरसुतक मोदी- शहांना नाही. हम दो (मोदी-शहा) हमारे दो (अदानी-अंबानी) असे हे सरकार आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर रात्री गार पाणी मारून या सरकारने आपले इमान भारताच्या पोशिंदा शेतकऱ्यांबरोबर नसून भाजप पोशिंदा आदानी अंबानी सोबत आहे हे दाखवून दिले आहे.

यानिमित्ताने लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली. एका सिहीणीने कोल्ह्याची शिकार केली पण त्या सिहीणीला कोल्ह्याच्या लहान पिल्लाची दया आली. तिने त्या पिल्लाला न खाता आपल्या पिलांबरोबर वाढवले. ते पिल्लू सिहीणीचे दूध पीत आणि तिने केलेल्या शिकारीतील मांस खात इतर छाव्यांबरोबर वाढत होते. एके दिवशी ही सगळी पिल्ले एकत्र खेळत होती. तेवढ्यात एक हत्ती त्यांच्या दिशेने येताना बघून सिहीणीची पिल्ले त्यांच्याकडे पाहून गुरुगुरु लागली. त्यांच्याबरोबर या कोल्ह्याच्या पिलानेही आवाज काढायला सुरुवात केली. पण त्या हत्तीला पाहताच कोल्ह्याचे पिल्लू घाबरले आणि आईच्या कुशीत शिरले. त्या पिल्लाने आईला विचारले, “की मी पण इतरांबरोबर गुरगुरत पुढे गेलो पण भिऊन परत आलो आणि माझी इतर भावंडं का नाही घाबरली? “  तेव्हा सिहीण म्हणाली की सिहीणीचे दूध तू पितोस हे खरे आहे पण त्यामुळे तू सिंह होत नाहीस. तू भित्र्या कोल्ह्याचे पिल्लू आहेस. तुझ्या खानदानात आजपर्यंत कोणी हत्तीची शिकार केलेली नाही. सिंहाच्या खानदानात हत्तीची शिकार करतात. 

शेवटी जे (DNA)डीएनएमध्ये आहे त्याचप्रमाणे व्यवहार होणार. R.S.S.च्या डीएनएमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सार्वभौमत्व, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, समाजवाद यासाठी आंदोलन करण्याचे  जीन्स नाहीत. त्यामुळे यांना आंदोलनाबद्दल सद्भावना नाही तर नफरत आहे. पळकुट्या कोल्ह्याने माझी छाती ५६ इंचाची आहे अशी कितीही बोंब मारली तरी तो सिह होऊच शकत नाही, हत्तीची शिकार तर दूरच राहिली. पूर्वी तुम्ही ब्रिटीशांचे दलाल होता आज अंबानी अडाणीचे दलाल आहात. हेय आम्ही आंदोलनजीवी आहोत. मोदीजी तुम्ही “जिओजीवी” आहात. 

दिनांक:- ०९/०२/२०२१
----------------------------------------------------------

शेतकरी व त्यांना साथ देणारे लोक आंदोलनजीवी आहेत.काही हरकत नाही.मान्य आहे आम्हाला. परंतु शेतकरी माईकजीवी,भाषणजीवी आणि जुमलाजीवी नाही हे सुध्दा तेवढेच खरे आहे.  स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आमचे बापजादे आंदोलनजीवी होते. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले आणि तुम्ही प्रधानमंत्री होवू शकले हे निर्विवाद सत्य आहे.  आम्हाला आंदोलनजीवी म्हटल्याबद्दल अजिबातही वाईट वाटले नाही.परंतु आम्ही माफीजीवी नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आम्ही मंदिरजीवी , दक्षिणाजीवी  नाही हे स्वाभिमानाने सांगू शकतो.परंतु राममंदिरासाठी अनेक वर्षापासून प्रामाणिकतेने आंदोलन करणारे बिचारे रामभक्त आता स्वतःंला कोणते जीवी म्हणवून घ्यावे या चिंतेने ग्रस्त आहे त्याचे खूप वाईट वाटते. आणीबाणीच्या काळात काँगेसच्या विरोधात आंदोलन करुन सत्ता मिळविणारे लोक कोणते जीवी होते ? गांधी,नेहरु,भगतसिंग,सुखदेव यासारख्या असंख्य वीरांनी देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकदा आंदोलन केले.परंतु ज्यांनी देशाच्या स्वांतंत्र्य आंदोलनात भाग न घेता, आमच्या स्वातंत्र्यविरांचे पत्ते इंग्रजांना दिले त्यांना इंग्रजजीवी म्हणावे काय ? शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून येवून सत्तेवर बसणारे व त्यांच्याबद्दलच अपशब्द वापरणारे लोक हेच खरे परजीवी असतात.

अण्णा हजारेंच्या आंदोलनातून जे लोक धूर्तपणे स्वतःंच्या सत्तेची पायाभरणी करतात, तेच खरे परजीवी असतात. दुसऱ्यांनी लिहून दिलेले इंग्रजी शब्दांचे fool form (साॕरी full) पोपटासारखे वाचून शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडविणारे लोकच परजीवी असतात.  त्यामुळे शेतकऱ्यांची टिंगलटवाळी केल्यापेक्षा आपला इतिहास तपासून पहावा.

               ✍🏻 प्रेमकुमार बोके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com