Top Post Ad

भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस... पहिली भारतीय शिक्षिका सावित्रीमाई फुले


 आजचा 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जयंतीचा दिवस. खऱया अर्थाने भारतातील सर्व स्त्रियांच्या मुक्तीचा पवित्र दिवस. त्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतभर अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आनंदाने साजरा करावयास हवा, असे मला वाटते.  पुण्यापासून साधारणपणे 35 मैलांच्या अंतरावर पुणे-बंगलोर या मार्गावर शिराळ्याच्या पश्चिमेला एक लहानसे खेडेगाव आहे. या गावात खंडोजी नेवसे पाटील राहत असत. ते नायगावचे वतनदार पाटील म्हणून सर्वदूर ओळखले जात असत. नायगावचा बहुसंख्य माळी समाज नेवसे पाटील याच नावाने ओळखला जातो.  खंडोजी पाटील यांना 3 जानेवारी 1831 रोजी `सावित्री' या स्त्री रत्नाचा लाभ झाला.

150 वर्षांपूर्वी मुलीचे लग्न लहानपणीच करीत असत.  इ.स. 1840 मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाई यांचा मंगल परिणय अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न झाला.  जोतिराव आणि सावित्रीबाई या दांपत्याने विवेकवादी जीवनमूल्यांचा उत्तम संस्कार स्वत:वर करून घेतला होता. त्यामुळे त्या उभयतांमध्ये नेहमीच समजुतदारपणा आढळून येत असे. सावित्रीबाई आणि जोतिबा हे दांपत्य शेतात खूप कष्ट करीत असत. थकल्यानंतर दुपारी आंब्याच्या सावलीत बसून दोघेही आनंदाने जेवण करीत असत. जेवणाचा तृप्त ढेकर दिल्यानंतर शेतातील काळ्या मातीची पाटी करून आणि आंब्याच्या वाळक्या काडीची लेखणी करून जोतिबा सावित्रीबाईंना बाराखडी शिकवत असत. सोबत जोतिरावांची मावसबहिण सगुणाबाई ही सुद्धा सावित्रीबाईंसोबतच शिक्षण घेत असे. सावित्रीबाईंना मुळातच शिक्षणाची फार आवड होती. आपला नवराच आपल्याला प्रसन्न मनाने शिकवितो हे बघून त्यांना मनापासून खूप आनंद होत असे. त्यामुळे फारच थोड्या कालावधीत सावित्रीबाईंना लिहिता आणि वाचता येऊ लागले. त्यामुळे जोतिबा हे सावित्रीबाई आणि सर्व स्त्रीवर्गाचे शिक्षणातील प्रथम गुरु ठरतात. म्हणून शिक्षकदिन हा महामानव जोतिबा गोविंदराव फुले यांच्या नावाने सुरू करणे न्यायाला, विवेकाला धरून होईल, असे मला वाटते. सर्व भारतीय नागरिकांनी यावर विचार करावा.  

सावित्रीबाई आणि जोतिबा या दोघांनाही सर्व शोषित-पीडितांच्या बाबतीत फार कळवळा असे. असेच एकदा माता सावित्रीबाई जेवणाची पाटी डोक्यावर घेऊन शेतात जावयास निघाल्या. ते दिवस उन्हाळ्याचे होते. दुपारच्या बारा वाजता सूर्य प्रखर तेजाने तळपत होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक अतिशय कृश व वृद्ध स्त्री बसलेली होती. ती भुकेने व्याकूळ झाली होती. येथील बामणी धर्म व्यवस्थेने तिची अवस्था फार फार वाईट केली होती. तिला सर्वजण अस्पृश्य समजत असत. सावित्रीबाई शेतात जात असताना ती कळवळून सावित्रीबाईंना म्हणाली, ``मुली, मला फार भूक लागली आहे. थोडी भाकरी देशील तर तुझे कल्याण होईल.' सावित्रीबाईंना गरिबांचा फार कळवळा येत असे. त्यांच्यातील `करुणा' जागृत झाली. त्यांनी डोक्यावरील पाटी खाली उतरवून त्या म्हाताऱया आजीला भाकरी व भाजी दिली. म्हातारीने सावित्रीबाईंना अंत:करणपूर्वक आशीर्वाद दिला. नंतर सावित्रीबाईंनी डोक्यावर पाटी घेतली आणि त्या घाईघाईने शेतात गेल्या. त्यांचा चेहरा थोडा कावरा-बावरा झाला होता. नवऱयाला ही गोष्ट आवडेल की नाही या विवंचनेने त्या मनातून घाबरल्या होत्या. त्यांनी घडलेली सर्व हकिकत जोतिबांना सांगितली. जोतिबांनी सावित्रीबाईंचे तोंड भरून कौतुक केले. सावित्रीबाईंना खूप खूप आनंद झाला. 

जोतिबा शाळेत शिक्षण घेत होते. परंतु सनातनी बामण्यग्रस्त बामणांनी गोविंदरावांवर दडपण आणून जोतिबांचे शिक्षण बंद केले होते. पुढे गफारबेग मुंशी व इंग्रज मे. लिट्ज साहेब यांनी सगुणाबाईंच्या इच्छेप्रमाणे जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू केले. जोतिबांना पुरुषांप्रमाणेच सर्व स्त्रियांनाही शिक्षण घ्यावे, असे वाटत असे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या धर्मपत्नीला सावित्रीबाईंना आणि बहीण सगुणाबाईंना शिक्षणाचे धडे स्वत: दिले. भारतातील सर्व स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्रांचा जर विकास करावयाचा असेल तर त्यांना सम्यक शिक्षण देणे नितांत गरजेचे आहे, अशी जोतिबांची पूर्ण धारणा होती. शिक्षण द्यावयाचे तर त्यासाठी शाळांची गरज आहे. म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. भारतातील स्त्री-शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. या शाळेत पहिल्या स्त्री-शिक्षिका होण्याचा बहुमान सावित्रीबाई फुले यांनाच मिळाला. 

भारतात सर्वात प्रथम स्त्रियांसाठी शाळा जोतिबांनी काढल्यावर आणि स्त्री-शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात करताच सनातनी बामणांचे पित्त खवळले. त्यांनी फुले पती-पत्नींना शिव्या देण्यास प्रारंभ केला. आता कलियुगात धर्म बुडणार आणि फार मोठे पाप होणार असे ते बोलू लागले. परंतु जोतिबा व सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे लक्ष न देता आपले शिक्षण प्रसाराचे काम सुरूच ठेवले. जोतिबांनी 15 मे 1848 रोजी महारवाड्यात अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाई आणि सगुणाबाईंनी शिकविण्याचे काम केले. त्यामुळे सनातनी बामणांचा राग अनावर झाला. त्यांनी जोतिबांचे वडील गोविंदराव यांच्यावर शाळा बंद करण्याविषयी दडपण आणणे सुरू केले. त्यामुळे पिता-पुत्रांमध्ये वादावादी होण्यास प्रारंभ झाला. शेवटी वडिलांच्या सांगण्यावरून जोतिबा व सावित्रीबाईंना घर सोडून जावे लागले. त्यावेळी त्यांना एका सज्जन मुसलमान दांपत्याने मदत केली. 

सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवावयास जात असत  तेव्हा रस्त्याने लोकांचे अपशब्द त्यांना सहन करावे लागत असे. काही लोक त्यांना शेण फेकून मारत असत. काही लोक त्यांना दगड फेकून मारीत असत. एकदा एक मोठा दगड त्यांच्या  कानाला लागून तेथे मोठी जखम झाली आणि भळाभळा रक्त वाहू लागले. पण माता सावित्रीबाईंनी हे सर्व सहन केले. त्यांनी जखमेवर पदर घेऊन मुलामुलींना शिकविले. मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शोषित-पीडितांच्या मुलामुलींना शिक्षण देणे सुरू केल्यामुळे सनातनी समाजाने जोतिबा आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. परंतु यामुळे विचलीत न होता त्या दोघांनीही शिक्षणाचा प्रचार सुरूच ठेवला. त्यामुळेच ब्रिटीश सरकारने 16 नोव्हंबर 1852 रोजी या दांपत्याचा  गौरव केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सावित्रीबाई म्हणाल्या, ``बंधु-भगिनींनो, आपल्या समाजातील स्त्रिया व शूद्रातिशूद्र यांची संख्या फार मोठी आहे. या साऱया समाजाला आजवर शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले. या लोकांच्या घरात ज्ञानगंगा पोहोचवावी या उद्देशाने मी काम सुरू केले. शाळांचा व्याप सांभाळणारे इंग्रज, शाळेतील शिक्षक तसेच माई व फातमा शेख यांचा देखील हा गौरव आहे.'' 

थोर शिक्षिका सावित्रीबाई मनाच्या पूर्ण एकाग्रतेने मुलामुलींना शिकवित असत. एकदा त्या वर्गात मुलांना शिकविण्यात तल्लीन झाल्या होत्या. त्यावेळी अचानकपणे वर्गाच्या दारात रिव्हज साहेब शाळेची पाहणी करण्यासाइाr उभे राहिले. परंतु सावित्रबाई शिकविण्यात इतक्या तल्लीन होत्या की त्यांना दारात कोण उभे आहे, याची जाणीवही झाली नाही. तपासणी करणारे रिव्हज साहेब कौतुकाने हे सर्व पाहत होते. इतक्यात तास संपल्याची घंटा वाजली. सावित्रीबाईंचे लक्ष दारात उभे असलेल्या रिव्हज साहेबांकडे गेले. त्यांनी लगेच साहेबांचे स्वागत केले. साहेबांनी सावित्रीबाईंचे इंग्रजीमधून कौतुक केले. सावित्रीबाईंनीही इंग्रजीमधूनच आभार मानले. सावित्रीबाई इंग्रजीमधून बोलल्याचे पाहून रिव्हज साहेबांना खूप आश्चर्य वाटले. आपण सर्वांनी एक गोष्ट नीट ध्यानात घ्यावी की, सावित्रीबाईंनी केवळ शिक्षिकेची भूमिका चोख बजाविली असे नसून त्यांनी इतरही फार मोठी मानवतेची सेवा केली. त्यांच्या काळात बालविधवांची  फार मोठी समस्या होती. या सर्व समस्या बामणी हिंदू धर्म व्यवस्थेनेच निर्माण केल्या होत्या. त्याकाळी मुलींची लहान वयातच लग्ने होत असत. मुलगा व मुलगी यांच्या वयात मोठे अंतर असे. त्यामुळे बालविधवांचे प्रमाण वाढत असे. परंतु मुलींना पुनर्विवाह  करण्यास मात्र बामणी धर्मशास्त्रांनी प्रतिबंध केला होता. अशावेळी तारुण्यात या मुलींचे वाकडे पाऊल पडत असे. किंवा कामवासनेने उन्मत्त झालेले पुरुषच त्यांच्या तारुण्याचा उपभोग घेत असत. त्यामुळे या बालविधवांना गर्भ राहत असे. अशावेळी या मुलींना आत्महत्या करणे भाग पडत असे. या सर्व अभागी मुलींवर आत्महत्येची पाळी येऊ नये म्हणून स्वत: जोतिबा आणि सावित्रीबाईंनी आपल्या घरात बाळंतपणाची व्यवस्था केली होती.  जोतिबांनी स्त्रियांसाठी व अस्पृशांसाठी शाळा काढल्यामुळे तसेच ते मानवतेची मोठी सेवा करत असल्यामुळे धर्मबाह्य कृत्य करतात असे ठरवून सनातनी बामणांनी पैसे देऊन त्यांच्यावर दोन मारेकरी पाठविले होते. एकाचे नाव धोंडीराम पुंभार तर दुसऱयाचे नाव होते रोडे रामोशी. त्यावेळी जोतिबांसोबत सावित्रीबाईंनी सुद्धा न डगमगता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिले. शेवटी सत्याचा जय झाला. मारणाऱयांच्या हातामधून आपोआप शस्त्र खाली गळून पडले आणि ते त्यांचे उत्तम शिष्य झाले. एक रक्षक बनला व दुसरा पंडित झाला. 

सावित्रीबाई बालहत्या प्रतिबंधक गृहातील मुलांची आईच्या ममतेने सेवा करीत. त्यांना स्वत:ला जरी मूल नव्हते तरी त्यांनी अनेक बालकांच्या मातृत्वाची भूमिका 100 टक्के उत्तमरित्या बजाविली. सावित्रीबाईंनी जशी समाजसेवा केली तशीच त्यांनी साहित्यसेवा देखील केली. त्यांचा `काव्यफुले' नावाचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. सावित्रीबाईंनी 1876 ते 1896 या काळात दुष्काळ पडल्यावर मदतकेंद्रे सुरू केली. सत्यशोधक समाजात महिलांचे प्रतिनिधीत्व केले. जोतिबांच्या परिनिर्वाणानंतर त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी सावित्रीबाईंनी रुग्णांची स्वत: सेवा केली. प्लेग झालेल्या रोग्याला त्या स्वत: दवाखान्यात नेत असत. त्यांनी स्वत: एका अभागी विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता. ते पुढे डॉक्टर झाला. हा डॉक्टर यशवंत रुग्णांची सेवा करून त्यांना बरे करीत असे. पांडू नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा होता. त्याला प्लेगचा रोग झाला होता. त्याला बरे करण्यासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना स्वत: सावित्रीबाईंनाच त्या संसर्गजन्य रोगाने पछाडले. आणि 10 मार्च 1897  रोजी भारतातील शोषित-पीडितांची सेवा करणारी पहिली भारतीय शिक्षिका, कारुण्याची मूर्ती आणि आम्हा सर्व भारतीयांची माता सावित्रीबाई फुले यांच्या भव्य आणि दिव्य जीवनाचा शेवट झाला. 

बामणी हिंदू धर्मव्यवस्था सर्व भारतीय नागरिकांसमोर विद्येची देवता म्हणून सरस्वतीला उभी करतात. सरस्वती ही केवळ एक नदी होती. बामणांनी स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तिचे देवतेत रुपांतर केले. परंतु या बामणी हिंदू धर्म व्यवस्थेतील प्रतिकात्मक सरस्वतीने जर कुणालाही कधीही शिकविलेच नाही तर तिचा विद्येची देवता म्हणून स्वीकार करणे विज्ञान व तंत्रज्ञान युगातही उचित ठरेल काय? यामुळे मानहानी पचवून, दगड-शेणांचा मारा सहन करून, ज्या सावित्रीबाईंनी प्रत्यक्ष मुलामुलींना शिकविले त्यांच्यावर अन्याय होत नाही काय? बहुजन समाजाने याबाबतीत जागृत व्हावयाचे ठरविले नाही काय? आमच्या मते माता सावित्रीबाई फुले यांनी भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात पहिली भारतीय स्त्री-शिक्षिका होण्याचा खेराखरच बहुमान मिळविला असल्यामुळे त्याच खऱया अर्थाने विद्येची स्फूर्तीनायिका ठरतात. मला विश्वास वाटतो, की भारतातील सर्व सुजाण, विवेकवादी जनता यापुढे सरस्वतीचे स्थान माता सावित्रीबाई यांनाच देतील. पहिली भारतीय शिक्षका: माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र जयंती दिनी आम्हा सर्व भारतीय नागरिकांचे त्यांना कोटी कोटी प्रणाम! 

एस.एन.भालेराव 




भारताची सामाजिक व्यवस्था आणि बामणेत्तरांना शिक्षणबंदी
सविस्तर वाचा.... खालील लिंकवर क्लिक करा.....

https://www.prajasattakjanata.page/2020/12/blog-post_50.html


सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते. सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे वय होते 13 वर्षे. सावित्रीमाईंची राहणी साधी सरळ होती. अंगावर अलंकार नसत. गळ्यात एक पोत व मंगळसूत्र असे. कपाळावर भले मोठे कुंकू असे. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान व सडासंमार्जन होत असे. घर नेहमी स्वच्छ व टापटीप असे. स्वत: स्वयंपाक करीत. जोतिरावांच्या खाण्याची व प्रकृतीची काळजी घेत असत. सगुणाबाई नावाची जोतीबांची विधवा मावसबहीण होती. तीच्या आग्रहामुळे‌ सावित्रीमाईचं शिक्षण 1842 पासून सुरु झालं. शेतीची कामं करतांना आंब्याच्या झाडाखाली जोतीबा त्यांना‌ शिकवित असत.
पुण्यात त्याकाळी मिसेस मिचेलचे क्षिक्षक प्रशिक्षण 'नाॅर्मल स्कूल' सुरु होते. त्यामध्ये सावित्रीमाईनी प्रवेश परिक्षा देऊन 1845-46 साली तिस-या वर्षात प्रवेश घेतला. 1846-47 साली चौथे वर्ष पूर्ण करून प्रशिक्षित शिक्षिका म्हणून कृतीशील झाल्या. भारतातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत! 1 जानेवारी 1818 रोजी महापराक्रमी महार योद्ध्यांनी भीमा कोरेगाव येथील युद्धात पेशव्यांचा पराभव केला आणि पेशवाईचा अंत केला. त्यामुळे एका नव्या क्रांतीचा मार्ग सुकर झाला होता. तरीही जनमानसावर मनुस्मृतीचा अंमल कायम होता. ब्राम्हणी सनातन बुरसट विषमतावादी संस्कृतीने जात्यंधतेचा कळस गाठला होता. अशा काळात सावित्रीमाई एका नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी, एका नव्या क्रांतीसाठी जोतिबांसोबत खांद्याला खांदा लावून सज्ज झाल्या!

स्त्री, शूद्र, पशू आणि ढोल हे सर्व केवळ बडवण्याच्याच लायकीचे असतात, यावर ठाम श्रद्धा असणारा तो काळ.‌ स्त्री व शूद्रातिशूद्रांना कोणताच अधिकार नव्हता. स्त्रिया शिकल्या तर त्यांचे नवरे लवकर मरतात; शिक्षणामुळे स्त्रिया स्वैर व चवचाल बनतात; स्त्री हे पापाचे माहेरघर आहे; स्त्री म्हणजे नरकद्वार, स्त्री म्हणजे पुरुषांची कामवासना भागविणारे साधन अशा प्रकरची मानसिकता असणारा तो काळ! स्त्रिला आशा आकांक्षा असू शकतात, तीला स्वतंत्र व्यक्तीमत्व असू शकते हेच मुळी त्या काळात मान्य नव्हते. हाच धर्म होता. हेच धर्म‌मान्य होते आणि हेच देवमान्य‌ होते! त्यामुळे पुण्यातल्या कर्मठ भटब्राम्हणांनी सावित्रीमाईंना अतोनात छळले. शिक्षण प्रसार केला म्हणून प्रचंड त्रास दिला. धर्मबुडवी म्हटले. कैदाशीण, सटवी, बाटगी म्हटले. म्हारीण म्हटले. एवढेच नव्हे तर सावित्रीमाई शाळेत जात असत तेव्हा त्यांच्या अंगावर थुंकणे, दगड मारणे, केरकचरा फेकणे, शेणाचा मारा करणे अशा नीच पातळीवर जाऊनही पुण्यातल्या कर्मठ भटब्राम्हणांनी सावित्रीमाईंचा छळ केला! हे सर्व प्रकार सावित्रीमाईंनी शांतपणे सहन केले. शाळेत जाताना त्या एक साडी पीशवीतून नेत असत. ती नेसून त्या मुलांना शिकविण्यात रममाण होत असत. कंबर कसून त्या भटब्राम्हणांच्या नीच‌ हरकतीं विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या!

1 जानेवारी 1848 रोजी क्रांतीबा फुले यांनी पूण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. तीथे सावित्रीमाई शिक्षिका म्हणून कृतीशील झाल्या. 1848 ते 1852 या काळात फुले दाम्पत्याने 20 शाळा काढल्या आणि यशस्वीरित्या चालविल्या. 1852 साली शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी मे. कॅण्डी यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम बाग वाड्यात इंग्रज सरकार कडून दोन शाली देऊन फुले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. 12 फेब्रुवारी 1853 रोजी मुलींच्या शाळेचा बक्षिस समारंभ झाला. त्या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळांचा दर्जा खूपच चांगला होता.

28 मे 1852 च्या 'पूना ऑब्झर्व्हर' या नियतकालिकात एक लेखक म्हणतो,
"जोतीरावांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळांतील मुलींपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती सरकारी शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची आहे......... जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर जोतिबांच्या मुली सरकारी शाळांतील मुलींपेक्षा वरचढ ठरतील...... तर स्त्रियांनी पुरुषांवर मात केली हे पाहून आम्हा पुरुषांना माना खाली घालाव्या लागतील." फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळांचा दर्जा सांगणारी ही पावतीचा होती!
फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळेतील एक अकरा वर्षांची मातंग विद्यार्थीनी मुक्ता साळवे (1855) आपल्या निबंधात म्हणते, "लाडू खाऊ ब्राम्हण तर म्हणतात की, वेद ही आमचीच सत्ता‌ आहे. ब्राम्हणेतरांस वेदांचा अधिकार नाही. यांजवरुन जर आम्हांस धर्मपुस्तक पहाण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे? हे भगवाना, तुजकडून आलेला कोणता धर्म‌ आम्ही स्विकारावा ते लवकर कळव. म्हणजे तेणेप्रमाणे तजवीज करता येईल."
अशाप्रकारे फुले दाम्पत्याने चालविलेल्या शाळेतील मुलींमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची बौद्धिक क्षमता निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. शाळांसाठी योग्य अभ्यासक्रम तयार करण्याचे कार्यही सावित्रीमाईंनी केले. 28 जानेवारी 1853 रोजी जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीमाईंनी त्याचे व्यवस्थापन पाहिले. त्या काळात ब्राम्हण समाजात विधवा स्त्रियांना केशवपन करून विद्रुप केले जात असे व घरातल्या अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत त्यांची रवानगी केली जात असे. मात्र अनेकदा या स्त्रियांवर अत्याचार केले जात असत. त्यातून जन्माला येणा-या नवजात अर्भकांची हत्या करण्यात येत असे. या अशा स्त्रियांची व त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह कार्यरत होते.

सावित्रीमाईंना मूल नव्हते. 1873 मध्ये काशीबाई या ब्राह्मण विधवेस सावित्रीमाईंनी आत्महत्येपासून वाचविले. तीचे बाळंतपण केले. तीचे मूल दत्तक घेतले. हाच यशवंत होय. त्याला डॉक्टर बनविले. विधवा स्त्रीयांचे केशवपन करुन त्यांना विद्रुप करण्याची पद्धत ब्राम्हण समाजात होती. त्याविरोधात सावित्रीमाईनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. तसेच 'विधवा पुनर्विवाह' घडवून आणणारी संस्था स्थापन केली. 'प्रौढ शाळा' सुरु केली. रात्रशाळा सुरू केली. सतीची चाल बंद करण्यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला. सावित्रीमाई स्त्रियांना नेहमी समुपदेश करीत. पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यांच्या सारख्या उच्चशिक्षित स्त्रिया त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी येत असत. सुशिक्षित स्त्रियांमध्ये सावित्रीमाईंबद्दल प्रचंड आदर होता!

28 नोव्हेंबर 1890 रोजी रात्री जोतीबांचे निधन झाले. सावित्रीमाईंवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतु सावित्रीमाईंनी न डगमगता जोतिबांचे‌ कार्य नेटाने पुढे चालविले. सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले. इतर संस्थांच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 1893 साली सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षा झाल्या.
जोतीरावांच्या मृत्यू समयी सावित्रीमाई त्यांच्या जवळ होत्या. जोतीरावांनी आपल्या मृत्यूपत्रात "दहन करु नये. मीठात घालून पुरावे" असे लिहिले होते. त्यासाठी जोतिबांनी स्वत: घरामागे खड्डा खणून ठेवला होता. परंतु महापालिकेच्या नियमात ते बसत नसल्यामुळे अग्नीसंस्कार केला गेला. वारसाहक्कासाठी अग्नीसंस्काराच्या समयी अनेक नातेवाईक आले. त्यांनी यशवंतला विरोध केला. तेव्हा सावित्रीमाईंनी स्वत: हाती टिटवे धरले आणि स्वत: जोतिबांना अग्नी दिला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते!

1893 साली मुंबई मध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली. या प्रसंगी सावित्रीमाईंनी गिरणगावात ( लालबाग) प्रचंड सभा घेतली. या सभेला 60 हजार लोक उपस्थित होते. ( त्यावेळी मुंबईची लोकसंख्या होती सहा लाख!). दंगल शमली. सावित्रीमाईंच्या काळजाला हात घालणा-या शब्दांनी सर्व शांत झालं !!

1896 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. डॉक्टर यशवंतच्या सहाय्याने सावित्रिमाईंनी रुग्णांसाठी मदतकार्य सुरु केले. अशाच एका प्रसंगी एका प्लेगग्रस्त दलित मुलाला आपल्या खांद्यावरून सावित्रीमाईंनी डॉ यशवंतच्या दवाखान्यात आणले. सावित्रीमाईंना प्लेगची लागण झाली. त्यातच दिनांक 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीमाईंच्या निधनामुळे एका धगधगत्या कृतीशील क्रांतीकारी व्यक्तीमत्वाचा अस्त झाला तरी त्यांच्या कार्यामुळे त्या क्रांतीज्योती बनून सदैव तेवत राहतील!

आज 190 व्या जयंतीनिमित्त सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन!!!

प्रेमरत्न चौकेकर
3 जानेवारी 2021



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com